पुणे(प्रतिनिधी) – शेअर्स ट्रेडिंगच्या नादात सैन्य दलात ब्रिगेडीअर या उच्च पदावर नोकरीस असलेल्या एका अधिकार्यांला सायबर चोरट्यांनी आपल्या जाळ्यात ओढत तब्बल ३१ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कनवर अमरजित कुलदीपचांद कनवर (५५) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भारतीय सैन्य दलात ब्रिगेडीअर पदावर नोकरीस आहेत. त्यांचे कोरगाव पार्क येथील तसेच बी.टी कवडे रस्त्यावरील बँकेत खाते आहे. त्या दोन्ही खात्यांना त्यांचा मोबाईल नंबर लिंक होता. ते बर्याच वर्षापासून शेअर्स ट्रेडिंगचा व्यवहार करतात. दि. १९ जुलै रोजी त्यांना त्यांच्या व्हॉट्अॅपवर चार्ल्स बीसी अॅन्ड्रूव्ह आणि करीन रिसी यांनी बेन कॅपीटलची लिंक पाठवली. त्यानुसार ते बेन कॅपटील या वॉट्सअॅप ग्रुपला जॉईन झाले. त्यानंतर त्यांना पुन्हा एक अॅप्लीकेशन लिंक पाठवून एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आला. या अॅपद्वारे ते शेअर्सची खरेदी विक्री करत होते. त्यांना झालेला नफा केवळ याच अॅपवर दिसत होता. तसेच इतरही ग्रुपचे सदस्य नफा झाल्याचे सांगत होते. स्क्रीन शॉट ग्रुपवर शेअर करत होते. त्यामुळे त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला.
यावर विश्वास ठेवुन त्यांनी ८ ऑगस्टला नेटबँकींगद्वारे ५० हजारांचा आणि १३ ऑगस्टला अडीच लाखांचा व्यवहार केला. त्यानुसार त्यांना शेअर्स दिले गेले. त्याच्या फायद्याची रक्कम त्यांना अॅपवर दिसत होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा २३ ऑगस्टला २८ लाख पाठवले असे एकूण तब्बल त्यांनी ३१ लाख रूपये विविध माध्यमातून पाठवले. त्यांना नफ्याची रक्कम दिसत होती. त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांना पैसे काढता आले नाही. त्यांनी याबाबत चार्ल्सला विचारले असता त्याने ४८ तासानंतर पैसे काढता येतील असे सांगितले.
म्हणून भरले २८ लाख
बेन कॅपटील अॅपवर ब्रिगेडीअरला १ करोड ७० लाखांचा फायदा दिसला त्यांवर त्यांना नफ्याच्या रकमेपैकी १५ टक्के म्हणजे २८ लाख भरण्यास सागण्यात आले. त्यानंतर तुमच्या खात्यात २४ तासात रक्कम जमा होईल असे सांगितले. त्यावेळेस समोरच्या व्यक्तीने पुन्हा १० टक्के नफा कर भरणा करण्यास सांगितला. त्यावेळेस ब्रिगेडीअरच्या मनात संशयाची पाल चुकचुकली अन त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.