वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे- ‘सहकाराचे डॉक्टर’ म्हणून ओळख असलेले सोलापूर जिल्ह्याचे जेष्ठ नेते व माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे पुण्यात काल रात्री (दि.१७ ) ११.३५ वाजता कोरोनाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात आज (मंगळवार) अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात सोमवारी (१७ऑगस्ट) रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील निस्पृह राजकारणी निर्वतला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
कोरोनाचा फैलाव पंढरपूर परिसरात वाढल्यावर ५ ऑगस्ट रोजी त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आलं होतं. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मधुमेह आणि रक्तदाबाच्या त्रासामुळे उपचारादरम्यान त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वसनावर ठेवण्यात आलं होतं. अखेर काल रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सुधाकरपंत परिचारक अखेरपर्यंत जनतेच्या कार्यला वाहून घेतले होते.
सुधाकरपंत परिचारक हे पाच वेळा पंढरपूरचे आमदार होते. एसटी महामंडळाचे ते माजी अध्यक्ष होते. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या परिचारक यांची ‘सहकाराचे डॉक्टर’ म्हणून ओळख होती. अडचणीत असलेल्या अनेक सहकारी संस्थांना त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने बाहेर काढलं. श्रीपूर इथल्या पांडुरंग सहकारी साखर कारखाना तसंच मोहोळ तालुक्याती भीमा सहकारी साखर कारखान्याचं अनेक वर्ष नेतृत्त्व केलं होतं.