
पुणे(प्रतिनिधी)–राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आता संघ प्रार्थना विविध भाषांमध्ये नागरिकांना समजून घेता येणार आहे. निमित्त आहे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि चितळे समूहाचे संचालक इंद्रनील चितळे यांची निर्मिती असलेल्या ‘अर्थासहित संघ प्रार्थना’ या विशेष प्रकल्पाच्या विमोचनाचे. दि. २७ सप्टेंबर रोजी नागपूर येथे या प्रकल्पाचे औपचारिक प्रकाशन सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती सिद्धार्थ शिरोळे व इंद्रानील चितळे यांनी कळविली आहे. युट्यूब आणि इतर माध्यमांद्वारे सदर संघ प्रार्थना नागरिकांपर्यंत पोहोचेल.
याविषयी अधिक माहिती देताना आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “संघ प्रार्थना ही लहानपणापासून कायमच मला प्रेरणा देत आली आहे. या प्रार्थनेचा अर्थ हा सार्वत्रिक असून त्यातून मिळणारी उर्जा माझ्यासाठी विशेष आहे. ही प्रार्थना विविध भाषिक नागरिकांपर्यंत पोहोचावी हा आमचा या प्रकल्पाच्या संकल्पनेमागील उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराथी, तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या ८ भाषांमध्ये प्रार्थनेच्या अर्थाचे निवेदन केले आहे. येत्या २७ सप्टेंबर रोजी हिंदी निवेदन असलेल्या संघ प्रार्थनेचे प्रकाशन करण्यात येईल व त्यानंतर पुढील काळात संघ प्रार्थनेचे इतर भाषांमधले निवेदन प्रकाशित करण्यात येईल.”
चितळे समूह हा गेल्या काही पिढ्यांपासून व्यवसायात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देखील काही पिढ्यांपासून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आपले योगदान देत आहे, त्यामुळे हा समान दुवा लक्षात घेत आम्ही या प्रकल्पात सहभागी झालो.असे सांगत इंद्रनील चितळे म्हणाले, “संघाच्या विचारधारेला १०० वर्षे पूर्ण होत असताना संघ प्रार्थनेचा वैश्विक भाव जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा, येणाऱ्या पिढ्यांना आपल्या मागील पिढ्यांचे योगदान माहिती व्हावे हा या संकल्पनेच्या निर्मितीमागील उद्देश आहे.”
सामान्य नागरिकांपर्यंत संघाची प्रार्थना आणि त्याचा योग्य अर्थ पोहोचावा या उद्देशाने संगीत दिग्दर्शक राहुल रानडे यांनी दोन वर्षांच्या अथक प्रयत्नाने ही प्रार्थना तयार केली असून याचे गायन राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक शंकर महादेवन यांनी केले आहे. प्रार्थनेचे हिंदी भाषेतील लेखन आणि निवेदन हरीश भिमाणी यांनी केले आहे. मराठी अर्थ विवेक आपटे यांनी लिहिला असून निवेदन सचिन खेडेकर यांनी केले आहे.
‘अर्थासहित संघ प्रार्थना’ या प्रकल्पाची मूळ संकल्पना हरीश भिमाणी यांची असून राहुल रानडे यांनी प्रकल्प प्रमुख व संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. या प्रार्थनेचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले असून लंडन येथील रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या वादकांनी याला स्वरसाज चढविला आहे. प्रार्थनेचे ध्वनीमुद्रण लंडन येथील ॲबी रोड स्टुडिओज आणि मुंबई येथील यशराज फिल्म्स या ठिकाणी पूर्ण झाले असून ध्वनीमिश्रण व मास्टरिंग विजय दयाळ यांनी केले आहे.