पुणे(प्रतिनिधि)– सर्व परंपरा काही युगांपासून चालत आल्या असून जर त्या इतकी शतके सुरु आहेत तर त्यामागे काहीतरी अर्थ असावा हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येक गोष्टीत हे बरोबर, हे चूक असा पवित्रा घेऊन चालत नाही. हे सर्व वाद अनाठायी आहेत, असे मत सुप्रसिद्ध गायक पद्मश्री हरिहरन यांनी केरळमध्ये मंदिरात पारंपारिक पेहराव असावा की नसावा या संदर्भात सुरू असलेल्या वादावर व्यक्त केले.
दोन वेळा भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायक पद्मश्री हरिहरन यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या व विविध संगीत परंपरांना एकाच व्यासपीठाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘सोल इंडिया’ या विशेष संगीत महोत्सवाचे आयोजन पुण्यात २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान करण्यात येणार आहे.
हरिहरन यांच्या नेटिव्ह कलेक्टीव्ह फाऊंडेशनच्या वतीने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून महोत्सवाच्या व्यवस्थापनाची जवाबदारी स्वरझंकारकडे सोपविण्यात आली आहे. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत यासंबंधीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी पद्मश्री हरिहरन, व्हायोलिन अकादमीचे संस्थापक पं. अतुलकुमार उपाध्ये व स्वरझंकारचे संचालक राजस व तेजस उपाध्ये उपस्थित होते.
केरळमध्ये मंदिरात पारंपारिक पेहराव असावा की नसावा या संदर्भात सुरू असलेल्या वादावर पुढे बोलताना ते म्हणाले. प्रत्येक ठिकाणचा विशेष असा पेहराव असतो, त्याच्याशी काही पद्धती, काही भावना जोडलेल्या असतात हे लक्षात घ्यावे. आपण प्रश्न उपस्थित केले म्हणजे आपण शहाणे आहोत, असे असे होत नाही. आपण पार्टीवेअर कपडे वेगळे घालतो. तसेच मंदिर, चर्च, मशिद या प्रार्थनास्थळी जाताना पेहरावाचा डेकोरेंडम पाळला पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर खरे-खोटे या चर्चा करण्यात काहीही अर्थ नसतो. पारंपारिक पोषाखात एक सुंदरता असते. त्यामुळे पारंपारिक पोषाखात जायला काय हरकत आहे?
मला कुंभमेळय़ात गायनासाठी निमंत्रण मिळाले आहे, त्यामुळे येत्या १० फेब्रुवारी रोजी मी तिथे गायला जाणार असून त्यासाठी काही वेगळय़ा रचना देखील बनविल्या आहेत. माझी ९० वर्षांची आई देखील यावेळी माझ्या सोबत असेल असेही त्यांनी सांगितले.
रिऍलिटी शोमध्ये भावनिक मुद्दा हा गेल्या काही वर्षांत महत्त्वाचा मानला जात आहे. प्रत्येक जण आपली पार्श्वभूमी सांगून रसिकांना भावनिक करण्याचा प्रयत्न करताना दिसतो याबद्दल काय वाटते असे विचारले असता हरिहरन म्हणाले, “आज जगच जणू ‘ड्रामॅटिक’ झाले आहे. ड्रामा करा मात्र स्वरांचा गाभा गमावू नका. कारण हेच सत्य आहे. मार्केटिंग करा पण गाभ्यातील संगीत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत रहा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
माझे बालपण मुंबईत गेले. शिवाजी मंदिरात मराठी गाणी आणि नाटय़ संगीत ऐकत मी मोठा झालो. मराठी भाषेची आणि गाण्यांची आवड इथेच जडली असे सांगत मला भारतरत्न लता मंगेशकर यांचे गाणे आवडते. पं हृदयनाथ मंगेशकर आणि श्रीनिवास खळे यांच्या संगीतरचनांचा मी चाहता आहे, असे हरिहरन यांनी सांगितले.
गाणे हे शब्दांमुळे स्मरणात राहते
आज रसिकांना जुनी गाणी लक्षात राहतात मात्र नवी गाणी, त्याचे शब्द लक्षात राहत नाही असे का होत असावे या प्रश्नाला उत्तर देताना हरिहरन म्हणाले, “कोणतीही व्यक्ती त्याच्या नावाने आपल्या लक्षात राहते, तसेच गाणे हे त्याच्या शब्दांमुळे स्मरणात राहते. आज शब्दच पोकळ झाले असून त्यांची ताकद कमी झाली आहे. आणि म्हणूनच गाण्याचे बोल लक्षात राहत नाहीत.शब्द मनाला भिडणारे असतील तर रसिक नक्कीच ते लक्षात ठेवतील.”
उस्ताद झाकीर हुसैन ईश्वरीय पातळीवर तबलावादन करायचे
उस्ताद झाकीर हुसैन यांच्या आठवणींना उजाळा देताना हरिहरन म्हणाले, “उस्ताद झाकीर हुसैन यांसोबत अनेक आठवणी आहेत. झाकीर भाई हे प्रत्येक कलाकाराला आवडायचे. आणि लहान, मोठा, नवा कलाकार अशा सगळ्यांनाच ते एकसारखे भेटायचे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. ते कायम ईश्वरीय पातळीवर तबलावादन करायचे. आपल्या समोर वाजवत असले तेरी ते खूप दूर आहेत आणि आपण तिथवर पोहोचू शकणार नाही असे त्यांना बघून वाटायचे.” उस्ताद झाकीर हुसैन यांवर हरिहरन यांनी एक शेर देखील प्रस्तुत केला.
‘सोल इंडिया’ या विशेष संगीत महोत्सवाविषयी बोलतांना हरिहरन म्हणाले, “संगीतातील विविधतेचा आनंद एकाच व्यासपीठाच्या माध्यमातून रसिकांना मिळावा ही या महोत्सवाची मूळ संकल्पना आहे. महोत्सवात अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत, गझल, ठुमरी, महाराष्ट्र राज्याचे पारंपारिक संगीत प्रकार व इलेक्ट्रोनिक डान्स म्युझिक आदी संगीत प्रकारांचा समावेश असेल.” पुण्यातील रसिक प्रेक्षक हे नव्या प्रयोगांबाबत कायम सकारात्मक तर असतातच मात्र मोठ्या मनाने ते अशा प्रयोगांना प्रोत्साहन देखील देत असतात त्यामुळे ‘सोल इंडिया’ या महोत्सवाच्या आयोजनाला पुण्यापासून सुरुवात करीत असल्याचे हरिहरन यांनी नमूद केले.