राष्ट्रीय दृष्टीचा क्रांतीकारी संत – संत शिरोमणी नामदेव


संत शिरोमणी नामदेवांनी थेट पंजाबात विठ्ठलभक्तीची ध्वजा फडकावून केलेले कार्य त्यांच्या व्यापक राष्ट्रीय दृष्टीचेच दर्शन आहे. शिखांच्या ‘गुरु ग्रंथसाहिब’ मध्ये नामदेवांच्या अभंगाचा समावेश आणि हिंदी निर्गुण भक्तीचे आद्यकवी म्हणून त्यांना प्राप्त झालेले स्थान हा नामदेवांचा उत्तर दिग्विजय आहे. संत चोखामेळा व संत जनाबाई यांचा व्यक्तिविकास हे नामदेवांचे पारमार्थिक क्रांती कार्य आहे. आज त्यांची ६७० वी पुण्यतिथी असून चालू वर्ष (२०२०) हे नामदेवांचे सप्त शतकोत्तर सुवर्णजयंती (७५०वे) वर्ष आहे. त्यानिमित्त नामदेवकार्याचे विद्याधर ताठे यांनी केलेले प्रेरणादायी अक्षरस्मरण……

भक्तभागवत बहुसाल ऐकिले । बहु होऊनि गेले, होती पुढे ।परी नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व । हा रस अद्भूत निरूपम ।।

संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा, समकालिन संतसांगाती संत ज्ञानदेवांनी वरील शब्दांत केलेला गौरव, ही नामदेवांच्या एकूण कार्याची थोरवी आहे. खर तर सकल संतांनी एकमुखाने ‘ज्ञानराज माऊली’ असा संत ज्ञानदेवांचा गौरव केलेला आहे आणि इथे खुद्द ज्ञानदेव आपले संतसांगाती, पंढरीचा प्रेमभांडारी अशा नामदेवांचा गौरव करतात हेच मोठे विशेष आहे. आज आषाढ वद्य त्रयोदशी (दि.१८ जुलै) आहे; संत नामदेवांच्या ६७०व्या पुण्यस्मरणाचा मंगल दिवस आहे. विशेष म्हणजे यंदाचे वर्ष (२०२०) हे संत नामदेवांच्या ७५०व्या, म्हणजेच सप्त शतकोत्तर सुवर्णजयंतीचे वर्ष आहे. 

महाद्वारीची नामदेव पायरी

आज संत नामदेव पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी मोठा भक्तीउत्सव साजरा होतो. विठ्ठल मंदिराच्या प्रथम पायरीवर संत नामदेवांची परिवारासह समाधी आहे. विठ्ठल मंदिराचे महाद्वार हे नामदेवांचे जिवीच्या जिव्हाळ्याचे स्थान आहे.

‘नामा म्हणे नित्य महाद्वारी । कीर्तन गजरी सप्रेमाचे।’

हे त्यांचे अभंगवचन महाद्वाराचे माहात्म्य अधोरेखित करणारे आहे. महाद्वारातून विठ्ठलाच्या दर्शनास जाणाऱ्या संतसज्जनांच्या चरणाची धूळ लागावी या परम इच्छेने संत नामदेवांनी महाद्वारातील पायरीवरच समाधी घेतली.

नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे । वरी संत हिरे पाय देती ।

असा त्यांचा अभंग समस्त वारकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. विठ्ठलभक्तीची प्रेमध्वजा थेट पंजाबमध्ये फडकविणाऱ्या संत शिरोमणी नामदेवांचा हा विनय दासभाव, वारकरी मूल्याचें हृद्य दर्शन आहे. भक्ती क्षेत्रात ना कोणी मोठा, ना छोटा. ना उच्च वर्णी , ना शूद्र. ना कोणी महान संत, ना कोणी सामान्य भक्त. इथे सर्व समान. केवळ भक्तीभाव महत्वाचा.

अधिक वाचा  100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन

‘उच नीच काही नेणे भगवंत’; ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’,  ‘यातायाती धर्म नाही विष्णुदासा।’, ‘कुळ जाती वर्ण । आघवेचि गा अकारण ।

‘ हे संतांचे उद्गार ज्ञानदेव-नामदेव प्रणित वारकरी सत्त्वधारेच्या समता-समसरसताधिष्ठित व्यापक दृष्टीचे दर्शन आहे. संत नामदेव या सत्त्वधारेचे राष्ट्रीय विस्तारक आहेत. संत बहिणाबाई यांनी ‘नामा तयाचा qककर । तेणे केला विस्तार ।’ अशा शब्दात संत नामदेवांच्या ऐतिहासिक कार्याची अभंग नोंद केलेली आहे.

संत नामदेवांचे कार्य बहुमुखी आहे, त्याला अनेक पैलू आहेत. संत नामदेवांचा जन्म ज्ञानदेवांपूर्वी ५ वर्ष झाला असून ज्ञानदेव समाधीस्त झाल्यानंतर पुढे तब्बल ५० पेक्षा अधिक वर्षे वारकरी संप्रदायाची, विठ्ठल भक्तीची ध्वजा नामदेवांनी डौलाने फडकत ठेवली, विठ्ठल भक्तीला राष्ट्रीय स्वरूप दिले. संत नामदेवांची अभंग गाथा ही त्यांची प्रेरक वाङ्मयमूर्ती आहे. त्या अभंगांमधील विविधता थक्क करणारी आहे.  मराठी संत साहित्यामध्ये ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा याप्रमाणेच ‘नामदेव अभंग गाथेला’ अनन्य असे स्थान आहे. नामदेवांचे लडिवाळ अभंग मराठी भाविकांची दौलत आहे. भक्ती व ज्ञानाचा अपूर्व संगम आहे. म्हणूनच संत ज्ञानदेवांनी ‘हा रस अद्भूत आहे’ असा नामदेवांचा सार्थ गौरव केलेला आहे. संत नामदेवांच्या अभंग गाथेमध्ये वेगवेगळी ३१ प्रकरणे असून २३३७ अभंग आहेत.

संपूर्ण परिवार विठ्ठलभक्त

संत नामदेवांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा संपूर्ण परिवार-कुटुंब विठ्ठलभक्तीने भारलेले होते. त्या सर्वांच्या अभंग रचना आहेत. ‘नामदेव परिवाराची भावकविता’ म्हणून तिचे एकत्रित दर्शन अनोखे आहे. एवढेच नव्हे तर घरात धुणी-भांडी करणाऱ्या दासी जनीलाही त्यांनी विठ्ठलभक्तीचा नाममंत्र देऊन आत्मविकासाचा अवसर दिलेला आहे. जनीचे सुमारे ३५० अभंग नामदेव गाथे मध्येच समाविष्ट आहेत. दासी जनी ते संत जनाबाई हा एका मोलकरणीचा व्यक्तिविकास हे संत नामदेवांच्या कार्याचा प्रताप आहे. हे एक सामाजिक क्रांतीचेच दर्शन आहे. संत नामदेवांनी जनाबाईला लिहिण्यासही शिकवून साक्षर केले होते. खुद्द जनाबार्इंनी लिहिलेला ‘बाई । मी लिहिणे शिकले सद्गुरूरायापाशी।’ हा अभंग, संत नामदेवांनी केलेल्या स्त्री शिक्षणाचा, साक्षरतेचा ढळढळीत पुरावा आहे. संत जनाबाईंचा ‘स्त्री जन्म म्हणूनी न व्हावे उदास।’ हा अभंग समस्त स्त्री वर्गात संत नामदेवादी संतांनी निर्माण केलेल्या आत्मविश्वासाचेच शब्दरूप आहे. पण विद्यापीठीय अभ्यासक, व सामाजिक, राजकीय नेत्यांनी संत नामदेवादी संतांच्या या क्रांतीकार्याचे-अपूर्व योगदानाचे पाहिजे तेव्हढे नेमके श्रेय त्यांना दिलेले नाही. संत कार्याची धार्मिक कार्य म्हणून पुरोगाम्यांनी केलेली उपेक्षा, हे त्यांचे करंटेपण आहे.

अधिक वाचा  आय. ए. सी. एस. - भारतीय विज्ञान रत्नांची खाण :राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त

उत्तर दिग्विजयाचे अक्षरस्मारक

तेराव्या शतकात दळणवळणाची-वाहतुकीची साधने उपलब्ध नसताना संत नामदेवांनी महाराष्ट्रातून गुजरात, राजस्थान मार्गे पंजाब पर्यंतचा केलेला प्रवास त्यांच्या व्यापक राष्ट्रीय-एकात्म दृष्टीचेच द्योतक आहे. या सर्व राज्यात संत नामदेवांची अनेक स्मृतीमंदिरे आहेत. या मराठी सुपुत्राने तिकडच्या बोलीभाषा आत्मसात केल्या, तेथील लोकजीवनाशी समरस झाले एवढेच नव्हे तर खडीबोली मुखबानी मध्ये त्यांनी अनेक अभंग रचना केल्या. थोर लेखक – qचतक रामलाल यांनी ‘भारत के संत महात्मा’ या ग्रंथात संत नामदेवांच्या कार्याचा विशेष गौरव केलेला आहे. बहोरदास, जाल्लो, केसो हे नामदेव शिष्य पंजाबात प्रसिद्ध आहेत. बहोरदास यांनी पंजाब मधील ‘घुमान’ येथे नामदेवजी मंदिर बांधलेले आहे. तसेच एक तलाव, गुरुद्वाराही आहे. काही वर्षापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे झाले ते संत नामदेवांनी पंजाबशी निर्माण केलेल्या भक्तीसंबंधामुळेच. संत नामदेवांची विशेष थोरवी म्हणजे त्यांचे ६१ अभंग शिखांच्या परमपवित्र अशा ‘गुरू ग्रंथसाहिब’ धर्मग्रंथात समाविष्ट आहेत. मराठी संताचे शिख धर्मग्रंथातील हे समावेशन संत नामदेवांच्या उत्तर दिग्विजयाचे अक्षर स्मारक आहे.

हिंदी संतसाहित्याचे प्रेरणास्थान

संत नामदेवांच्या कार्याने गुरू नानकदेव, संत मिराबाई, संत नरसी मेहता, रविदास, संत महात्मा कबीर, यासह पश्चिम, उत्तर भारतातील अनेक संत, महंत, भक्त प्रभावित झालेले होते. या सर्व संतांनी नामदेवांची स्तुती गाऊन गौरव केलेला आहे. महात्मा कबीर, थोर कवी जयदेवां बरोबर नामदेवांची गणना करतात.

‘गुरू परसादी जैदेव नामा । प्रगटि कै प्रेम इन्हे कै जाना ।’

राजस्थानातील थोर संत दादू दयाल यांनीही नामदेवांची थोरवी गायलेली आहे. हा सर्व नामदेव गौरव मराठी माणसांनी मूळातून वाचून सार्थ अभिमान बाळगला पाहिजे. हिंदी भाषेतील संत साहित्याचे म्हणजे संतमतांचे, आपले नामदेवमहाराज हे आद्य प्रवर्तक आहेत. आचार्य रामचंद्र शुक्ल, डॉ. राजनारायण मौर्य, डॉ. भगिरथ मिश्र, हजारीप्रसाद द्विवेदी, देवीqसह चौहान, डॉ.विनय मोहन शर्मा या समस्त हिंदी साहित्यिक विद्वानांनी संत नामदेवांच्या कार्याची मिमांसा करून त्यांच्या अपूर्व योगदानास वंदन केलेले आहे. मराठी संत साहित्यात सगुणभक्तीपर अभंग रचना करणारे नामदेव हिंदी साहित्य जगतात निर्गुण भक्ती काव्याचे आदि कवी मानले जातात.

अधिक वाचा  अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

‘तूज सगुण म्हणू की निर्गुण रे। सगुण निर्गुण एक गोविंदु रे ।’

हा ज्ञानदेवांचा समन्वयवादी तत्वविचार संत नामदेवांनी आपल्या कृतीतून दर्शविलेला आहे.

अस्पृश्योद्धाराचे कार्य 

संत नामदेव हे संत चोखामेळा व परिवाराचे गुरू आहेत. चोखोबांना विठ्ठलभक्तीचा नाममंत्र देऊन आत्मसन्मानित करण्याचे, अस्पृश्योद्धाराचे खरे कार्य सर्व प्रथम संत नामदेवांनी केलेले आहे. संत चोखोबांचा मेहुणा बंका महार हाही संत व कवी होता. त्यांनी एका अभंगात संत नामदेवांचा चोखोबांचे गुरू म्हणून केलेला उल्लेख असा आहे. ‘नामदेवे हात चोखयाचे शिरी ।’संत चोखामेळा, त्याची पत्नी सोयरा, चोखोबांची बहिण निर्मला, मेहुणा बंका आणि मुलगा कर्ममेळा हे सर्व विठ्ठलभक्त कवी आहेत आणि त्याचे सारे श्रेय संत नामदेवांना आहे. संत चोखोबांचा एका दुर्घटनेत मंगळवेढा येथे देहांत होताच त्यांच्या अस्थी पंढरपुरास आणून चक्क विठ्ठलमंदिराच्या महाद्वारात संत नामदेवांनी समाधी बांधली. गुरूने शिष्याची समाधी बांधल्याची ही जगाच्या इतिहासातील अपवादात्मक घटना असून ते कार्यही नामदेवांचे आहे. वारकरी संतांनी स्पृश्यास्पृश्य भेदाभेद नष्ट करून पारमार्थिक समतेचे कशा प्रकारे कार्य केले, त्याचे हे ठळक उदाहरण आहे. संत नामदेव हे आद्य वारकरी कीर्तनकार मानले जातात.

‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।’

असे त्यांचे कीर्तन भक्ती व ज्ञानाचे दीप प्रज्वलीत करणारे सामाजिक प्रबोधनाचे-जनजागरणाचे साधन होते. मराठीतील पहिले आत्मचरित्रकार, पहिले चरित्रकार, पहिले प्रवास(तीर्थयात्रा) वर्णनकार आहेत. पण त्याची योग्य ती दखल समीक्षकांनी घेतलेली नाही. ज्या भारतीय एकात्मतेचा आपण सतत घोष करतो. त्याचा कृतीरूप पाया संत नामदेवांनी घातलेला आहे. संत नामदेवांची समाजसन्मुखता, त्याचा नीतीबोध, त्यांचे संघटन कौशल्य आणि ‘कोणाही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।’ असा दृष्टिकोन आजही आदर्श व अनुकरणीय आहे. संत व संतसाहित्य हे शाश्वत दीपस्तंभ आहेत. म्हणूनच आजच्या आधुनिक युगातही संत नामदेवांचे कार्यस्मरण प्रेरणादायी व दिशादर्शक पाथेय आहे.

धन्य धन्य नामदेवा । केला उपकार जीवा । -संत एकनाथ                

  विद्याधर मा.ताठेभ्रमणध्वनी-९८८१९०९७७५,Email:  [email protected].

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love