पुणे(प्रतिनिधि) : शहर पोलीस आयुक्तालयामार्फत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेदरम्यान पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मैदानी चाचणीदरम्यान धावत असताना त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. त्याला हृदय विकाराचा झटका आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याला तात्काळ ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामधील शिवाजीनगर कवायत मैदानावर शनिवारी सकाळी घडल्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.
तुषार बबन भालके (वय २७, रा. कौठे बुद्रुक, ता. संगमनेर, जि.अ.नगर) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. ससून रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युमागचे निश्चित कारण समजेल, असे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले.
तुषारच्या मागे आई-वडील, बहीण असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती कळविण्यात आली आहे. त्याचे कुटुंबीय शेती करतात. तुषार गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करत होता. पुणे पोलिसांच्या भरती प्रक्रियेदरम्यान त्याने अर्ज केला होता. त्याला भरती संदर्भात कॉल आलेला होता. त्यानुसार, पुण्यात तो भरतीसाठी आला होता. शनिवारी (६ जून) सकाळी आठच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर मैदानी चाचणी सुरू होती. जवळपास ८०० ते ८५० उमेदावार मैदानी चाचणीसाठी आलेले होते. या उमेदवारांना क्रमांक (चेस्ट नंबर) देण्यात आले होते. उमेदवारांना धावण्यासाठी १६०० मीटरचे अंतर निश्चित करून देण्यात आले होते. धावायला सुरुवात केल्यानंतर तुषार काही वेळातच चक्कर आली. तो मैदानावरच खाली पडला. ड्यूटी वरील पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.