पुणे(प्रतिनिधि)–लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांत, कसपटे कुटुंबाची कन्या वैष्णवी हगवणे हिचा संशयास्पद मृत्यूची दुर्दैवी घटना घडली आहे. वैष्णवीचे वडील आणि आई आपल्या लेकीला गमावल्याच्या असह्य वेदनेत आहेत. अश्रू अनावर झालेल्या स्थितीत त्यांनी वैष्णवीने सासरच्यांकडून सहन केलेला अमानुष छळ आणि हुंड्यासाठीच्या सततच्या मागण्यांसंदर्भात धक्कादायक माहिती दिली आहे. केवळ पैशांच्या हव्यासापोटी आपल्या मुलीचा बळी घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
लग्नानंतर काही महिन्यांतच छळाला सुरुवात
वैष्णवीचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर अवघ्या पाच ते सात महिन्यांतच तिच्या सासरच्यांकडून छळ सुरू झाला, असे तिच्या वडिलांनी सांगितले. सुरुवातीला, पालकांना त्रास होऊ नये म्हणून वैष्णवीने काहीही सांगितले नाही, कारण तिने स्वतःच्या मर्जीने लग्न केले होते. मात्र, जेव्हा तिच्या सासरच्यांनी चांदीच्या गौरायांची मागणी केली आणि मातीच्या गौराया देण्याऐवजी चांदीच्या गौराया मागत असल्याचे तिने रडत रडत सांगितले, तेव्हा पालकांना पहिल्यांदाच तिच्यावरील त्रासाची कल्पना आली.
सततच्या मागण्या आणि अवाजवी हुंडा
सासरचे लोक सतत पैशांची आणि वस्तूंची मागणी करत होते. वैष्णवी घरी दीड-दोन महिन्यांनी आली की, काहीतरी मागायची आणि तिचे वडील तिला पाहिजे तसे पन्नास हजार ते एक लाख रुपये देत असत. लग्नावेळी वैष्णवीच्या वडिलांनी ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची पाच पाच ताटे (प्रत्येकी ५-७ किलो), पाच सात किलोची चांदीची भांडी दिली होती. श्रावण मासाला अंगठी, चांदीचे ताट, अधिक मासासाठी अनेक वस्तू दिल्या होत्या. तरीही त्यांचा हव्यास वाढतच गेला असे त्यांनी सांगितले.
मानसिक आणि शारीरिक छळ
वैष्णवीचा सासरच्यांकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. तिची सासू तिला स्वयंपाक येत नाही, साफसफाई येत नाही म्हणून सतत टोचत असे. याबाबत विचारणा केली असता, ‘आमच्याकडे तीन तीन बायका कामाला आहेत, तिला काय काम पडतं?’ असे उत्तर मिळत असे. मारहाण केवळ एकदाच झाली नाही, तर वारंवार होत होती. दोन महिन्यांपूर्वी तिच्या नणंदेने तिला खूप मारले आणि तिच्या तोंडावर थुंकले होते. सासू आणि नणंद दोघींनी मिळून तिला गाडीतून बालेवाडीपर्यंत आणले होते, जिथे तिचा खूप छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून वैष्णवीने गाडीतच नदीत उडी मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी जावई, नणंद आणि सासूचे पाय धरून आपल्या मुलीचा संसार वाचवण्याची विनंती केली होती असे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले.
दोन कोटी रुपयांची मागणी आणि आत्महत्येचा प्रयत्न
दोन-चार महिन्यांपूर्वी जावयाने वैष्णवीच्या वडिलांकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली. त्याला घोटावडे भागात प्लॉट घ्यायचा होता. वडिलांनी एवढी मोठी रक्कम नसल्याचे सांगितले, तेव्हा जावयाने वडिलांच्या जॉइंट व्हेंचर पार्टनरकडे जाण्याची धमकी दिली आणि वडिलांना ओळख करून देण्यास सांगितले. दोन दिवसांनी पार्टनरचा फोन आला आणि त्यांनी जावयाने दोन कोटींची मागणी केल्याची खात्री केली असे ही वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले.
यापूर्वी, नोव्हेंबर २०२३ मध्येही वैष्णवीने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ती तीन महिन्यांची गर्भवती होती. पती-पत्नीमध्ये फोनवर भांडण झाले होते. वादाचे कारण जावयाने ‘हे बाळ माझे नाहीये’ असे म्हणणे असल्याचे सांगितले जाते. विष घेतल्यानंतर वैष्णवीने स्वतःहून याबद्दल सांगितले. नणंद आणि जावयाने तिला एआयएमएस रुग्णालयात नेले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर बिल वडिलांनी भरले, तर सासरचे लोक रात्री उशिरा निघून गेले. तीन दिवसांनी वैष्णवीला घरी आणण्यात आले, मात्र या काळात सासरच्यांपैकी कोणीही तिला भेटायला आले नाही.
नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल
अलीकडेच नणंदेने वैष्णवीला झिंज्या धरून मारहाण केली होती, ज्यामुळे वैष्णवीने नणंदेवर आणि संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल केला होता. याच कुटुंबातील मोठ्या सुनेनेही यापूर्वी असाच गुन्हा दाखल केला असून, ती आपल्या माहेरी राहत असल्याची माहिती आहे.
इतर पालकांसाठी संदेश
वैष्णवीच्या दुर्दैवी घटनेतून सर्वांनी धडा घेण्याची गरज आहे, असे तिचे वडील म्हणाले. त्यांनी इतर पालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या मुलीचे दुःख ऐकून घ्यावे, तिची मनस्थिती समजून घ्यावी. तसेच, मुलींनीही आई-वडिलांना आपल्यासोबत घडत असलेले सर्व काही स्पष्टपणे आणि मनमोकळेपणाने सांगावे, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या इज्जतीसाठी दीड वर्ष सर्व काही पोटात ठेवल्यामुळे आणि मागण्या पूर्ण करत राहिल्यामुळे आज आपली मुलगी हयात नाही, असे त्यांनी वेदनेने सांगितले. वैष्णवीचा बळी हुंड्यासाठीच घेतला गेला, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.