अहिल्याबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यकारभार करण्याची गरज – आनंद कांबळे

पुणे-मुंबई
Spread the love

पिंपरी- अहिल्याबाई होळकर यांनी कधीही राजा व प्रजा यांच्यात अंतर वाढू दिले नाही. जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या त्वरित सोडविण्याला त्यांचे प्राधान्य होते. जगातील कर्तुत्ववान स्त्रीयांपैकी अहिल्याबाई होत्या. त्यामुळे आजच्या प्रत्येक राज्यकर्त्याने अहिल्याबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यकारभार केला पाहिजे, असे मत व्याख्याते आनंद कांबळे यांनी व्यक्त केले.

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान तर्फे आयोजित ऑनलाइन व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना ‘राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि आजची स्त्री’ या विषयावर ते बोलत होते.

आनंद कांबळे पुढे बोलताना म्हणाले, की अहिल्याबाई होळकर यांच्याकडे राज्याविषयीची दूरदृष्टी होती. त्यांनी जनतेकडून मिळणाऱ्या कराचा कधी गैरवापर केला नाही. हा कर जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी वापरला. त्यांच्याप्रमाणे राज्यकारभार करणाऱ्या महिला पुढे येणे आज

काळाची गरज आहे. प्रशासन कसे असले पाहिजे, हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल, तर अहिल्याबाईंच्या चरित्राचे वाचन केले पाहिजे. केवळ जयंती पुण्यतिथीपुरते महापुरुषांना वंदन करून भागणार नाही, तर रक्तात महापुरुष भिनले पाहिजेत. इतिहास घडवणारी माणसे कारणे सांगत बसत नाहीत, अहिल्याबाईंकडून शिकले पाहिजे. अहिल्याबाईंच्या राज्यात कोणीही उपाशी मरत नव्हते. सर्वकाही व्यवस्था अहिल्याबाईंनी केली होती, म्हणून त्यांचे राज्य आदर्श राज्य म्हणून ओळखले जाते. अहिल्याबाईंची ओळख त्या काळात केवळ देशात नव्हती, तर जगभरात होती. त्यांची तुलना रशियाची राणी, ब्रिटेनच्या राणीशी करण्यात आली.

जातीयता, अस्पृश्यतेला कोणताही थारा त्यांच्या राज्यात नव्हता. आंतरजातीय विवाह त्यांनी लावून दिले होते. कायदा हा प्रतिबंध करू शकतो, परिवर्तन करू शकत नाही, या विचाराने त्यांनी जनतेचे मनपरिवर्तन केले. चोर, लुटारूंचे मनपरिवर्तन करून त्यांना जमिनी दिल्या. आदर्श राणी म्हणून त्यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. विविध विद्यापीठांना अहिल्याबाईंचे नाव आहे, हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा  सन्मान आहे.

अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव यांचा लढाईत मृत्यू आला. मल्हारराव होळकर यांनी सती जायची पद्धत असताना सती न जाण्याचा आग्रह धरला. अहिल्याबाई यांनी प्रांताची जबाबदारी घेतली. इंग्रजी राजवटीशी संघर्ष केला. कित्येक मंदिरे, घाट, विहिरी त्यांनी जनतेसाठी बांधल्या. समाजाला चांगले संस्कार दिले. त्यामुळे आजच्या दृष्टीने अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर यांचा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे. भरकटलेल्या आजच्या तरूणाईने महापुरुष वाचून समजून घेणे गरजेचे आहे. महापुरुषांकडून धडा घेण्यासाठी महापुरुषांची चरित्रे वाचली गेली पाहिजेत. त्यावर लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

 महिलांनी देखील शिक्षण थांबवू नये. आपल्या मुलींना शिक्षण दिले पाहिजे. मुलींना चार भिंतीत बंदिस्त ठेवू नका, त्यांना संधी मिळवून द्या, असा विचार अहिल्‍याबाईंकडून घेतला पाहिजे. मल्हाररावांनी जसे अहिल्याबाईंच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून प्रोत्साहन दिले, तसे प्रत्येक पुरुषाने महिलांच्या मागे खंबीरपणे उभे राहून महिलांना कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवू दिला पाहिजे. तरच प्रत्येक मुलगी अहिल्या बनेल, असेही कांबळे यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *