पुणे(प्रतिनिधि)– लोणावळ्यातील भुशी डॅम जवळील धबधब्यामध्ये पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील हडपसर भागातील अन्सारी कुटुंबातील पाच जण रविवारी वाहून गेल्याची घटना ताजी असताना पुण्याजवळील मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाट परिसरामध्ये वर्षाविहारासाठी आलेला एक ३८ वर्षीय तरुण धबधब्याच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
स्वप्निल धावडे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. जिम मधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाट परिसरामध्ये फिरायला गेला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील धावडे हा तरुण आपल्या जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. शनिवारी हा ग्रुप ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे गेला होता. स्वप्नील हा पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील रहिवाशी आहे. ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो उंचावरून धबधब्यात उडी मारताना दिसत आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीच्या कुंडांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आहे. पौड पोलिस, ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, शिवदुर्ग टीम लोणावळाने प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन्ही कुंडांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नीलचा शोध घेतला. मात्र, या टीमला कोठेही स्वप्नील आढळला नाही. दरम्यान, रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहापर्यंत या परिसरात शोधकार्य सुरू होते. आजही सकाळी पुन्हा या ठिकाणी शोधकार्य सुरू होते. आज मृतदेह रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे आढळून आला.
स्वप्नील धावडे – बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू
स्वप्नील धावडे हे जीम ट्रेनर पुणे जिल्ह्यातील ताम्हीणी घाटातील प्लस व्हॅली भागात शनिवारी गेले होते. जीममधे ट्रेनिंग देतात तिथले तरुण आणि त्यांची स्वतःची मुलगी होती. प्लस व्हॅली मधे एकुण तीन कुंड आहेत. पहिल्या कुंडातील पाणी धबधब्यातून वाहत मधल्या कुंडात जाते आणि तिथून ते सर्वात खाली असलेल्या कुंडात जाते. स्वप्नील धावडे आणि त्यांची टीम पावसाळा सुरु होण्यापूर्वी याच कुंडांमधे पोहण्यासाठी उतरले होते. मात्र तेव्हा पाण्याला फार जोर नव्हता. शनिवारी ते आणि त्यांची टीम पुन्हा प्लस व्हॅली मधील सर्वात वरच्या कुंडाजवळ गेले. स्वप्नील धावडे यांनी त्यांच्या जीम मधील सहकाऱ्यांसमोर फेसाळत्या पाण्यात उडी मारली. सुरुवातीला त्यांनी काठावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र धबधब्याच्या टोकाला आल्यानंतर त्यांची दगडावरील पकड निसटली आणि ते धबधब्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू राहिले होते. त्याच आधारे ते भारतीय सैन्यात सामील झाले होते. १८ वर्षांच्या सेवेनंतर ते मागील वर्षी निवृत्त झाले होते. त्यांची पत्नी पिंपरी चिंचवड पोलिस दलात कार्यरत आहेत.