Ayodhya : अयोध्या (Ayodhya) या नावाचा शाब्दिक अर्थ आहे, जी नगरी युद्धात जिंकून घेणे शक्य नाही. वैदिक व पौराणिक ग्रंथांमध्ये (Vedic and Puranic texts) हा अर्थ वारंवार आला आहे, जैन(Jain) व बौद्ध(Buddhist) ग्रंथांनी( Text) सुद्धा अशाच स्वरुपाचा अर्थ स्पष्ट केला आहे. (Spiritual Significance of Ayodhya
जैन आचार्य जिनसेन(Jain Acharya Jinsen) यांनी आपल्या आदिपुराण या ग्रंथामध्ये शत्रूंसाठी अजिंक्य आहे म्हणून ती अयोध्या असा उल्लेख केला आहे तर बुद्धघोष यांनी फेनबिंदूपमसुत्तावर भाष्य करताना कोणत्याही पद्धतीने लढून जिंकून घेणे शक्य नाही म्हणून ती अयोध्या असा उल्लेख केला आहे. अयोध्या या नावाचा अध्यात्मिक विग्रह स्कंदपुराणांमध्ये आला आहे. अयोध्या नावातल्या ‘अ’ या अक्षराने ब्रह्मदेवाचा बोध होतो, ‘य’ हे अक्षर विष्णूवाचक आहे तर ‘ध’ हे अक्षर भगवान शंकरांच्या रुद्र रूपाचे बोधक आहे, त्या अर्थाने अयोध्या नगरी तिन्ही देवांच्या अधिवासाची नगरी आहे.
हिंदू धर्मियांना प्रातःस्मरणीय असलेल्या सात नगरांची सांगड योग मार्गात मानलेल्या शरीरातील चक्रांशी घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अयोध्येचा संबंध मानवी शरीरातील तिसरे चक्र असलेल्या मणिपूर चक्राशी जोडलेला आहे, मणिपूरचक्र आपल्या देहातील नाभीपाशी आहे, हे चक्र आनंद, औदार्य तसेच लालसा व मत्सर या भावभावनांशी जोडलेले आहे व या सर्व भावभावना अयोध्येशी जोडलेल्या आपल्याला आढळतील. आद्य शंकराचार्यांनी देवी त्रिपुरा सुंदरीचे स्तवन करण्यासाठी लिहिलेल्या सौंदर्यलहरी काव्यात देवीच्या विविध अंगांना विविध नगरांची उपमा दिली आहे, यामध्ये अयोध्येचा उल्लेख आहे. अशा रीतीने अध्यात्मिक दृष्ट्या अयोध्या नगरीचे महत्त्व वर्षानुवर्षे कायम असल्याचे लक्षात येते.
– डॉ. सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
मोबाईल फोन क्र. : ७५८८२१६५२६