मुंबई : मी वयाच्या साठाव्या वर्षी मुख्यमंत्री झालो असलो तरी ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं नाही. हा केवळ योगायोग आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ‘ मी इथं बसलेलो आहे, माझी मुलाखत सुरु आहे, तोवर सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हानही ठाकरे यांनी भाजपला आणि विरोधकांना केलं आहे.
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची घेतलेली ‘एक शरद, सगळे गारद’ ही मुलाखत चांगलीच गाजली. राजकीय क्षेत्र त्यामुळे ढवळून निघाले आहे. पवार यांच्यानंतर राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो संजय राऊत यांनी ट्वीट केला आहे. संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत 25 आणि 26 जुलैला प्रसारित होणार आहे.
महाविकास आघाडी सरकारवर तीन चाकी सरकार आहे असा आरोप होत आहे? असा सवाल राऊत यांनी या मुलाखतीत केल्यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात की,” केंद्रात किती साखळ्या आहेत, याचाही विचार करा. संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला शिवसेना पसरवायची आहे? आत्मनिर्भर शिवसेना आपल्याला करायची आहे? असं राऊत यांनी विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मी आजदेखील माझी सही आपला नम्र म्हणूनच करतो. आज तुम्हाला चीन नको आहे, मात्र पुढे जाऊन कालांतराने भारत-चिनी भाईभाई होणार नाही का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या प्रोमोमध्ये केला आहे.
मुलाखतीतील मुद्दे
सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीमध्ये राऊत यांनी अनेक विषयांना हात घालून ठाकरे यांना बोलते केले आहे. ठाकरे यांनी राऊत यांच्या विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव, कोरोनाची परिस्थिती, लॉकडाऊन, महाविकास आघाडीतला असमन्वय, राम मंदिर, भाजपसोबत संबंध, सत्तापालट या विषयांवर उद्धव ठाकरे यांना थेट प्रश्न विचारण्यात आले आहेत. राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ही त्यांची पहिली मुलाखत आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्राबरोबरच सर्वांनाच या मुलाखतीची उत्सुकता आहे.
भाजप आणि शिवसेनेच्या अंतर्गत संघर्षामुळे मतभेद होऊन युती तुटली. त्यानंतर शिवसेनने राष्ट्रवादीशी जवळीक केली आणि त्यातून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. आता भाजपा राज्यात सत्ता पालट करेल अशा चर्चांना उधाण आले आहे. याबाबतही ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये सडेतोड उत्तर दिले आहे. ठाकरे या मुलाखतीत लॉकडाऊनबाबत बोलताना म्हणतात, ‘मी म्हणजे ट्रम्प नाही, डोळ्यांसमोर लोकं मरताना मी बघू शकत नाही’.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत यावरून त्यांच्यावर आरोप केले जात आहे. खासदार नारायण राणे यांनी यावरून ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री मंत्रालयात येत नसल्यानं मंत्रालय भकास झालं आहे, अशी टीका त्यांनी केली होती. त्यावरही राऊत यांनी ठाकरे यांना प्रश्न विचारला आहे. त्यावरही ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
राज्यात विविध विद्यापीठांच्या विशेषत: तृतीय सत्र अथवा शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून बरेच वादंग झाले आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यातही परीक्षा ण घेण्याचा निर्णय झाला आहे. मग महाराष्ट्रातच परीक्षा घेण्याबाबत आग्रह का? याबाबतही उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.