क्रीडा प्रतिनिधि- भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्या नात्यातील दुरावा अनेकदा चर्चेत आला होता. या दोन्ही खेळाडूंनी भारतीय क्रिकेटसाठी एकत्र काम केले होते पण अनेक वादांमध्ये ही जोडी लवकरच तुटली. आता त्याच्याशी संबंधित आणखी एका वादाचा मोठा खुलासा समोर आला आहे. (Kohli-Kumble Controversy) माजी आयएएस अधिकारी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय यांच्या पुस्तकात दोघांमधील संघर्ष आणि वादावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
आयपीएलमधील फिक्सिंगच्या वादानंतर भारतीय क्रिकेट कठीण काळातून जात होता. अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाने माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विनोद राय यांच्याकडे भारतीय क्रिकेट हाताळण्याची जबाबदारी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीची (सीओए) स्थापना केली होती. यादरम्यान भारतीय क्रिकेटमध्येही मोठा वाद सुरू होता. तत्कालीन कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या नात्यात मतभेद असल्याच्या बातम्याही आल्या होत्या.
‘नॉट जस्ट अ नाईटवॉचमन- माय इनिंग्स इन द बीसीसीआय’ या पुस्तकात माजी आयएस अधिकाऱ्याने भारतीय क्रिकेटमधील या वादावर खुलेपणाने लिहिले आहे. 2017 मध्ये राय यांना क्रिकेट प्रशासक (COA) बनवण्यात आले. या समितीने तीन वर्षे भारतीय क्रिकेट चालवले होते.
इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने राय यांच्या पुस्तकाचा हवाला देत म्हटले आहे की, कोहली आणि कुंबळे वादावर राय यांनी दावा केला आहे की, कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यात सर्वकाही आहे असे म्हणता येणार नाही. राय यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, “कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाशी झालेल्या माझ्या संभाषणात मला कळले की कुंबळे खूप शिस्तप्रिय आहे आणि त्यामुळेच संघातील सदस्य त्याच्यावर फारसे खूश नव्हते. मी याबद्दल विराट कोहलीशी बोललो आणि त्याने कुंबळे संघातील तरुण सदस्यांशी ज्या प्रकारे वागला त्यामुळे ते त्याला खूप घाबरूंन होते असेही त्याने नमूद केले होते.
राय म्हणाले की, दुसरीकडे कुंबळेने सीओएला सांगितले होते की तो फक्त संघाच्या भल्यासाठी काम करतो. आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याच्या रेकॉर्डला अधिक महत्त्व दिले पाहिजे आणि खेळाडूंच्या कथित तक्रारींना नाही.
राय यांनी लिहिले की, ‘जेव्हा कुंबळे यूकेहून परतला, तेव्हा आम्ही त्याच्याशीदीर्घ संवाद साधला. ही संपूर्ण घटना ज्याप्रकारे उघडकीस आली त्यामुळे तो खूपच निराश झाला होता. त्याला वाटले की आपल्याशी अन्याय झाला आहे आणि कर्णधार आणि संघाला इतके महत्त्व देऊ नये. संघात शिस्त लावणे हे प्रशिक्षकाचे कर्तव्य आहे आणि वरिष्ठ खेळाडू असल्याने त्यांच्या मताचा आदर केला पाहिजे.