स्वर-विक्रमाचा नवा ‘पहाड’ : पुण्यात रंगला १११ गाण्यांचा नऊ तासांचा सोहळा

नादसप्तक १११ पहाडी गाणी जागतिक विक्रम
नादसप्तक १११ पहाडी गाणी जागतिक विक्रम

पुणे(प्रतिनिधी)–संगीताच्या क्षेत्रात एक नवा अध्याय रचण्यासाठी गिरीशजी पंचवाडकर आणि त्यांच्या ‘नाद सप्तक’ टीमने ९ तासांत पहाडी रागातील १११ गाणी सादर करण्याचा अनोखा विक्रम करण्याचा संकल्प हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवोदगार खासदार मेधा कुलकर्णी यांनी काढले.

पुण्यातील “नादसप्तक संगीत विद्यालय” यांच्या वतीने भारतीय लोकसंगीत व शास्त्रीय संगीत परंपरेतील अत्यंत मधुर, आणि लोकप्रिय,राग पहाडीवर आधारित १११ हिंदी व मराठी गीतांची आगळीवेगळी ‘सूर पहाडी’ ही भव्य संगीत मैफल बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी प्रख्यात निवेदक आनंद देशमुख, जेष्ठ टाळवादक माउली टाकळकर, आशिया बुक of रेकॉर्ड्स चे अधिकृत परीक्षक अशोक अडक,प्रख्यात गायक व संगीतकार गिरीश पंचवाडकर, युवा तबला वादक अक्षय पंचवाडकर हे यावेळी उपस्थित होते.

प्रख्यात निवेदक आनंद देशमुख, जेष्ठ टाळवादक माउली टाकळकर यांचा त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल “मानपत्र ” देऊन विशेष सन्मान मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. “तुमचा सत्कार आमच्या हस्ते होणे, हा आमचा बहुमान आहे,” अशी भावना मेधा कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली.

अधिक वाचा  शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यसरकार देणार ५० कोटी रुपयांचा निधी : देवेंद्र फडणवीस

या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन प्रख्यात गायक व संगीतकार गिरीश पंचवाडकर यांची आहे. या मैफलीत गिरीश पंचवाडकर यांच्यासह नादसप्तक संगीत विद्यालयातील १९ वर्षे ते ९९ वर्षे वयातील २५ विद्यार्थ्यांनी राग पहाडीवर आधारित भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत, लावणी, अभंग, तसेच संत ज्ञानेश्वर माऊली व संत रामदास यांच्या अभंगांचे सादरीकरण केले. त्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. मराठी व हिंदी चित्रपट संगीतासोबतच शास्त्रीय पहाडी सरगम व तराणा (स्वररचना – गिरीश पंचवाडकर) याच्या सादरीकरणाने रसिकांना तृप्त केले. या कार्यक्रमाद्वारे एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् (Asia Book of Records) तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् ( India Book of Records) मध्ये नोंद करण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, “१११ पहाडी रागातील गाणी कोणती असतील, याबाबत आम्हा सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे. गिरीशजी आणि त्यांची संपूर्ण टीम हा नऊ तासांचा विक्रम करण्यासाठी सज्ज झाली असून, या स्वरमयी प्रवासाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आहेत.”

अधिक वाचा  वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही - मनोज जरांगे पाटील

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘नांदी’ने वातावरण पूर्णपणे भारून टाकले होते. “विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून त्यांची ताकद आणि तयारी पहिल्याच क्षणी लक्षात येते, हा कार्यक्रम उत्तरोत्तर अधिक रंगत जाईल याची मला खात्री आहे,” अशा शब्दांत कुलकर्णी यांनी कलाकारांचे कौतुक केले. विशेष म्हणजे, ‘चल उठ रे मुकुंदा’ हे त्यांचे आवडते गाणे पहाडी रागात असल्याचे समजल्यावर त्यांनी आपला आनंद आणि कुतूहल व्यक्त केले.

याप्रसंगी बोलताना आनंद देशमुख यांनी आपला आनंद व्यक्त केला आणि हा क्षण आयुष्यभर स्मरणात राहील, अशा भावना व्यक्त केल्या. माऊली टाकळकर यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या उपस्थितीत आणि त्यांच्यासोबत सन्मान होणे हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. गेल्या दोन महिन्यांत माऊली टाकळकर आणि माझा एकत्रित सत्कार होण्याची ही चौथी किंवा पाचवी वेळ असून, हा एक अत्यंत दुर्मिळ आणि आनंदाचा योग असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित असणे हे मी माझे मोठे भाग्य समजतो, असेही ते म्हणाले.

मेधाताईंनी यापूर्वी त्यांच्या घरी बोलावून माझ्या जागतिक विक्रमाबद्दल माझा सन्मान केला होता. आज त्यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा हा सत्कार होणे, हा ‘दुग्धशर्करा योग’ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज भरणार : दोन्ही बाजूने शक्ति प्रदर्शन होणार

रिॲलिटी शोपेक्षा अभिजात संगीताला महत्त्व द्या

नादसप्तक संगीत विद्यालयाच्या कार्याचे कौतुक करताना आनंद देशमुख यांनी पालकांना एक महत्त्वाचा संदेश दिला. आजच्या काळात आपल्या मुलांना केवळ ‘रिॲलिटी शो’ मध्ये पाठवण्याच्या स्पर्धेत न पडता, त्यांना अभिजात संगीताचा वारसा देणाऱ्या विद्यालयात प्रवेश मिळवून देणे महत्त्वाचे आहे. नादसप्तक विद्यालय ज्या पद्धतीने संगीताचा वारसा जपत आहे आणि त्यावर संशोधन करत आहे, ते कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. अशा विद्यालयात आपल्या पाल्यांना पाठवणाऱ्या पालकांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

संगीत संयोजनात, प्रसिद्ध युवा तबलावादक व विद्यालयाचे संचालक अक्षय पंचवाडकर, ज्येष्ठ कीबोर्ड वादक रशीद शेख,तसेच नागेश भोसेकर, प्रसन्न बाम, सचिन वाघमारे, रोहित साने, आदित्य निरगुडे आदी पुण्यातील नामवंत वादकांचा सहभाग लाभला.

पुणेकर रसिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ गोडबोले, रविकिरण धोंगडे आणि स्वाती देवळे यांनी केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love