पुणे(प्रतिनिधी)–अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यात घट झाल्याने राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. शनिवारी धुळे, नंदुरबार येथे वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, ३ ऑक्टोबरनंतर राज्यातून मान्सून माघारी फिरणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती कायम आहे. याबरोबरच उत्तर मध्य महाराष्ट्र ते उत्तर बांग्लादेशदरम्यान ट्रफ कायम आहे. यामुळे शुक्रवारी विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ातील काही जिल्हय़ात वादळी पाऊस झाला, तर नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्हय़ात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुणे, सातारा, कोकणातील काही जिल्हय़ात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. शनिवारी धुळे, नंदुरबार वगळता राज्यातील बहुतांश भागात तुरळक पाऊस राहील.
राज्यातून ३ ऑक्टोबरनंतर मान्सून माघारी
दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन आठवडय़ांचा अंदाज जाहीर केला असून, यानुसार राज्यात ३ ऑक्टोबरपर्यंत कमी-जास्त पाऊस राहील. ३ ऑक्टोबरनंतर राज्यातून मान्सून माघारी फिरणार असून, यामुळे पाऊसही कमी राहील.
देशभरात जास्तीचा पाऊस
१ जून ते २५ सप्टेंबरच्या पावसाने सरासरी ओलांडली असून, देशभरात ५ टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. यंदा वायव्य, मध्य, दक्षिण भारतात पावसाने भरभरुन दान दिले आहे. यात वायव्य भारतात सरासरीच्या ४, मध्य भारतात १६, दक्षिण भारतात सरासरीच्या ४ टक्के अधिकचा पाऊस झाला आहे. पूर्व व पूर्वोत्तर भारतात पावसाने ओढ दिली असून, येथे सरासरीच्या उणे १७ टक्के पाऊस झाला आहे.