पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्राचा दौरा झाल्यानंतर भाजपच्या महाराष्ट्रातील पुणे लोकसभेच्या संभाव्य यादीत माजी महापौर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचे नाव असल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर मोहोळ यांच्या विरोधात पुणे महापालिकेच्या परिसरात, ‘स्टँडिंग दिली, महापौर पद दिलं.. सरचिटणीस बनवलं.. खासदारकी पण देणार?.. आता बास झालं.. तुला नक्की पाडणार’ असे बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, “भाजपात अशा छोटा-मोठया गोष्टी होत राहतात. अशा बॅनरला पक्ष भीक घालणार नाही. छोटा कार्यकर्ता भावनेच्याभरात बॅनर लावतो. मेरिटप्रमाणे पक्ष सर्व्हे केला आहे. काही नावं पण दिल्लीत गेली आहेत. असे बॅनर पाहून मुरलीधर मोहोळ यांचं तिकिट कापलं जाणार नाही किंवा त्यांनाच मिळेल हे मी आताच सांगू शकत नाही” असं माजी खासदार संजय काकडे म्हणाले.
काकडे म्हणाले, “असे बॅनर पाहून, मला वाटतं नाही की हे बॅनर भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावले असतील. भाजपची कोअर कमिटी त्यावर निर्णय घेईल. पक्ष कोणावर अन्याय करत नाही. पक्षाने मेधा कुलकर्णी यांना सर्वोच्च सभागृहात स्थान दिलं काही नेत्यांचे काही असंतुष्ट कार्यकर्ते असतात ते अशा गोष्टी करत असतात” असं संजय काकडे म्हणाले. “विरोधी पक्षाच पण हे काम असू शकतं. ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, त्यांना उमेदवारी दिली जाईल. उमेदवारी मिळेपर्यंत चढा-ओढ असते. उमेदवारी जाहीर झाल्यावर भाजप ठामपणे उभी असते. १५ तारखेनंतर राज्यातील भाजपची यादी जाहीर होईल” असं संजय काकडे म्हणाले.
‘अजित पवारांकडे एकच खासदार’
अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चांबद्दलही ते बोलले. “अजित पवार नाराजीतून अमित शहा यांना भेटायला चालेल आहेत, असं कुठे म्हटलं आहे का?. अजित पवारांकडे एकच खासदार आहे, सुनील तटकरे आहेत. तरीही, त्यांना चांगल्या जागा मिळतील. अजित दादांना युती झाली, तर चांगल्या जागा मिळतील. भाजपच्या कोणत्याच नेत्यांनी असं सांगितलं नाही की, एवढ्या जागा मिळतील. मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार समाधानी होतील” असा विश्वास संजय काकडे यांनी व्यक्त केला.