महिलांच्या रक्षणाची जबाबदारी आजच्या राज्यकर्त्यांवर आहे; पण… त्याची जाण राज्यकर्त्यांना राहिलेली नाही – शरद पवार

महिलांच्या रक्षणाची जबाबदारी आजच्या राज्यकर्त्यांवर आहे; पण... त्याची जाण राज्यकर्त्यांना राहिलेली नाही
महिलांच्या रक्षणाची जबाबदारी आजच्या राज्यकर्त्यांवर आहे; पण... त्याची जाण राज्यकर्त्यांना राहिलेली नाही

पुणे(प्रतिनिधि)–बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात पुण्यात शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने भर पावसात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘निषेध आंदोलन’ करण्यात आलं. तोंडाला काळा मास्क लावून आणि हाताला काळी फीत बांधून शरद पवार यांच्यासह अन्य महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, “बदलापूरला बालिकेवर जो अत्याचार झाला, त्यामुळे सबंध देशात महाराष्ट्राच्या नावलौकिकाला प्रचंड धक्का बसला. महिलांच्या रक्षणाची जबाबदारी आजच्या राज्यकर्त्यांवर आहे. पण त्याची जाण राज्यकर्त्यांना राहिलेली नाही. त्यामुळे बदलापूरचा प्रकार झाल्याचा निषेध होत असताना आणखी काही ठिकाणी अशाच दुर्दैवी घटना घडल्या”, अशी टीका शरद पवार यांनी यावेळी केली.

बदलापूरमधील चिमुकल्या दोन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली. याच विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने यावर टिपण्णी करताना हा बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटल्यानंतर महाविकास आघाडीकडून हा महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला. मात्र ठिकठिकाणी ‘निषेध आंदोलन’ करण्यात आले. पुण्यातही भरपावसात मविआचं हे आंदोलन झालं. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शरद पवार  यांनी राज्यातील घटना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला दिला. त्याचबरोबर उपस्थितांना एक शपथ घ्यायला लावली. महिलांवर कधीही अत्याचार करणार नाही, करू देणार नाही अशा आशयाची ही शपथ होती.

पवार म्हणाले, राज्यात घडत असलेल्या बदलापूरसारख्या अस्वस्थ करणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या छत्रछायेखाली एकत्र आलो आहोत. बदलापूरला बालिकेवर अत्याचार झाला. या घटनेने देशभरात महाराष्ट्राच्या लौकिकाला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील मुली- महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारवर आहे, याची जाण राज्यकर्त्यांना राहिलेली नाही. बदलापूरमधील घटनेचा निषेध होत असतानाच राज्यात घडलेल्या इतर ठिकाणच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रात दररोज अशा घटना घडत आहेत, असंही ते म्हणाले. राज्याचे प्रमुख आणि त्यांचे काही सहकारी म्हणतायत की बदलापूरच्या प्रकरणात विरोधक राजकारण करत आहेत. मुलीबाळींवरील अत्याचाराबाबत कुणी आवाज उठवला तर त्याला राजकारण म्हणायचं हा निष्कर्ष राज्यकर्ते काढत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत, भगिनींकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन किती चमत्कारिक आहे याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येते”, अशा शब्दांत शरद पवारांनी सरकारवर ताशेरे ओढले.

अधिक वाचा  'महारेरा’मुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शकतेत वाढ- देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत पवार म्हणाले, महाराष्ट्र हे शिवछत्रपतींचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी माहाराजाच्या काळात एका भगिनीवर अत्याचार केल्याची तक्रार  महाराजांकडे गेली होती. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात कलम करण्याचे आदेश दिले. तसंच आता जे काही घडलं आहे. त्याची गांभिर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे. संवेदनशीलपणे या गोष्टी हाताळल्या पाहिजे. अशा अत्याचाराच्या घटना होत असतील तर त्याच्या विरोधात आवाज उचलला म्हणजे राजकारण करतो म्हणणं सत्ताधाऱ्यांचे आहे. हे सरकार असंवेदनशील आहे, असं शरद पवार म्हणाले.

तोपर्यंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही-सुप्रिया सुळे

भर पावसात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुण्यातच अनेक घटना घडल्या, इथे रक्त बदलण्यात आलं, ड्रग्ज प्रकरणे वारंवार समोर येतात, कोयता गँग अशा अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे, बदलापूरातील आंदोलनानंतर सरकारमधील नेते आंदोलन करणारे बाहेरचे होते असे म्हणाले, पण ते कोणत्या का ठिकाणावरून येवो, ते भारतीय होते आणि ते भारतीय लेकीसाठी तिथे लढत होते. याची नोंद या सरकारने घेतली पाहिजे. मात्र, ती जनता, ते आंदोलक बदलापूरमधील होते हे नंतर समोर आलं, ते आपल्या लेकीसाठी लढत होते, यातून सरकार कोणता विचार करतं ते लक्षात येतं.  ही मोठ्या आंदोलनाची सुरुवात आहे. आपणास खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, असं म्हणत सुळे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

अधिक वाचा  सरकार कधी आणि कसं पडणार हे अजित पवारांना नीट माहिती आहे -चंद्रकांत पाटील

मोठ्या आंदोलनाची ही फक्त सुरुवात आहे, आपणास सुरक्षितेसाठी मोठे काम करायचे आहे. गाव, वाडी, वस्तीवर जाऊन काम करायचे आहे. दौंडमध्ये काल मी गेले. त्या ठिकाणी घडलेली घटना पाच ते सहा वर्षांपूर्वीची आहे. आता लोक पुढे येत आहे. त्यामुळे त्या पालकांना धीर देण्याची गरज आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांनी त्या मुलींच्या घरी जाऊ नये. त्यांची ओळख बाहेर येऊ देऊ नये. आपण महाराष्ट्रातील मुलींच्या सुरक्षेसाठी कामाला लागू या. तसेच जोपर्यंत त्या व्यक्तीला फाशी होत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

…तर मुख्यमंत्र्यांच्या सत्कार करु

गुंडांना आता पोलिसांची भीती राहिली नाही. कोयता गँग, रक्त नमुने बदलणे अशा घटना पुण्यात घडल्या आहेत.पुणे जिल्ह्यात एक बलात्कार झाला, हे कृत्य करणाऱ्या नराधमाला दोन महिन्यात आम्ही फाशी दिली असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे, जर हे सत्य असेल तर आपण सर्वजण मुख्यमंत्र्याचा सत्कार करायला जाऊ असा उपरोधिक टोला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. सरकार असंवेदनशील आहे. सरकारचा आणि त्या कृतीचा आपण निषेध करतो असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अधिक वाचा  #पंतप्रधान मोदी पुणे दौरा: एनडीए व इंडिया फ्रंट आमनेसामने येणार

इतक गलिच्छ सरकार आजपर्यंत मी पाहिले नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. ही घटना घडली त्याची नोंद पोलिसांनी घेतली नाही त्यामुळे ही कृती वारंवार घडत राहिली, पोलिसांची त्यांच्या वर्दीची भीती राहिली नाही, असंही त्या म्हणाल्या. आपण राजकारण बाजूला ठेवून राज्याच्या मुलींसाठी आपण जबाबदारी घेऊ, सर्वांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे, सर्व पालकांनी समोर आलं पाहिजे, असं काही घडत असेल तर ते समोर आलं पाहिजे, नराधमांना शिक्षा झाली पाहिजे, असंही त्यांनी यावेळी म्हणाल्या.

पवारांनी उपस्थितांना दिली शपथ

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी सर्व उपस्थित आंदोलकांना महिला सुरक्षेची शपथ घेण्याचं आवाहन केलं. “मी, अशी शपथ घेतो की, मी स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधीही खपवून घेणार नाही. माझे घर, माझा परिसर, माझे गाव, माझे कार्यालय अशा कोणत्याही ठिकाणी जर महिलांची छेडछाड किंवा अत्याचार होत असेल, तर त्यास मी विरोध करून त्याबद्दल आवाद उठवीन. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधीही करणार नाही. महिलांचा सन्मान राखीन आणि या पुण्यनगरीत, महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित व भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करीन. जय हिंद”, अशी शपथ यावेळी शरद पवारांपाठोपाठ आंदोलकांनी घेतली.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love