पुणे(प्रतिनिधि)– पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा ५७ वा वर्धापन दिन सोहळा येत्या २४ ते २६ जून २०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित या तीन दिवसीय महोत्सवात विविध कला प्रकारांचा अविष्कार पुणेकरांना अनुभवता येणार आहे, अशी माहिती बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून २४ जून रोजी केंद्रीय राज्यमंत्री (नागरी विमान वाहतूक) मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे
जीवनगौरव आणि बालगंधर्व गौरव पुरस्कारांचे वितरण
महोत्सवाची सुरुवात २४ जून २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता अंजली राऊत (नागपूर) यांच्या गणेश वंदनेने होईल. याच दिवशी सायंकाळी एका विशेष सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री (नागरी विमान वाहतूक) मा. मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, संगीत नाटक विभाग, गद्य नाटक विभाग आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना ‘बालगंधर्व गौरव पुरस्कारां’ने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री (महाराष्ट्र) अजितदादा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री (महाराष्ट्र) आशिष शेलार, उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांसारखे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ. अमोल कोल्हे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, अभिनय बेर्डे, देवयानी बेंद्रे, नम्रता दास, पूजा पुरी या नामवंत कलाकारांचेही योगदान महोत्सवाला लाभणार आहे.
पहिल्या दिवसाचे विशेष आकर्षण
पहिल्या दिवशी संगीत नाट्यप्रवेश, कविवर्य सुरेश भट यांच्या गझलांचा कार्यक्रम आणि “शब्दप्रभू जगदीश खेबुडकर” यांच्या गीतांचा कार्यक्रम सादर होईल. सायंकाळी व्यावसायिक नाटकांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे, ज्यात ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले विशेष आमंत्रित म्हणून सहभागी होतील.
महिलांसाठी लावणी महोत्सव आणि ज्वलंत विषयावर चर्चा
दुसऱ्या दिवशी, २५ जून रोजी सकाळी एकपात्री प्रयोग आणि दहावी/बारावी उत्तीर्ण झालेल्या कलावंतांच्या पाल्यांचा सत्कार समारंभ होईल. त्यानंतर फक्त “महिलांसाठी लावणी महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री दिपाली सय्यद यांची उपस्थिती असेल. सायंकाळी “स्त्री आज कितपत सुरक्षित” या ज्वलंत विषयावर चर्चासत्र रंगणार आहे. यात अंजली दमानिया, दिपाली सय्यद, रूपाली चाकणकर आणि तृप्ती देसाई यांचा सहभाग असून, नम्रता वागळे मुलाखतकार म्हणून उपस्थित राहतील. त्यानंतर लोकसंगीताचा कार्यक्रम सादर होईल.
अंतिम दिवसाचा धमाल कार्यक्रम
महोत्सवाच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी, २६ जून रोजी “महाराष्ट्राची लोकधारा”, दुपारी “मोगरा फुलला” हा कार्यक्रम आणि पारंपारिक लावण्यांचा कार्यक्रम संपन्न होईल. रात्री “ऑल इज वेल” या चित्रपटातील कलाकारांसोबत मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच, सुप्रसिद्ध हास्य कलाकार प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव हे देखील आपले कलाविष्कार सादर करणार आहेत.