Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरण करण्यावर एकमत झाले होते आणि हा निर्णय जाहीर करण्यासाठी अजित दादांनीच १२ तारीख निश्चित केली होती. मात्र, हा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. “दादांची जी इच्छा होती, ती पूर्ण व्हावी अशी आमचीही इच्छा आहे,” असे म्हणत जेष्ठ नेते शरद पवार यांनी भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, सुनेत्रा पवारांच्या आजच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही, मी सकाळी वाचलं, परिवार हा साथ देण्यासाठी बाकी राजकारण वेगळं,असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असून, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील. या शपथविधीपूर्वी दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून, यामध्ये सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी अधिकृत निवड केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत.
अजित पवार हे अत्यंत कर्तृत्ववान नेते होते
या महत्त्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आज(शनिवार) सकाळी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि अनेक खुलासे केले. शरद पवार म्हणाले की, अजित पवार हे एक अत्यंत कर्तृत्ववान नेते होते ज्यांचा सामान्यांशी थेट सुसंवाद होता. लोकांच्या प्रश्नांची त्यांना सखोल माहिती होती आणि ते नेहमी लोकांना न्याय देण्याचे काम करत असत. अजित पवारांच्या कार्यपद्धतीबद्दल सांगताना त्यांनी नमूद केले की, त्यांच्या कामाची सुरुवात पहाटेच व्हायची आणि आज जर ते हयात असते, तर ते घरी न थांबता थेट जनतेच्या कामासाठी ‘फिल्डवर’ दिसले असते.
दादांची जी इच्छा होती, ती पूर्ण व्हावी…
यावेळी शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू होती. या चर्चेचे नेतृत्व स्वतः अजित पवार आणि जयंत पाटील करत होते. दोन्ही पक्षांचे विलीनीकरण करण्याचे एकमत झाले होते आणि हा ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यासाठी अजित दादांनीच १२ तारीख निश्चित केली होती. मात्र, हा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. “दादांची जी इच्छा होती, ती पूर्ण व्हावी अशी आमचीही इच्छा आहे,” असे म्हणत पवारांनी भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.
सुनेत्रा पवारांच्या आजच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही
सुनेत्रा पवारांच्या आजच्या शपथविधी सोहळ्यावर विचारले असता मला माहिती नाही, मी सकाळी वाचलं, असं शरद पवार म्हणाले. अजित पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतला. पक्ष त्यांचा आहे, त्यांच्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची प्रचीती दिसत आहे. आमचा मार्ग वेगळा आहे. परिवार हा साथ देण्यासाठी बाकी राजकारण वेगळं, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. प्रफुल पटेल, सुनील तटकरे पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी ठरवलं आहे, आम्ही त्यावर भाष्य करणार नाही, असंही शरद पवार म्हणाले.
बारामती येथे झालेल्या अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलताना शरद पवारांनी समाजातील विविध चर्चांवर भाष्य केले. हा अपघात संपूर्ण देशाला चटका लावून जाणारा आहे, असे ते म्हणाले. मात्र, या घटनेत काही ‘फाऊल प्ले’ किंवा कट असल्याच्या चर्चा समाजमाध्यमांवर आणि राजकीय वर्तुळात रंगत आहेत. यावर भाष्य करताना पवार म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास ज्यांचे राजकीय महत्त्व कमी होणार होते, अशा काही मंडळींनी हे सर्व घडवून आणले असावे, असे काही लोकांना वाटते. काही जणांनी जाणीवपूर्वक आपल्याला प्रक्रियेतून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा असल्याचेही त्यांनी मान्य केले. मात्र, हा अपघात तांत्रिक मूल्यांच्या आधारे घडला असला, तरी त्याबद्दलच्या चर्चा थांबणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.












