पुणे- कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील नदीपत्रातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, नदी पात्रात विसर्ग वाढल्याने भिडे पूल परिसरातील झेड ब्रिज खाली असलेले खाद्य पदार्थांचे स्टॉल्समध्येही पाणी शिरले आहे. असाच एक अंडा भुर्जीचा स्टॉल हलविण्यासाठी गेलेल्या कामगारांचा साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
अभिषेक अजय घाणेकर (वय- 25 रा. पुलाची वाडी, डेक्कन), आकाश विनायक माने (वय- 21 रा. पूलाची वाडी डेक्कन) आणि शिवा जिदबहादुर परिहार (वय वर्ष १८ नेपाळी कामगार) असे मृत पावलेल्या तिघांची नावे आहे
गुरुवार दिनांक २५-७-२०२४ रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खालील अंडा भुर्जी स्टॉल येथे नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने एका अंडा भुर्जी स्टॉलवर काम करणारे तीन कामगार अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले असता त्यांना विजेचा धक्का बसला. त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र या तिघांना उपचारांती डॉक्टरांनी आज पाच वाजताच्या दरम्यान मयत घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.