काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या अधिकृत ‘एक्स’ (X) हँडलवरून पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सुनेत्रा पवार यांचा उल्लेख ‘गुंगी गुडिया’ असा करण्यात आला होता. विशेष म्हणजे, मुंबईत जेव्हा हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू होती, तेव्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तिथे घुसले आणि त्यांनी माफीची मागणी केली. मात्र, सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम राहिल्याने राष्ट्रवादीचा संताप अधिकच अनावर झाला आणि याचे पडसाद पुण्यातील आंदोलनात उमटले.
पुण्यातील हे आंदोलन प्रारंभी बालगंधर्व चौकात आयोजित करण्यात आले होते आणि त्यासाठी रीतसर परवानगीही घेण्यात आली होती. मात्र, बालगंधर्व चौकातील निषेध सभा संपल्यानंतर आंदोलक अचानकपणे जवळच असलेल्या काँग्रेस भवनच्या दिशेने निघाले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अनेक महिला पदाधिकारी थेट काँग्रेस कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न करू लागल्याने तिथे तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी आधीच काँग्रेस भवनसमोर मोठे बॅरिकेटिंग केले होते आणि गेट बंद केले होते. तरीही कार्यकर्ते बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेली झटापट झाली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात करावा लागला.
आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीवर घणाघाती टीका केली. त्यांनी ऐतिहासिक संदर्भ देत म्हटले की, काँग्रेस आपली जुनी संस्कृती विसरलेली दिसते आहे. याच देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही एकेकाळी विरोधकांनी ‘गुंगी गुडिया’ म्हणूनच हिणवले होते, पण त्यांनीच पुढे जाऊन या देशाला कणखर नेतृत्व दिले. त्याचप्रमाणे सुनेत्रा वहिनींनी गेल्या सहा महिन्यांच्या काळात कौटुंबिक आणि राजकीय संघर्षाला ज्या धैर्याने तोंड दिले आहे, ते पाहता त्यांच्यावर अशी खालच्या पातळीवरची टीका करणे निंदनीय आहे, असे मत आंदोलकांनी व्यक्त केले.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, माजी आमदार सुनील टिंगरे, पुणे मनपा विरोधी पक्षाचे गटनेते निलेश निकम, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख,सौ. रुपाली ठोंबरे, हाजी फिरोज शेख यांच्यासह अनेक आक्रमक महिला आणि युवक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे पुणे पोलिसांची मोठी धावपळ उडाली, मात्र अखेर सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी हे आंदोलन पांगवले. जोपर्यंत काँग्रेस या अपमानास्पद विधानाबद्दल माफी मागत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.















