पुणे(प्रतिनिधि)– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जातील.
परीक्षेचा कालावधी:
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षा: लेखी परीक्षा मंगळवार, २४ जून, २०२५ ते बुधवार, १६ जुलै, २०२५ या कालावधीत होईल. यामध्ये सर्वसाधारण, व्दिलक्षी, व्यवसाय अभ्यासक्रम, तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा समाविष्ट आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) मंगळवार, २४ जून, २०२५ ते शुक्रवार, ११ जुलै, २०२५ पर्यंत चालतील. माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा १५ जुलै २०२५ आणि १६ जुलै २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षा: लेखी परीक्षा मंगळवार, २४ जून, २०२५ ते मंगळवार, ०८ जुलै, २०२५ या दरम्यान होईल. दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा मंगळवार, २४ जून, २०२५ ते शुक्रवार, ०४ जुलै, २०२५ या कालावधीत घेतली जाईल.
वेळापत्रकाची उपलब्धता:
सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in वर गुरुवार, २२ मे २०२५ पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडून छापील स्वरूपात मिळणाऱ्या अंतिम वेळापत्रकावरून करून घ्यावी, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. इतर कोणत्याही संकेतस्थळावरील, व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहनही मंडळाने केले आहे.