पूजा वनदुर्गांची : धैर्यशील हमसाय

महाराष्ट्र लेख
Spread the love

नवरात्री अर्थात निसर्गाशी एकरूप होऊन एकत्रित आनंदोत्सव साजरा करण्याचा  चैतन्य सोहळा.  नवरात्राला  ऊर्जा, शक्ती, कर्तृत्व, शौर्य, पराक्रमाची परंपरा आहे. नवरात्र म्हणजे आसुरी विचारसरणीवर विजय मिळविण्याचे दिवस. आपण  भारतीय आपल्या ‘देशाला’ मातेच्या म्हणजेच देवीच्या रूपात पाहतो. ( भारतमाता )

नवरात्रात  देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आजूबाजूला शोधले तर ही देवीची नऊ रूपे आपल्या घरात, आसपास आढळतात. आई, बहिण, मैत्रीण, नणंद, सासू, आजी, मावशी, आत्या, लेक, आणि आपली कामवाली. अशा विविध रुपात आपल्याला  कात्यायिनी, शैलपुत्री, सरस्वती, महादुर्गा भेटतात. परंतु आपण दखल घ्यायलाच हव्यात अशा, तसेच समाजाकडून काहीवेळा दुर्लक्षित तर काहीवेळा न्यूनगंड असल्याने पुढे न आलेल्या, रानावनात विखुरलेल्या, ज्ञानाचे भांडार असलेल्या स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या, इतरांच्याही जीवनात मोलाची भर टाकणाऱ्या शक्तीची पूजा करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा वनदुर्गांची आपणास माहिती नसते. अशाच काही वनदुर्गांचा परिचय नवरात्रीच्या निमित्ताने करून देत आहोत. त्यांची ऊर्जा, आपल्या संस्कृशीची जुळलेली घट्ट नाळ या निमित्ताने समाजासमोर आणण्याचा हा प्रयत्न..

                                                  ♦️धैर्यशील हमसाय♦️

घरात शिक्षणाची कोणतीच परंपरा नाही. घरची परिस्थितीही बेताचीच. मात्र परिस्थितीशी दोन हात दुर्गम भागात राहणारी एक मुलगी आव्हानात्मक कार्य करत शिक्षणाची गंगा सर्वत्र पोचवत आहे. हमसायदी हाफफ्लांबर असे तिचे नाव असून तिच्या कार्याची ही ओळख —

रायपूरच्या शबरी कन्या छात्रावासात पहिल्या वर्गापासून शिकायला आलेली हमसाय पदवीचे शिक्षण घेऊन नागालँडमध्ये परत गेली.  हमसायदी हाफफ्लाम्बर नागालँडच्या दिमापूर जिल्ह्यातील मांगलुमुऊ या गावात राहणारी दिमासा जनजातीतील  मुलगी.  आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कोन्याक या अंत्यंत दुर्गम भागात ज्ञानदानाचे आव्हानात्मक काम स्वीकारत कल्याण आश्रमात घेतलेल्या शिक्षणाचा  वारसा जपला. हमसायच्या घरातील परिस्थिती थोडी बेताचीच. वडील नेहमी आजारी असायचे.घर छोटंसंच.घरातलं सगळं तिची आई,छोटी बहिण सुशिला व भाऊ वहिनी बघायचे. नृत्य,संगीत आणि पाककला यामध्ये हमसाय पारंगत. वसतिगृहात मुलींचे नृत्य बसवायचे आहे, त्यांना गीत शिकवायचे आहे लगेच हमसाय तयार..संगीतामध्ये सुद्धा ती विशारद झाली.

तिच्या घरी जाण्याचा एकदा योग आला.  आम्हाला तिच्या घरच्यांशी संवाद साधताना एकमेकांची भाषा समजत नव्हती परंतु चेहऱ्यावरील भाव मात्र लपत नव्हते. पालक म्हणून काळजीचा वणवा काय असतो याचा प्रत्यय हमसायच्या बोलण्यातून पदोपदी येत होता.  आमच्याकडे जादूटोणाही खूप चालतो. मुलगी इतक्या दूर शिकायला आहे. ती घरी येते तेव्हा गावातले लोकच करणी करण्याचा प्रयत्न करतात.आपसात वैरभाव आहे,अंधश्रद्धा आहे म्हणून आम्ही घरी फार कमी राहतो, आजी आजोबांच्या घरी राहायला जातो.

कल्याण आश्रमासाठी काही करायचे यासाठी हमसाय सतत धडपडत होती.  नागालँडमध्ये हिंदीला खूप मागणी आहे,छत्तीसगडमधून दहावी,बारावी पास होऊन जरी गेले तरी तिकडे सरकारी शाळेत हिंदी शिक्षक म्हणून नोकरी लागते. हमसायने सुद्धा तिकडच्या सरकारी शाळेत रीतसर अर्ज केला,सगळी कागदपत्रे जमा केली आणि तिला मुलाखतीसाठी बोलविले गेले….मुलाखत सुरु झाली..

“मुलाखतीत तिने कल्याण आश्रम,विद्याभारती,रायपूर, छत्तीसगड अशी सगळ्यांची नावे उज्वल  केली,”तू कोन्याक मध्ये जाशील शिक्षिका म्हणून?” असे विचारताच तीने ते शिवधनुष्य लीलया पेलले.

कोन्याक  हा  अत्यंत डोंगराळ,निसर्गरम्य भाग असून बाराही  महिने प्रचंड थंडी,पाऊस असतो. दिमापूर पासून बारा ते चौदा  तास त्या गावात जायला लागतात. रस्ता  अत्यंत वळणावळणाचा,डोंगर दऱ्यांचा. काही किलोमीटरचा रस्ता असा आहे  की दोन्ही बाजूने प्रचंड खोल दरी.  या भागात आठवड्यातून एकच दिवस बस जाते. १९५६ मध्ये मोनू या गावात वॉकचिंग ही सरकारी शाळा सुरू झाली, डोंगराळ भाग,मागासलेले गाव,शहरापासून खूपच आत असल्याने या गावात फारशा सुविधा नाहीत. विशेष कोणी तिथे जायला सुद्धा तयार होत नाही तिथे हमसायने आपल्याला  कल्याण आश्रमात मिळालेल्या शिक्षणाचा वसा पुढे नेण्यासाठी कठोर परिश्रम केले.  त्या वनवासीं गावात त्या समाजासाठी,मुलांसाठी काहीतरी करता येईल हा हेतू तिच्या मनात  होता. अनुशासन, छात्रावास अभ्यास पद्धती,  विविध स्पर्धा, स्पर्धांची तयारी, टीम वर्क अशा कल्याण आश्रमातील शिक्षणाचा तिला उपयोग झाला. परिस्थितीला न डगमगता  हमसायने त्या शाळेतील मुलांना आपल्या प्रेमाने जिंकले, त्यांना राष्ट्रगीत, राष्ट्रगान,अन्य देशभक्ती गीते शिकवली. .त्या विद्यार्थांना हिंदी अजिबात येत नव्हते, हमसायने  त्यांना लिहिणे,वाचणे,बोलणे शिकविले आणि एक  वर्षाच्या अथक प्रयत्नांनी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध रीतीने संपूर्ण हिंदीत साजरा केला! संपूर्ण वंदेमातरम प्रथमच त्या शाळेत गायले गेले, देशभक्ती गीतं गायली गेली. वसतिगृहात शिकलेलं सगळं काही चांगलं ती त्या विद्यार्थ्यांना देत होती, हेच  तिचं कर्तृत्व!

स्थानिक शासकीय  अधिकाऱ्यांनी सुद्धा हमसायच्या कामाची दखल घेतली.

कुठे छत्तीसगड, कुठे महाराष्ट्र, नागालँड, छोटेसे मांगलुमूऊ गाव आणि  दुर्गम असे मोनू गाव, कोन्याक सारखा मागास भाग…  स्वतःच्या कर्तृत्वानेच कामातील सातत्याने हमसाय मोठी होत गेली.

 या वनवासीं मुलीला ते जमलं होतं, खरंच खूप शिकण्यासारखं आहे या पोरीकडून…दु:खातही आनंदी राहणं, सतत संवाद संपर्क ठेवणं आणि खूप काही….

वैशाली देशपांडे

पश्चिम क्षेत्र महिला कार्य सहप्रमुख, वनवासी कल्याण आश्रम

(विश्व संवाद केंद्र पुणे )

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *