पीएनजी ज्वेलर्सचा थक्क करणारा प्रवास; २० कोटींवरून थेट १०,५०० कोटींच्या उलाढालीवर! डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या ‘चूझिंग गोल्ड’ पुस्तकाचे प्रकाशन


पुणे(प्रतिनिधी )-महाराष्ट्राच्या व्यावसायिक वर्तुळात मोठी उलाढाल गाजवणाऱ्या आणि तब्बल १९४ वर्षांचा प्रदीर्घ वारसा असलेल्या पीएनजी ज्वेलर्सच्या यशाची गाथा आता पुस्तकरूपात वाचकांना अनुभवायला मिळणार आहे. पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी लिहिलेल्या आपल्या २५ वर्षांच्या रोमांचक व्यावसायिक प्रवासावर आधारित ‘चूझिंग गोल्ड’ या पहिल्या स्मृतीचित्राचे मराठी अभिनेते प्रसाद ओक यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.या पुस्तकातून त्यांनी अवघ्या २० कोटींच्या उलाढालीपासून सुरू झालेला प्रवास तब्बल १०,५०० कोटी रुपयांच्या शिखरापर्यंत कसा पोहोचवला, याचा सविस्तर लेखाजोखा मांडला आहे.

यावेळी सौरभ गाडगीळ यांच्या मातोश्री श्रीमती वैशाली गाडगीळ, पत्नी सौ. राधिका गाडगीळ हे उपस्थित होते.

पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ. गाडगीळ यांनी एक रंजक प्रसंग सांगितला. अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतर त्यांच्याकडे व्यवसायासाठी केवळ एकच दुकान होते. यादरम्यान एका नामांकित व्यवस्थापन गुरूंची भेट घेतली असता त्यांनी, “एका दुकानात बसणे हा व्यवसाय नसून तो एक छंद आहे,” असा मोलाचा सल्ला दिला होता. या एका वाक्याने डॉ. गाडगीळ यांच्या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आणि त्यांनी पीएनजी ज्वेलर्सला एका भव्य ब्रँडच्या रूपात विस्तारण्याचा माइंडसेट तयार केला. परिणामी, २००० साली अवघ्या १५ कर्मचाऱ्यांसह सुरू झालेला हा प्रवास आज ८० शाखा आणि चार हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या मोठ्या व्यावसायिक कुटुंबापर्यंत विस्तारला आहे.

अधिक वाचा  हडपसरमध्ये महायूतीत मिठाचा खडा : विकासकामाचे श्रेय लाटताना राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी भाजपला डावलल्याचा आरोप

‘चूजिंग गोल्ड’ हे अत्यंत प्रामाणिक आणि वैयक्तिक अनुभवांवर आधारित असे पुस्तक आहे. भारतातील सर्वात जुन्या व्यावसायिक वारशांपैकी एकाचा वारसा तरुण वयात स्वीकारल्यानंतर, आज वयाच्या एकोणपन्नाशीत डॉ. सौरभ गाडगीळ यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासाकडे मागे वळून पाहत त्यातील अनुभव, संघर्ष, निर्णय आणि शिकवणी यांचा प्रांजळ वेध घेतला आहे. हा प्रवास बाहेरच्या जगाला दिसणाऱ्या यशाचा नसून, त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या वास्तवाचा आणि त्यातून घडलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आहे.

पेंग्विन इंडिया या नामांकित प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. हे केवळ डॉ. गाडगीळ यांची वैयक्तिक यशोगाथा नसून, तरुण उद्योजक आणि व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी बिझनेस लेसन्स आणि महत्त्वाचे पॉईंट्स देण्यात आले आहेत. व्यवसायातील जोखीम कशी ओळखायची, यश आणि अपयश या दोन्ही आघाड्यांवर स्वतःला कसे संतुलित ठेवायचे, आणि कौटुंबिक व्यवसायाचा वारसा पुढे नेताना येणाऱ्या मानसिक दडपणाला कसे हाताळायचे, यावर पुस्तकात सविस्तर भाष्य करण्यात आले आहे.

अधिक वाचा  शरद पवारांनी माझी उमेदवारी जाहीर केली होती : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा गौप्यस्फोट

डॉ. गाडगीळ यांनी आपल्या या अभूतपूर्व यशाचे श्रेय कुटुंबातील संस्कारांना आणि पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या टीमला दिले आहे. विशेषतः त्यांची आई, पत्नी राधिका, मुले आणि व्यावसायिक सहकाऱ्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच हे शिखर गाठणे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

कंपनीने नुकत्याच यशस्वीपणे पार पडलेल्या क्यूआयपी माध्यमातून सातशे कोटी रुपये उभे केले आहेत, जे कंपनीच्या पुढील विस्तारासाठी मोठा मैलाचा दगड ठरतील असे त्यांनी सांगितले.हे पुस्तक सध्या इंग्रजी भाषेत उपलब्ध असून, आगामी दिवाळीच्या सुमारास त्याची मराठी आवृत्ती देखील प्रकाशित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. वाचकांसाठी हे पुस्तक सर्व पीएनजी स्टोअर्स, ॲमेझॉन आणि क्रॉसवर्डवर उपलब्ध आहे.

या पुस्तकाचा औपचारिक प्रकाशन सोहळा ६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे खासगी समारंभात पार पडणार असून, त्यावेळी डॉ. सौरभ गाडगीळ यांच्यासोबत अभिनेत्री माधुरी दीक्षित विशेष संवाद साधणार आहेत. या संवादातून ‘चूजिंग गोल्ड’ या पुस्तकामागील प्रेरणादायी प्रवास, अनुभव आणि त्यातून मिळालेल्या शिकवणीवर प्रकाश टाकला जाणार आहे.

अधिक वाचा  डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रेडिंग पॅटर्नमुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ: ९० दिवसांत ३६४२ ट्रेड्स आणि ‘इन्सायडर ट्रेडिंग’चा संशय

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love