नवी दिल्ली (ऑनलाईन टीम)– भारतीय बाजारपेठेत आज सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली. वायदे बाजारात सोन्याचा दर 0.5 टक्क्यांनी घसरून 50,386 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. तीन दिवसांत सोन्याच्या दरात घसरण होण्याची ही दुसरी वेळ आहे. सोन्याबरोबरच वायदेबाजारातील चांदीचा दरही दोन टक्क्यांनी घसरून 61,267 रुपयांवर आला.
मागील सत्रात सोन्याचे दर एक टक्क्याने किंवा जवळपास 500 रुपयांनी वाढले होते, तर चांदी प्रति किलो 1,900 रुपयांनी महाग झाली होती. सात ऑगस्ट रोजी सोन्याने 56,200 प्रति दहा ग्राम एवढा उच्चांकी दर गाठला होता. त्यानंतर सातत्याने सोन्याच्या दरात खूप चढ-उतार झाले आहेत. या आठवड्याच्या सुरूवातीला सोने 49,500 रुपयांच्या खाली गेले होते.
जागतिक बाजारपेठेतील दर
जागतिक बाजारपेठेतही आज सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 1,896.03 डॉलर झाला तर चांदीचा भाव ०.२ टक्क्यांनी वधारून तो 24.22 डॉलर प्रति औंस इतका झाला. दरम्यान, प्लॅटिनमचे दर ०.१ टक्क्यांनी घसरून 883.25 डॉलर आणि पॅलेडियम 0.5 टक्क्यांनी वधारून 2,319.59 वर बंद झाला. अन्य चलनांच्या तुलनेत डॉलर निर्देशांक आज 93.817 वर होता.
यावर्षी सोने २५ टक्क्यांनी महागले
Gold has risen by 25 per cent this year
राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याकडे गुतंवणूकदर सुरक्षित गुंतवणूक म्हणून बघतात. त्याचाच परिणाम म्हणून यंदा सोने सुमारे 25 टक्क्यांनी महागले. ऑगस्टमध्ये सोन्याची आयात वाढून 3.7 अरब डॉलरवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 1.36 अरब डॉलर होती. चीननंतर भारत दुसर्या क्रमांकाचा सोन्याची खरेदी करणारा देश आहे. भारतात सोन्याच्या आयातीवर 12.5 टक्के आयात शुल्क आणि तीन टक्के जीएसटी आकारला जातो.