कौशिक आश्रमच्या शिबिरात ३८४ जणांचे रक्तदान

कौशिक आश्रमच्या शिबिरात ३८४ जणांचे रक्तदान
कौशिक आश्रमच्या शिबिरात ३८४ जणांचे रक्तदान

पुणे- कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने रविवारी आयोजित रक्तदान शिबिरात ३८४ जणांनी रक्तदान केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक प्रो. राजेंद्रसिंहजी उर्फ रज्जूभय्या यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिवर्षी हे शिबिर आयोजित करण्यात येते.

मित्रमंडळ कॉलनीतील कौशिक आश्रम येथे हे शिबिर भरवण्यात आले होते. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, प्रथितयश स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. लीना पाटणकर, संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. सुरेश उर्फ नाना जाधव आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र सोलापूर आणि जनकल्याण रक्तकेंद्र पुणे यांच्या सहयोगाने हे शिबिर आयोजिण्यात आले होते.

रक्तदानामुळे ज्याला रक्त मिळते त्याला तर फायदा होतोच, शिवाय जो रक्तदान करतो त्यालाही त्याचे लाभ मिळतात. म्हणून रक्तदान शिबिराचा उपक्रम खूप महत्त्वपूर्ण आहे, असे  डॉ. पाटणकर म्हणाल्या. कौशिक आश्रमसारख्या संस्था करत असलेले शिबिर आयोजनाचे कार्य अधिक गतीने पुढे जाईल, असा विश्वास पोतदार यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  शस्त्र परवाना आणि पोलिस संरक्षण मिळावे म्हणून स्वत:च्या गाडीवर घडवून आणला गोळीबार : युवासेना जिल्हाध्यक्षाचा प्रताप

थॅलेसेमियाच्या रुग्णांना सातत्याने रक्त द्यावे लागते. महाराष्ट्रात जनकल्याण रक्तकेंद्र साखळीमध्ये असलेल्या सर्व रक्तकेंद्रांमार्फत या रुग्णांना आवश्यक ते साहाय्य करण्यासंबंधीची योजना आखण्यात आली असून हे काम या रक्तकेंद्रांमार्फत सुरू झाले आहे, अशी माहिती प्रा. नाना जाधव यांनी दिली.

संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुहासराव हिरेमठ, ज्येष्ठ प्रचारक श्रीधरपंत फडके, रक्ताचे नाते या संस्थेचे राम बांगड तसेच विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिबिराला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. संस्थेचे कार्यवाह राजाभाऊ पानगावे यांनी प्रास्ताविक, नागेश पाटील यांनी सूत्रसंचालन आणि मंदार सहस्त्रबुद्धे यांनी आभार प्रदर्शन केले.

 सचिन कदम यांचे ८३ वे रक्तदान

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिकारी सचिन कदम यांनी शिबिरात भाग घेत ८३ वे रक्तदान केले. महाविद्यालयात १९९१ मध्ये अकरावीत प्रवेश घेतला तेव्हापासून कर्तव्याच्या भावनेतून रक्तदान करत असल्याचे त्यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love