नतद्रष्ट चीन!


‘समर्थ भारत’ ‘पांचजन्य’ फुंकून स्वतःचं अस्तित्व’ समग्र जगाला दाखवून देतो आहे!

कैलास मानस यात्रेला २५ वर्ष होवून गेली आहेत. पण चीन हा शब्द ऐकताच अजूनही माझ्या डोक्यात तिडीक जाते. १९९५ साली मी भारतीय प्रशासनाच्या वतीने कैलास मानसला गेले होते. तेव्हाच्या आठवणी अजून ताज्या आहेत. कैलासला जायचं निश्चित झाल्यावर जी कागदपत्रं तयार करायची होती त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चीनचा व्हिसा ! चीनच्या १९६२ च्या युद्धात तिबेटचा जो भूभाग चीननं गिळंकृत केला होता; की नेहरूंनी दिला होता??? तो म्हणजे हाच कैलास – मानसचा परिसर.

त्यामुळे अर्थातच चीनचा व्हिसा आवश्यक होता. आता तिथं जायला तरी मिळतं आहे. १९६२ च्या युद्धानंतर बिघडलेल्या संबंधामुळे १९६२ ते १९८२ अशी तब्बल २० वर्ष  चीननं या यात्रेवर बंदी घातली होती. केवढं दुर्दैव आपलं की, आपल्याच तीर्थस्थानाच्या दर्शनाला जायचं तर चीनची परवानगी घ्यावी लागते आहे. बरं नुसती परवानगी नाही तर चक्क ५०० अमेरिकन डॉलर्सची ‘दक्षिणा’ चीनला द्यावी लागते. आता तर अजून जास्त द्यावे लागतात. एवढे पैसे देऊन सुद्धा ते आपल्याला कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून देत नाहीत. त्यांच्या भूमीवर पाऊल ठेवू देतात ही उपकाराची भावनाच जास्त! क्षणोक्षणी आपल्याला त्यांच्या कपटी आणि नीच मानसिकतेचा अनुभव येत असतो.

भारताची सरहद ओलांडून चीनव्याप्त तिबेटमध्ये प्रवेश केल्यावर आमच्या २७ जणांच्या संघाला त्यांनी दोन गाईड दिले होते. पण दोघंही प्रचंड दारू पिऊन तर्रर झालेले… त्यांच्या भरवश्यावर आम्ही ३/४ किलोमीटर पर्वत उतरून १७ हजार ५०० फूट उंचीवरून १५ हजार फुटांवर आलो. तिथं एका खटारा, तुटक्या-फुटक्या खिडक्या असलेली आणि बसण्यासाठी बाकडी नसलेली बस आम्हाला देण्यात आली. खिडक्यांच्या काचा तुटलेल्या असल्यानं खाचखळग्यातून बस जाताना त्या खळकन फुटून खाली पडत होत्या. बसचा ड्रायव्हर तर दारू पिऊन तर्र झालेला. तीन-चार फूट पाणी असलेले आणि वेगाने वाहणारे नाले-ओढे ओलांडून, हिंदकळणाऱ्या त्या बसमधून आम्हाला तकलाकोट इथं नेऊन सोडण्यात आलं. तिथं इमिग्रेशन, कस्टम्स, चेकिंग इत्यादी सोपस्कार पार पडले. तिथल्या मुक्कामावर स्वच्छतागृहाची सुविधा नव्हती. आवाराच्या बाहेर सार्वजनिक जागेत स्वच्छतागृह (टॉयलेट) असा उल्लेख होता. जिथं दारं आणि पाणी दोन्ही नव्हतेच.

अधिक वाचा  आद्यकवी महर्षी वाल्मिकी

अशा असुविधांबद्दल तिथं तक्रारदेखील करता येत नव्हती. त्यांचं डोकं केव्हा फिरेल ते सांगता येत नव्हतं, ते मग उद्धट बोलणे आणि उर्मट वागणे याची परिसीमा गाठत असत.आपल्याकडे हिमालयात तीर्थयात्रा करताना जसा घोड्यांचा उपयोग होतो तसाच कैलास-मानस यात्रेत याक या प्राण्याचा उपयोग होतो. आमच्या परिक्रमेदरम्यान तिथले याकवाले किंवा पोर्टर्स नेहमीच दात विचकावून आम्हाला अपमानास्पद वागणूक देत होते. वाटेतल्या मुक्कामाच्या जागा यथातथाच असत. खिडक्या, दारं तुटलेली असायची. त्यामुळे बर्फवृष्टी झाली की बर्फाचा खच दारात जमा झालेला असायचा. मानस परिक्रमेच्या वेळी तर कहरच झाला. मानस सरोवराच्या काठी चीनी सैनिक जाणूनबुजून दारू पिऊन, धिंगाणा घालून, दारूच्या रिकाम्या बाटल्या फोडून इकडे-तिकडे फेकून देत असत. मानस सरोवरासारख्या नितांत सुंदर जागी असं चित्र पाहून मन विषण्ण होत होतं, पण काय करणार? या परिस्थितीबद्दल बोलून स्वतःवर संकट ओढवून घेणं अत्यंत जोखमीचं होतं. इतकंच काय? आम्हाला भारत सरकारकडून खास सूचना देण्यात आल्या होत्या की कोणीही एकट्याने आपला संघ सोडून कुठेही जायचं नाही, महिलांनी तर नाहीच! कारण, चीनी सैनिकांवर भरवसा ठेवणं मुळीच शक्य नाही. (अपहरण, लूटमार अशा गोष्टी त्यापूर्वी घडल्या होत्या).

परतीच्या वेळीसुद्धा दारूच्या नशेत असलेल्या बस ड्रायव्हरनं आमच्या बसमधल्या पुरुषांना अपरात्री जबरदस्तीनं बसमधून उतरायला लावलं आणि बेफामपणे बस चालवत फक्त महिलांना घेवून पुढे गेला. प्रचंड मानसिक दबावाखाली काढलेले, मनस्ताप देणारे ते दहा दिवस आठवले की अजूनही अंगावर काटा येतो.या असुविधांबद्दल भारत सरकारनं सातत्यानं काही वर्ष चीन सरकारकडे तक्रार केल्यानंतर आता कोठे ए. सी. बस उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि तकलाकोट इथली निवास व्यवस्था आणि इतर कॅम्पच्या ठिकाणी जरा सुधारणा झाली आहे. हेही नसे थोडके! 

आपल्या अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या चीनच्या सरहद्दीजवळच्या एका गावातला अनुभव वेगळाच आहे. गेली २० वर्ष मी पूर्वांचलात म्हणजे ईशान्य भारतात जाऊन दंतरोग चिकित्सा करते आहे. अरुणाचल प्रदेशातल्या ‘न्यापीन’ या गावापासून चीनची सरहद्द १५ कि.मी. अंतरावर आहे. या गावात माझा दंतचिकित्सेचा कॅम्प सुरू असताना तिथले लोकप्रतिनिधी मला भेटायला आले होते. त्यांनी सांगितलेला एक किस्सा अजबच होता. भारत सरकारतर्फे त्यांना एका मीटिंगसाठी चीनला जायचं होतं. तेव्हा चीन सरकारनं त्यांना ‘तुम्हाला व्हिसाची आवश्यकता नाही’ असं सांगितलं. कारण, त्या चीनी भाईनं त्यांना सांगितलं की, तुम्ही अरुणाचली आहात, अरुणाचल हा चीनचाच भाग आहे. तुम्हाला तुमच्या ‘होमलँड’ला येण्यासाठी व्हिसा किंवा परवानगीची गरजच नाही. तुम्ही-आम्ही एकच आहोत. आम्ही तुमचे स्वागत करतो! बघा म्हणजे किती योजनापूर्वक, धूर्तपणे चीन अरुणाचलमधल्या नागरिकांचं ‘ब्रेन वॉश’ करतो आहे.

अधिक वाचा  भक्तीची शक्ती जागविणारे संत शिरोमणी नामदेव महाराज

चीनची राजनीती किती खालच्या पातळीवर गेली आहे याचा अनुभव आपल्या देशानं २००८ साली घेतला.तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अरुणाचल दौऱ्याला चीनने विरोध केला होता. अर्थात त्याचा निषेध करण्यासाठी त्यावेळी अरुणाचलमध्ये काम करणारा विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता निरव गेलानी यानं ताबडतोब पाचशेहून अधिक युवकांना एकत्र करून चीनचा निषेध करणारी मोठी रॅली राजधानी इटानगरमध्ये घडवून आणली, अशा चैतन्यमयी घटनेची मी साक्षीदार आहे.‘तवांग’ हा शब्द ऐकल्यावर आपल्याला आठवतं ते १९६२ चे चीनयुद्ध. अजूनही अरुणाचल प्रदेशमध्ये जागोजागी चीनी आक्रमणाच्या खुणा दिसतात. चीनी सैनिक १९६२ च्या ऑक्टोबरमध्ये पूर्वेकडील हिमडोंगर उतरून हॉलांग – आमलीयांगपर्यंत आले होते. तर पश्चिम भागातल्या पहाडावरून चीनी सैनिक साध्या वेशात उतरले होते. तवांगमध्ये स्थानिक नागरिकांसमवेत राहून, शेतात कापणीच्या कामात मदत करून त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला आणि आधीच निश्चित केलेल्या तारखेला ‘हिंदी चीनी भाई भाई’ म्हणत त्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला. त्यातून भीषण युद्धाला तोंड फुटलं. आपल्या लष्कराची तयारी नव्हती. सरकारनं चुकीचे निर्णय घेतले. परिणामी चीनी सैन्य तवांग काबीज करून सेला पास, जसवंतगढ पार करून तेजपूरला येवून धडकले. भयानक नरसंहार झाला. आपले २ हजार ४२० जवान धारातीर्थी पडले आणि आपण हे युद्ध हरलो.२००७ साली मी तवांगला गेले तेव्हा विवेकानंद केंद्राच्या शाळेच्या बांधकामाचं काम बघणारे अभियंता माझ्याबरोबर होते. त्यांनी त्यांच्या घरातला एक अनुभव सांगितला. त्यांच्या आजी-आजोबांच्या घरात राहून शेतात काम करून चिन्यांनी अचानक आक्रमण केलं. त्यामुळे त्यांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक धक्का बसला होता.

अधिक वाचा  अहिंसक स्वातंत्र्य आंदोलनासाठी झटणारे जतरा टाना भगत

त्यांचा हा अनुभव ऐकून मन आणि शब्द गोठून गेले.तेव्हापासून मनात नेहमी विचार येत असे, त्यावेळी झालेल्या दारूण पराभवातून, इतिहासातून, शोकांतिकेतून आपण काही शिकलोय का?तर उत्तर आहे होय! आपण जरूर शिकलोय!! हुंकारात्मक परिवर्तन घडतंय. याचं कारण पूर्वांचल अत्यंत निष्ठेनं काम करत असलेले सेवाव्रती आणि तिथले कार्यकर्ते. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे जनमानसात जागरुकता आली आहे. सरहद्दीपाशी राहणारे बरेच युवक ‘सीमांत चेतना मंच’ बरोबर जोडले गेले आहेत. सीमेवर जिथं काटेरी कुंपण नव्हतं तिथं सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफच्या) जवानांबरोबर जमिनीचं मोजमाप करायला स्थानिक युवक मदत करू लागले आहेत.

गावागावातून सीमेबाबत जागरण करणारे कार्यक्रम होत आहेत.१५ जून २०२० ला लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या आगळीकीनंतर अरुणाचलच्या अनेक गावातून, रस्त्यांवरून चीनविरोधी घोषणा देणारे मोर्चे काढण्यात आले. चीनच्या अध्यक्षांचे पुतळे जाळण्यात येत आहेत. चीनी माल-सामानाविरोधी उग्र आंदोलने करण्यात येत आहेत. भारतीय वस्तूंचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

अरुणाचलच्या काही नागरिकांनी “आम्ही अरुणाचली, आम्ही भारतीय” अशा प्रकारे संदेश देणारे व्हीडीओ पाठवले आहेत.इतकंच नाही तर कोलोरियांग जिल्ह्यातल्या तरुणांनी चौकाचौकात एकत्र येऊन भारत सरकार आणि भारतीय सेनेला आवाहन केलं आहे की, आर्मीमध्ये एखाद्या ‘अरुणाचल रेजिमेंटची’ स्थापना करावी. आम्ही सर्व अरुणाचली भारत मातेच्या संरक्षणासाठी सरहद्दीवर लढायला तयार आहोत. तेव्हा सांगायला अभिमान वाटतो आहे की, १९६२ मधल्या अनुभवामुळे चीनच्या दबावाखालील वावरणारं भारत सरकार आणि अरुणाचल प्रदेशातली जनता त्या मानसिकतेतून बाहेर पडली आहे. तिथे कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ‘व्यक्ती निर्माणातून देशनिर्मिती’च्या कार्यामुळे २०२० सालचा ‘समर्थ भारत’ आकाराला येतो आहे. ‘पांचजन्य फुंकून स्वतःचं अस्तित्व’ समग्र जगाला दाखवून देतो आहे!जयहिंद!

डॉ. प्रतिभा आठवले, अहमदाबाद ९४२६३६७४७२ 
(लेखिका गेली २० वर्षे पूर्वांचल आणि त्याचबरोबर अनेक वर्ष काश्मीर खोऱ्यात सेवाभावी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे ‘पूर्वरंग-हिमरंग’ हे पुस्तक प्रसिद्ध असून त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.)

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love