पुणे(प्रतिनिधि)—पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीची तब्बल २८ तास ४० मिनिटांनी सांगता झाली. महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती टिळक चौकातून शुक्रवारी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी मार्गस्थ झाला आणि मिरवणूक संपल्याचे घोषित करण्यात आले. (Pune’s Ganapati Visarjan Procession takes about 28 hours and 40 minutes)
मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आरती करून गुरुवारी सकाळी १०.३० वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. विधान परिषदेच्या उपससभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते.
चांदीच्या पालखीमध्ये विराजमान झालेल्या कसबा गणपती बाप्पांचे सव्वा अकराच्या सुमारास बेलबाग चौकात आगमन झाले. कसबा गणपतीच्या पुढे प्रभात बँडने देशभक्तीपर गाणी वाजवून वातावरण प्रफुल्लीत केले. त्यानंतर कलावंत पथकातील कलाकारांचे वादन पाहून गणेशभक्त भारावले. यानंतर रमणबाग, रुद्रगर्जना ढोल-ताशा पथकांच्या वादनाने लक्ष्मी रस्ता दुमदुमला. या ढोलपथकांच्या वादनाने गणेशभक्तांनाही थिरकायला लावले. दुपारी सव्वातीनच्या सुमारास गणपती मिरवणुकीचे अलका चौकात आगमन झाले. त्यानंतर ४.१८ मिनिटांनी गणपतीचे घाटावर विसर्जन झाले.
कसबा गणपती पाठोपाठ मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मार्गस्थ झाला. श्रींची विलोभनीय मूर्ती चांदीच्या पालखीत विराजमान झाली होती. मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या सतीश आढाव यांच्या नगारावादनानाने वातावरणात भक्तीरस निर्माण केला. न्यू गंधर्व बँड पथकाने आपली कला सादर करीत गणेशभक्तांची मने जिंकली. यानंतर समर्थ प्रतिष्ठान, ताल ढोल-ताशा पथकातील वादनाने श्रोते तल्लीन झाले. यानंतर विष्णूनाथ हे शंख वादनाचे पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षानिमित्त शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाने खास शिवराज्याभिषेक रथ साकारला. न्यू गंधर्व ब्रास बँडच्या वादकांनी हनुमान चालीसा आणि मंगल अमंगल हरी या रामायण चौपाईचे वादन केले. सायंकाळी ४.१५ वाजता गणपती अलका चौकात आला व सव्वा पाचच्या सुमारास विसर्जन झाले.
भर पावसात उत्साह कायम
याच दरम्यान दुपारी ३ वाजता वरूनराजने हजेरी लावली. भर पावसातही पुणेकरांचा उत्साह कमी झालेला दिसला नाही. छत्र्या, रेनकोट घेऊन पुणेकर वैभवशाली मिरवणुकीचा आनंद घेत होते. यावेळी वादकांचा उत्साह वाढला नि ढोल- ताशाचा नाद टिपेला पोहोचला.
तांबडी जोगेश्वरी गणपती पाठोपाठ मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मार्गस्थ झाला. ‘जय श्रीराम रामराज्य’ या आकर्षक पुष्परथामध्ये गणरायाची मूर्ती विराजमान होती. रथामध्ये असलेल्या राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर यांच्या नगारावादनाचा गाडा होता. नादब्रह्म ट्रस्टच्या ढोल-ताशा वादनाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले. या मिरवणुकीत गुलालाची मुक्तहस्ते उधळण करण्यात आली. मंडळाचे कार्यकर्ते गुलालामध्ये न्हाऊन निघाले होते. पाचच्या सुमारास गणपती अलका चौकात दाखल झाला. सहाच्या सुमारास या गणपतीचे विसर्जन झाले.
यापाठोपाठ मानाचा चौथा गणपती तुळशीबाग महाकाल रथातून मार्गस्थ झाला. २८ फूट उंचीच्या रथामध्ये फुलांनी सजवलेली १२ फूट उंचीची महाकाल पिंड दृष्टीस पडताच भाविकांचे हात जोडले गेले. रथामध्ये हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. स्वरूपवर्धिनी, गजलक्ष्मी आणि शिवप्रताप या ढोल-ताशा पथकांच्या वादनाने आसमंत दुमदुमला. पावणेसहाच्या सुमारास गणपती अलका चौकात दाखल झाला. सव्वासहाच्या सुमारास या गणपतीचे विसर्जन झाले.
यानंतर फुलांनी सजवलेल्या मेघडंबरी रथातून मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा मिरवणुकीत सहभागी झाला. बिडवे बंधू यांचे नगारावादन मिरवणुकीच्या मध्यभागी होते. श्रीराम शिवमुद्रा आणि राजमुद्रा या ढोल-ताशा पथकांनी वाजवलेल्या तालावर गणेशभक्तांनीही ठेका धरला. इतिहास प्रेमी मंडळाकडून साकारण्यात आलेला चापेकर बंधूंना प्रेरणा देणारे ‘लोकमान्य टिळक’ हा देखावा लक्षवेधक ठरला. साडेसहाच्या सुमारास गणपती अलका चौकात दाखल झाला. सातच्या सुमारास या गणपतीचे विसर्जन झाले.
पुण्यात मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी गणेशभक्तांचा महापूर लोटला होता. लाखो पुणेकरांचा टिळक चौकात दर्शनासाठी जनसागर लोटला होता. परदेशी नागरिकांचा मिरवणुकीतील सहभागही लक्षणीय होता.
रांगोळय़ांच्या पायघडय़ा
सकाळी साडेदहा वाजता राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला मंडई येथून प्रारंभ झाला. प्रत्येक चौकात राष्ट्रीय कला अकादमीकडून मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.
दगडूशेठ यंदा सायंकाळपूर्वीच मार्गस्थ
दरम्यान, मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर गणेशभक्तांची पाऊले आपोआप दगडूशेठ, मंडई गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीच्या दिशेने वळतात. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने इतिहास रचत जय गणेश… गणपती बाप्पा मोरया… पुण्याचा अधिपती दगडूशेठ गणपती… च्या जयघोषात गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी ४ वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी झाला. महिनाभरापूर्वी विसर्जन मिरवणुकीत दुपारी ४ वाजता सहभागी होण्याच्या केलेल्या घोषणेप्रमाणे दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या सांगता मिरवणुकीला दुपारी ४ वाजता थाटात प्रारंभ झाला. तर, पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री ८.५० वाजता विसर्जन झाले.
गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक लक्ष्मी रस्त्याने श्री गणाधीश रथातून काढण्यात आली. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत असा साकारण्यात आला होता. तसेच आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघाला होता. मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी सहभागी झाला होता.
दरवषीप्रमाणे यंदा सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरुन करण्यात आली. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा होता. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते. अलका चौकामध्ये रात्री ८.२० च्या सुमारास दगडूशेठ गणपतीचे आगमन झाले. त्यानंतर पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री ८.५० वाजता विसर्जन झाले.
यानंतर रात्रीच्या सुमारास बारा वाजताच्या जिलब्या मारुती मंडळ, बाबूगेनू मित्र मंडळ मिरवणूकीत सहभागी झाली. यानंतर फुलांनी सजवलेल्या लाकडी रथातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टची मिरवणुकीला सुरुवात झाली. समर्थ, रमणबाग आणि श्रीराम पथकांनी मिरवणुकीत रंग भरले. मर्दानी खेळांनीही उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
शारदा-गजानन ‘विश्वगुरु‘ रथात विराजमान
यानंतर ‘विश्वगुरु’ रथामध्ये विराजमान अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाच्या मिरवणूकीला सुरुवात झाली. श्री स्वामी समर्थ यांची दहा फूट उंचीची मूर्ती पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होती. श्री दत्त महाराज यांचे थ्रीडी चित्र रथावर साकरण्यात आले होते. कर्दळी वनातून प्रगट झालेले श्री स्वामी समर्थ अशी सजावटीची संकल्पना होती. जयंत नगरकर यांच्या नगारा वादनाने वातावरण प्रफुल्लित झाले होते. शिवगर्जना आणि नादब्रह्म ढोल-ताशा पथकांनी पुणेकरांना ठेका धरायला लावला. मंडइच्या गणपतीनंतर गर्दी थोडी ओसरायला सुरुवात झाली. अन् पुन्हा एकदा हा सोहळा डोळ्यात साठवत ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा स्वतःलाच विश्वास देत मनाची समजूत घालत भाविकांची पावले घराकडे वळाली.