Natya Sanmelan | Dr. Jabbar Patel – सत्ता बदलाचा पहिला अंक आम्ही दीड वर्षांपूर्वीच घडवून आणला आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा दुसरा अंक सध्या सुरू आहे. लवकरच आमच्या विजयाचा तिसरा अंकही पार पडेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या (A theatrical convention) मंचावरून शनिवारी राजकीय फटकेबाजी केली. दरम्यान, कलावंतावर सेन्सॉरशिप (Sensorship) असता कामा नये. आमचे म्हणणे आम्हाला मांडू द्या, असे राज्यकर्त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे, असे परखड मत संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल(Dr. Jabbar Patel) यांनी येथे व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या वतीने आयोजित शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. स्वागताध्यक्ष शरद पवा(Sharad Pawar) र, नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल(Dr.Jabbar Patel), मावळते अध्यक्ष प्रेमानंद गज्वी(Premanand Gajvi), मुख्य निमंत्रक उदय सामंत(Uday Samant) , नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले(Prashant Damale), डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील(Dr. P. D. Patil), उपाध्यक्ष व निमंत्रक भाऊसाहेब भोईर(Bhausaheb Bhoir) आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, संमेलनाचा हा अतिशय दिमाखदार असा सोहळा आहे. १०० व्या संमेलनाला मी उपस्थित रहावे, ही बहुदा नियतीचीच इच्छा असावी. मराठी रंगभूमीने आजवर अनेक स्थत्यंतरे पाहिली. मात्र, ती टिकून आहे. अनेक आव्हाने मराठी नाटकांनी यशस्वीपणे पेलली आहेत. आज सोशल मीडियाच्या काळातही मराठी प्रेक्षक नाटकासाठी गर्दी करतात, ही आश्वासक बाब आहे. १०० वर्षांचा सुवर्णकाळ अनुभवताना अनेकदा काळोखही मराठी रंगभूमीने अनुभवला आहे. शेअर मार्केटप्रमाणे चढ उतारही पाहिले आहेत. खरे तर चढ उतार हे गतिमानतेचे लक्षण होय. म्हणूनच वाईट काळातही रंगभूमी थांबली नाही. कलाकारांना टाळय़ांतून दाद मिळते, तर आम्हा राजकारण्यांना मतपेटीतून दाद मिळत असते. मेहनत दोघांना करावी लागते. जे जे करता येते, ते आम्ही राजकारणी करत असतो. अनेकदा राजकारणातही धाडसी प्रयोग करावे लागतात. दीड वर्षांपूर्वीच असाच धाडसी प्रयोग आपण केला. त्याची इतिहासात नोंद होईल. या धाडसी विषयावरही चित्रपट निघू शकतो. अध्यक्षांनी तो जरूर काढावा. आमचा पहिला अंक हा सत्ता बदलाचा होता. दुसरा अंक हा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा आहे. तर आता तिसरा अंक हा आमच्या विजयाचा असेल. लवकरच हा अंक आम्ही पार पाडू, असे सांगत आगामी निवडणुकीत यश मिळविण्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
प्रशांत दामले यांच्या राजकारणीही कलाकार असतात, या मिश्कील टिप्पणीचा धागा पकडत काही झाले, तरी आम्ही तुमच्यासारखा परफॉर्मन्स देऊ शकत नाही. कारण तुमच्या क्षेत्रात रिटेक नाही. आम्ही नेते असलो, तरी तुम्ही अभिनेते आहात. लाईव्ह परफॉर्मन्सची गोष्टच वेगळी आहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी नोंदवले. ज्याने त्याने आपापल्या परीने नाटकांसाठी योगदान दिले आहे. सगळय़ांचा प्राण, उद्देश मराठी रंगभूमी हाच राहिला आहे. मराठी रंगभूमीला प्राचीन इतिहास व परंपरा आहे. ती टिकली पाहिजे, यासाठी आम्ही रंगभूमीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही देतो. आगामी काळात रंगभूमीचे सर्व प्रश्न मार्गी लावू. वृद्ध कलाकारांचे मानधन, घरे याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. यासंदर्भात लवकरच बैठक घेणार असून, नाटकाच्या प्रश्नांबाबत हात आखडता घेणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
उदय सामंत म्हणाले, राजकारणी नाटकात हस्तक्षेप करतात, असा आरोप होतो. मात्र, नाटय़ परिषदेने हा आरोप खोडू न काढला, हे बरे झाले. प्रत्येक जिल्हय़ात नाटय़ संमेलन झाले पाहिजे. संमेलन पार पडल्यावर एक बैठक घेऊन पडद्यामागील कलाकारांच्या घराचा प्रश्न सोडवावा. कलाकारांच्या वृद्धाश्रमासाठी निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रेमानंद गज्वी म्हणाले, संमेलनाध्यक्षांनी अध्यक्षपदाच्या काळात काम करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांना परिषदेकडून मिळणारा निधी कमी आहे. ही रक्कम वाढवावी. नाटय़गृहाचे भाडे शासनाने भरावे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा. तसेच शासनाने मराठी भाषा व बोली भाषा संवर्धन समिती स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली.
नाटय़ कलाकारांसाठी संमेलन ही दिवाळी : प्रशांत दामले
प्रशांत दामले म्हणाले, नाटय़ संमेलन ही कलाकारांसाठी दिवाळी असते. हे दोन दिवस एकमेकांचे विचार समजून घेण्यासाठी महत्त्वाचे असतात. नाटय़ परिषद अजून महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचलेली नाही. आगामी काळात तलागळापर्यंत ती पोहोचली पाहिजे. शासन निधीचा योग्य विनिमय करणे, सरकारने पायाभूत सेवा पुरवणे, नाटय़गृहांची व्यवस्थित देखभाल करणे, भाडेविषयक समस्या सोडविणे, पालकांनी मुलांमध्ये नाटकाची आवड निर्माण करणे, या गोष्टी झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कलावंतास विधान परिषदेवर संधी हवी
भाऊसाहेब भोईर म्हणाले, १०० वे नाटय़ संमेलन हा पिंपरी-चिंचवड नगरीचा सन्मान आहे. राजकीय जोडे बाजूला ठेऊन सर्व पक्षीय नेते या सांस्कृतिक उत्सवाकरिता एकवटले आहेत. ही आनंदाची बाब आहे. विधान परिषदेवर आम्हाला संधी मिळावी, अशी आमची मागणी आहे. कला प्रतिनिधी या नात्याने प्रशांत दामले यांची या जागेवर निवड करावी. ते व्यस्त असतील, तर मी त्याकरिता तयार आहे, असेही भोईर यांनी सांगितले.
प्रशांत दामलेंची तक्रार अन् मुख्यमंत्र्यांची ऍक्शन
दरम्यान, आपल्या भाषणात प्रशांत दामले यांनी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील भोजन शुल्क व वीजबिलाबाबत तक्रार केली. त्यावर तातडीने ऍक्शन घेत मुख्यमंत्र्यांनी पिंपरीचे आयुक्त शेखर सिंह यांना याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
अजितदादांची उद्घाटन सोहळय़ाकडे पाठ
संमेलनाच्या उद्घाटन सोहळय़ास शरद पवार व अजित पवार एकत्र येणार असल्याने त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, या सोहळय़ाकडे अजित पवार यांनी पाठ फिरविली.
अध्यक्षीय भाषणाआधीच मुख्यमंत्र्यांचा काढता पाय
संमेलनाध्यक्षांचे भाषण हा संमेलनाचा गाभा मानला जातो. मात्र, हे भाषण सुरू होण्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढता पाय घेतला. उद्योगमंत्री उदय सामंत हेही भाषणाला उपस्थित राहिले नाहीत.
राज्यकर्त्यांनो, आजच्या तरुणाईला अभिव्यक्ती होऊ द्या!
डॉ जब्बार पटेल म्हणाले, शिक्षणाच्या पद्धती आपण आत्मसात केल्या पाहिजेत. आज विद्यापीठ स्तरावर नाटय़ प्रशिक्षण देणाऱया अनेक संस्था आहेत. मात्र, विद्यापीठे त्यांना पुरेसा निधी देऊ शकत नाही. प्रत्येक विद्यापीठाने 5 ते 6 कोटी कला विभागास देता यायला हवेत. त्यादृष्टीकोनातून वाढीव निधी शासनाकडून त्यांना प्राप्त झाला पाहिजे. विद्यापीठ स्तरावर जे प्रयोग होतात, ते अतिशय महत्त्वाचे असतात. त्यातून विद्यार्थ्यांमधील कलावंत घडत असतो. त्यामुळे त्यावर कोणतीही बंधने असू नयेत. संबंधित नाटके शास्त्राsक्त पद्धतीने होत असतील, तर त्यावर कसली कुंपणे घालता कामा नयेत. पुढच्या पिढय़ांचे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. सगळय़ा तरुण मुलांना आज अभिव्यक्त व्हायचे आहे. मात्र, आज त्यांना अभिव्यक्त होता येत नाही. अशी परिस्थिती आहे. राज्यकर्त्यांना सांगितले पाहिजे आम्हाला म्हणायचे ते म्हणू द्या. आंदोलनाच्या वा अन्य विषयांबाबत चौकटी कशाला? उलट नाटकाच्या माध्यमातून त्यावर चर्चा होऊ दे, ऊहापोह होऊ दे. असा संवाद झाला, तर हे प्रश्न सुटू शकतात, याकडे डॉ. जब्बार पटेल यांनी लक्ष वेधले. एकूणच रंगभूमीच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, बैठकीतून यावर मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, असे सांगत अर्धवट तालमीतून नाटक करू नका, असा सल्ला डॉ. पटेल यांनी आजच्या तरुण पिढीला दिला.