पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला आरोपीची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिली आहेत. मुलाची कस्टडी आता त्याच्या आत्याकडे असणार आहे.
अल्पवयीन आरोपीच्या आत्या पूजा जैन यांनी मुंबई उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दाखल केली होती. या याचिकेत अल्पवयीन आरोपीला बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवल्याचा आरोप त्याच्या आत्याने केला होता. हायकोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला होता. त्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. अखेर न्यायालयाने या प्रकरणी मंगळवारी निकाल दिला. या निकालाने अल्पवयीन आरोपीला मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे कल्याणीनगर अपघात घटनेत दुचाकीवर असलेल्या ज्या तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता त्या दोघांच्या आई-वडिलांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी संबंधित घटनेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे या आरोपी तरुणाची बालसुधारगृहातून सुटका होणार असून मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे.
न्यायालयाने जामीन दिल्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपीला पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर आहे, असंही उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. २२ मे २०२४, ५ जून २०२४ आणि १२ जून २०१४ चे बालहक्क न्यायालयाचे जे आदेश आहेत, त्यामध्ये विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले होते, ते अवैध आहेत. त्यामुळे ते आदेश रद्द झाले आहेत. त्यामुळे विधीसंघर्षित बालकाला तातडीने सोडावे आणि त्याचा ताबा आत्याकडे देण्यात यावा असे न्यायालयाच्या निकालात म्हटले आहे.
या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत ‘पोर्शे’ कार भरधाव वेगाने चालवत १९ मे रोजी पुण्यातील कल्याणी नगर भागात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला उडवले होते. आरोपीने बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्याच्या मित्रांना पबमध्ये पार्टी दिली होती. त्याने मद्यप्राशन केलं होतं. त्याने नशेत महागडी पोर्शे कार भरधाव वेगात कल्याणीनगरच्या रस्त्यांवर चालवली. या दरम्यान त्याने एका दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवर अनिस अहुदिया आणि अश्विनी कोष्टा हे दोन तरुण-तरुणी होते. त्यांचा अपघातात जागीच मृ्त्यू झाला होता. या अपघातानंतर तिथल्या स्थानिकांनी अल्पवयीन आरोपीस पकडून मारहाण केली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आले होते. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणी पोलिसांवरही अतिशय गंभीर आरोप झाले होते.
आरोपी अल्पवयीन मुलगा हा पुण्यातील ख्यातनाम बिल्डर विशाल अग्रवालचा मुलगा असल्याची माहिती नंतर समोर आली. या प्रकरणी आरोपीला घटनेच्या अवघ्या काही तासांनी बाल हक्क न्याय मंडळाकडून अल्पवयीन असल्याच्या मुद्द्यावरुन जामीन मिळाला होता. केवळ ३०० शब्दांच्या निबंध लेखणाच्या शिक्षेच्या अटीवर त्याला जामीन मंजूर झाला होता. या प्रकरणी पोलिसांवर जोरदार टीका झाल्यानंतर पोलीस, सरकार यांच्यावरील दबाव वाढला होता. या प्रकरणी जसजसा तपास पुढे सरकत गेला तसतशा अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा होत गेला. पण अखेर या प्रकरणी आता अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर झाला आहे.
या प्रकरणात त्या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला अटक करण्यात आली होती. विशाल अग्रवाल यांनी विविध कट रचत मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पोलीस तपासात याप्रकरणी अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा देखील याता हात असल्याच पोलीस तपासात समोर आलं आहे.
कार दुर्घटनेनंतर पुणे प्रकरणी वेगाने कारवाई करत यामध्ये ज्या कुणाचा सहभाग होता त्या सर्वांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींना अल्पवयीन मुलगा, त्याचे आई-वडील, आजोबा यांना देखील वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटक केली आहे. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या ३ कारही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.