पुणे(प्रतिनिधी)–देशातील विविध राज्यांमध्ये ५० हून अधिक घरफोड्या करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका ३८ वर्षीय बांगलादेशी नागरिकाला पुण्याच्या अलंकार पोलिसांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून अटक केली आहे. एका हायटेक पाठलागानंतर पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि परकीय चलन हस्तगत करण्यात आले आहे.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, पुण्याच्या कर्वेनगर भागातील ‘द टेरिटरी’ नावाच्या कार्यालयात १४ ते १५ मार्च २०२६ च्या दरम्यान मोठी चोरी झाली होती. चोरट्याने खिडकीचे गज कापून कार्यालयात प्रवेश मिळवला आणि तिथून सोनी कॅमेरा, दोन महागड्या लेन्स, मॅविक प्रो २ ड्रोन आणि ॲपल आयफोन असा एकूण ६,७१,५०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) आणि ३०५(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. त्यामध्ये एक संशयित व्यक्ती रॉयल एनफिल्ड हिमालयन दुचाकीवरून जात असल्याचे निदर्शनास आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी या संशयिताचा माग काढण्यास सुरुवात केली. हा चोरटा पुणे सोडून हैदराबाद, चंद्रपूर, नागपूर, जबलपूर, लालबर्रा, शहडोल (मध्य प्रदेश) आणि मिर्झापूर असा प्रवास करत वाराणसीला पोहोचल्याचे तपासात निष्पन्न झाले. अखेर वाराणसी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतल्यानंतर या आरोपीने सुरुवातीला आपली ओळख तेलंगणातील रंगारेड्डी येथील ‘नेवनाथ विनोद कुमार’ अशी सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सखोल चौकशीअंती त्याचे खरे नाव मोहम्मद बशर नूर मोहम्मद असल्याचे समोर आले असून तो बांगलादेशातील ढाका येथील रहिवासी आहे. तो आपली खरी ओळख लपवण्यासाठी बनावट ओळखपत्रांचा वापर करत असल्याचे तपासात उघड झाले.
पोलिसांनी या कारवाईत ६,००,००० रुपये किमतीचे चोरीचे साहित्य जप्त केले आहे, ज्यामध्ये कॅमेरा, ड्रोन आणि आयफोनचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्याच्याकडे बांगलादेशी पासपोर्टसह अमेरिका, चीन, मलेशिया, सिंगापूर, कॅनडा आणि नेपाळ या देशांचे चलनही सापडले आहे. या आरोपीवर यापूर्वीच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात ३६ गुन्हे दाखल असून तो एक आंतरराज्यीय गुन्हेगार आहे. बेकायदेशीर प्रवेश आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणी वाराणसीतील रामनगर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर ‘फॉरेनर्स ॲक्ट’नुसार नवीन गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या पथकात महेश निंबाळकर, जगन्नाथ भोसले, जगदीश टलोले, निशिकांत सावंत, धीरज पवार, सोमेश्वर यादव आणि कुंभार या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.














