पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून केसच्या प्रगतीची माहिती घेतली. याप्रकरणात कोणताही मंत्री, आमदार, खासदार किंवा बांधकाम व्यवसायिक असला, तरी त्यांना सोडू नका, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या असल्याचे समजते. दरम्यान, मुख्यमंत्री पुण्यात येऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. तसेच पुणे पोलीस अधिकाऱयांशी चर्चा करून आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुण्यातील हिट अँड रन प्रकरण महाराष्ट्रासह देशभर गाजत आहे. हायप्रोफाईल बिल्डर विशाल आगरवाल याच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंदावस्थेत दुचाकीला उडविल्याने दोन तरुण तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हे प्रकरण पोलीस, डॉक्टर व उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱयांच्या संगनमताने दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सजग नागरिक, माध्यमे व विरोधी पक्षाने हे प्रकरण लावून धरले आहे. त्यामुळे आगरवाल पितापुत्रांसह पोलीस व डॉक्टरांवरही कारवाई झाल्याचे पहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. लवकरच मुख्यमंत्री शिंदे पुण्यात येऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. या वेळी ते याविषयावर पुणे पोलीस अधिकाऱयांशी चर्चा करतील. तसेच एकूणच प्रकरण व त्याचा तपास याचा आढावा घेतील. समाजात याप्रकरणातून चुकीचा संदेश जाऊ नये, तर चांगलाच संदेश गेला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
तपासासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर
पुण्यातील भागात कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आता पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून अपघाताचा घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याबरोबरच पोलिसांकडून तांत्रिक पुरावे (डिजिटल इव्हीडन्स) गोळा करण्यात येणार आहेत.
या प्रकरणातील पुरावे संकलित करण्यासाठी संपूर्ण घटना ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे उभी केली जाणार आहे. अपघात नेमका कसा झाला, याची माहिती संकलित केली जाणार आहे. तांत्रिक पुरावे संकलित करून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांसह, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. मोटारचालक गंगाधर हेरीक्रुब याच्यासह अल्पवयीन मुलाच्या दोन मित्रांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्या घरी जाऊन पोलिसांनी जबाब नोंदविला आहे. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांशी पोलिसांनी संपर्क साधला होता.
या प्रकरणात पुरावे संकलित करताना काही त्रुटी राहिल्यास त्याचा फायदा आरोपींना होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. आरोपींविरुद्ध तांत्रिक पुरावे गोळा करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.