सिंहगड रोडवर रानगव्याची एन्ट्री, तासनतास सुरू राहिलेली थरारक बचाव मोहीम यशस्वी

पुणे सिंहगड रस्ता रानगवा बचाव मोहीम (Pune Sinhgad Road Gaur Rescue Operation)
पुणे सिंहगड रस्ता रानगवा बचाव मोहीम (Pune Sinhgad Road Gaur Rescue Operation)

पुणे(प्रतिनिधी)–सिंहगड रस्त्यावरील वर्दळीच्या हिंगणे खुर्द परिसरात मंगळवारी सकाळी एका रानगव्याने दर्शन दिल्याने एकच खळबळ उडाली. विश्रांती नगर येथील नवीन कॅनॉल रोड लगत असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या दोन मोठ्या बंदिस्त जलवाहिन्यांच्या मध्ये हा गवा अडकला होता. वन विभाग, पुणे शहर पोलीस, अग्निशमन दल आणि ‘रेस्क्यू’ चॅरिटेबल ट्रस्ट यांनी संयुक्तपणे राबवलेल्या अत्यंत आव्हानात्मक मोहिमेनंतर या गव्याची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मंगळवारी सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांच्या सुमारास स्थानिक नागरिकांना जलवाहिनीच्या दोन पाइपांमध्ये एक प्राणी अडकल्याचे दिसून आले. सुरुवातीला तिथे गाय अडकल्याची वर्दी सिंहगड रोड अग्निशमन केंद्राला मिळाली होती. मात्र, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असता, तो प्राणी गाय नसून एक रानगवा असल्याचे स्पष्ट झाले. गव्यासारखा महाकाय प्राणी रहिवासी भागात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाने तातडीने वन विभाग आणि पोलिसांना पाचारण केले.

अधिक वाचा  पुण्याच्या कोथरूड भागात रानगव्याचे दर्शन: उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

दोन मोठ्या आणि वजनदार पाइपांच्या मध्ये गवा अडकला असल्याने त्याला बाहेर काढणे अत्यंत जिकिरीचे होते. वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने सर्वप्रथम गव्याच्या पोटाखालून दोन दोऱ्या आणि पट्टा सोडून त्याला आधार दिला. त्यानंतर रेस्क्यू व्हॅनमधील पशुवैद्यकीय डॉक्टरांनी गव्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन त्याला सुरक्षितरीत्या भूल दिली. गवा बेशुद्ध झाल्यानंतर एका क्रेनच्या साहाय्याने त्याला अत्यंत सावधपणे दोन्ही पाइपच्या मधून बाहेर उचलण्यात आले आणि घटनास्थळी आलेल्या रेस्क्यू वाहनामध्ये ठेवण्यात आले.

या बचाव मोहिमेनंतर गव्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुणे वन वृत्ताचे वनसंरक्षक अभिजित वायकोस यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी झाली. उपवनसंरक्षक मनोज बावले यांनी दिलेल्या माहितीनुसार, गव्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. गव्याला अधिक निरीक्षण आणि उपचारांसाठी वन विभागाच्या बावधन येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. सर्व आवश्यक वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आणि प्रकृती पूर्णपणे सुधारल्यानंतर त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. विविध यंत्रणांनी दाखवलेला समन्वय आणि तातडीचा प्रतिसाद यामुळेच या वन्यप्राण्याला कोणतीही मोठी दुखापत न होता वाचवण्यात यश आले, असे वनविभागाकडून सांगण्यात आले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love