पुणे-महामारीच्या काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणि व्यवसाय अखंडित ठेवण्यामध्ये तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. डिजिटल माध्यमांचा वापर होण्याचे प्रमाण आणि वेग यापुढील काळातही असाच वाढत राहील. अधिकाधिक उद्योग व्यवसाय हे त्यांच्या कार्य अबाधित व अखंडित ठेवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असल्यामुळे हा बदल वेगाने होत राहणार आहे, असा सूर एसएमई चेंबर ऑफ इंडिया आणि टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेस (टीटीबीएस) यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उद्योग-व्यवसायाशी संबंधित चर्चासत्रात निघाला.
डिजिटल वर्कप्लेस मॉडर्नायझेशन – रायझिंग टू दी चॅलेंज या विषयावर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये सहभागी झालेल्या उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील नामवंत व अनुभवी व्यक्तींनी त्यांचे अनुभव आणि माहितीची देवाण-घेवाण केली. सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या काळात भारतातील लघु व मध्यम उद्योगांमध्ये शाश्वत व्यवसाय आणि भागीदारीच्या संधींसाठी तंत्रज्ञानाचा फायदा कसा घेता येईल या मुद्द्यांवर या चर्चासत्रात तज्ज्ञांनी मत व्यक्त केले.
एसएमई चेंबर ऑफ इंडिया आणि फेडरेशन ऑफ इंडियन एसएमई असोसिएशन्सचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री चंद्रकांत साळुंके म्हणाले, भारतीय लघु उद्योग-व्यवसायांना पूर्वीपेक्षाही शाश्वत स्वरुपातील प्रगती घडवून आणण्याच्या अनेक संधी सध्याच्या महामारीतील काळात उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये एक महत्त्वाचा पैलू म्हणजे परवडणाऱ्या दरात व्यवसाय कार्याचे व्यवस्थापन करणे होय. डिजिटल माध्यमांचा वापर आणि व्यवसायानिमित्त कराव्या लागणाऱ्या संवाद व संपर्कामध्ये तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे प्रमाण आता वाढत आहे. अशा तंत्रज्ञानाचा स्वीकार करून लघु उद्योग व्यवसाय हे भविष्यासाठी सक्षम आणि दीर्घकाळ शाश्वत पद्धतीने काम करण्यासाठी तयार होत आहेत आणि त्यामुळेच ते भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
टाटा टेलि सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष श्री मन्नू सिंग म्हणाले जलद निर्णय प्रक्रिया, भागीदारीसाठी आवश्यक असलेल्या साधनांचे जाळे, प्रतिसादाचा वेग, माहितीची सहज उपलब्धता आणि संपर्क व संवादासाठी अवलंबून राहता येतील असे पर्याय या वर आजचे आधुनिक व्यवसायाचे यश अवलंबून आहे. सध्याच्या परफाॅर्मन्स-ड्रिव्हन अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहकांना सेवा देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी लागणारा कालावधी सर्वात कमी असावा लागतो आणि कोणत्याही विपरित परिस्थितीमधून पटकन बाहेर पडण्याची क्षमता आणि कला अधिकाधिक असणे गरजेचे आहे.
एवरसीन लिमिटेडचे विदेश कार्याचे संचालक श्री जनाथन बुरके म्हणाले, व्यवसायातून अधिकाधिक चांगला परतावा मिळण्यासाठी मानवी स्वभावावर करणाऱ्या परिणामांशी संबंधित प्रक्रियांची आम्ही काळजी घेतो. यापूर्वी आमच्या लक्षात न आलेल्या परंतु अनेक मुद्द्यांवर पुनर्विचार करण्याची आणि लक्ष केंद्रित करण्याची संधी या महामारीच्या काळात आम्हाला मिळाली. संपूर्ण नव्या रुपात परस्पर सहकार्याच्या साधनांची मदत घेऊन आम्ही स्वतःला भविष्यातील कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज केले आहे आणि त्यामुळेच आजच्या सारखी अभूतपूर्व परिस्थिती भविष्यात आली तरी त्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही आता पूर्णतः सक्षम आहोत.
मन्नू सिंग म्हणाले, तंत्रज्ञानाधारित पर्यायांचा वापर करून पूर्वीपेक्षाही अधिक प्रगती साध्य करण्याची किमया उद्योग-व्यवसाय करू शकतात. हायब्रिड अशी ही कार्य संस्कृती आता सगळ्यांना आत्मसात करावी लागणार आहे. तंत्रज्ञानाधारित पर्यायांमुळे केवळ व्यावसायिक प्रगती होते असे नाही तर विखुरलेले मनुष्यबळ हे अधिक सुरक्षित राहते आणि त्यांच्यातील समन्वय परिणामकारक ठरू शकतो. टीटीबीएसमध्ये नावीन्यपूर्ण आणि शाश्वत असे पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून देत त्यांचे व्यवसाय अखंडित राहण्यासाठी आम्ही त्यांना मदत करत आहोत. त्यामुळे त्यांच्यातील स्पर्धात्मकता वाढते आहे आणि मोठे लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळत आहे.
लघु व मध्यम उद्योग-व्यवसायामध्ये डिजिटायझेशनची भूमिका, आर्टिफिशियल इंटलिजन्स, आयओटी आणि क्लाऊड या प्रगत तंत्रज्ञानामुळे होणारी उद्योगांची प्रगती अशा विविध विषयांवर या चर्चासत्रामध्ये तज्ज्ञांनी मत-मतांतरे व्यक्त केली. भारतातील लघु व मध्यम उद्योग व्यवसायाच्या भवितव्यासाठी शाश्वत व सुरक्षित असा मार्ग काढणे, संपर्क, संवाद व दळणवळणाच्या क्षेत्रातील विविध साधनांवरील त्यांचे अवलंबत्व आणि विक्रीमध्ये वृद्धी होण्यासाठी आधुनिक विपणन पद्धतीचा वापर या विषयांवरही यावेळी भर देण्यात आला.