पुणे(प्रतिनिधी)–महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल आज ( ८ मे २०२६) अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. कोकण विभागाने निकालात आपले अव्वल स्थान कायम राखले असून छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्केवारीत २ टक्क्यांनी घट झाली आहे.
यंदाच्या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून एकूण १५,५५,०२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४२,४७२ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट झाले आणि १४,२०,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी विभागनिहाय खालीलप्रमाणे आहे:
यंदाच्या निकालात कोकण विभागाने ९७.६२ टक्के निकालासह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (८८.४१ टक्के) लागला आहे. परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५५ हजार ५०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले होते आणि १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यातील १७९ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण
विशेष म्हणजे, राज्यातील १७९ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले असून, यामध्ये लातूर विभागातील सर्वाधिक १०४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इतर विभागांमध्ये पुण्यातील १२, छत्रपती संभाजीनगरमधील २४, कोल्हापुरातील १५, मुंबईतील ५, नाशिकमधील ६, कोकणातील ७ तर नागपूर आणि अमरावतीमधील प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत.
अव्वल विभाग: कोकण (९७.६२%)
सर्वात कमी निकाल: छत्रपती संभाजीनगर (८८.४१%)
मुलींचा निकाल: ९४.९६%
मुलांचा निकाल: ८९.५६% (मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा ५.४० टक्क्यांनी जास्त आहे)
गुणवत्तेचा विचार करता, ४,२२,८९१ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे, तर ४,८२,२६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ३,८०,४३७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली असून १,३४,९३४ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील एकूण ६,६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र आता एकाच कागदावर
मंडळाने यंदापासून एक मोठा बदल केला असून, आतापर्यंत स्वतंत्र मिळणारी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र आता एकाच कागदावर एकत्रित स्वरूपात दिले जाणार आहे. हा निकाल आज दुपारी १ वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत सात वेबसाईटसह डिजीलॉकरवर उपलब्ध झाला आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्य स्तरावर १० समुपदेशक आणि एससीईआरटी मार्फत ३१५ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच ‘टेलीमानस’ (१४४१६) आणि ‘मनोदर्शन’ (८४४८४४०६३२) या हेल्पलाईनद्वारे मानसिक आधार देण्याचे काम करण्यात आले.
कॉपीमुक्त अभियान
यंदा परीक्षा केंद्रांवर कडक शिस्त पाळण्यात आली होती. एकूण ५,१११ केंद्रांपैकी ४,५५७ केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. जिथे सीसीटीव्ही नव्हते, तिथे कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली होती. संपूर्ण राज्यात गैरप्रकाराची ४०२ प्रकरणे आढळली. यामध्ये ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून ४ ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी संधी
जे विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, त्यांनी खचून न जाता पुरवणी परीक्षेसाठी प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एटीकेटी सुविधेसाठी ४१,८६५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तसेच, जे विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊ इच्छितात, त्यांना श्रेणी सुधार योजनेअंतर्गत पुढील तीन संधी उपलब्ध करून दिल्या जातील. नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी आयटीआय मधील काही कोर्सेस निवडून कौशल्य विकासासोबत दहावीचे प्रमाणपत्र मिळवावे, असा महत्त्वपूर्ण सल्लाही शिक्षण विभागाने दिला आहे.
गुण पडताळणीसाठी विद्यार्थी ९ मे ते २३ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी आणि पुनर्मूल्यांकनासाठीची प्रक्रियाही बोर्डाच्या वेबसाईटवर सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.














