अहिल्यानगर : अजित पवार यांच्या एका लग्नसोहळ्यातील फोटोवरून उठलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अजितदादांची पाठराखण करत, टीका करणाऱ्या विरोधकांवर “ज्यांना लग्नाची पत्रिकाच येत नाही, म्हणून त्यांचा त्रागा होत असल्याची टीका केली. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींवरील अनावश्यक टीकेला त्यांनी उपहासाने उत्तर दिले.
‘होतकरू नेतृत्व’ आणि नैसर्गिक फोटो
सुजय विखे पाटील यांनी अजित पवारांना “होतकरू नेतृत्व” असे संबोधत त्यांची पाठराखण केली. “एखाद्या लग्नसोहळ्याला जाणं आणि तिथे फोटो निघणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे,” असे ते म्हणाले. अनेक नेते अनेक लग्नसोहळ्यांना उपस्थित राहतात आणि तिथे फोटो काढले जातात. या नैसर्गिक गोष्टीला राजकीय रंग देणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
‘पत्रिकेविना’ विरोधकांचा त्रागा
अजित पवारांवर टीका करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांना उद्देशून विखे पाटील यांनी सणसणीत टोला लगावला. “यांना कोणाच्या लग्नाची पत्रिकाच येत नाही, त्यामुळे त्यांना पर्यायच नाही,” असे ते मिश्किलपणे म्हणाले. ज्या लोकांना लग्नाची पत्रिकाच मिळत नाही, त्यांना दुसरा माणूस लग्नाला गेला याचा त्रास होऊ शकतो, असे सांगत त्यांनी उपहासाने विनंती केली की, लोकांनी या प्रवक्त्यांना लग्नाच्या पत्रिका पाठवायला सुरुवात करावी, म्हणजे त्यांचे आक्षेप राहणार नाहीत.
सार्वजनिक जीवन आणि ‘बिल्ला’ लावण्याचा सल्ला
सार्वजनिक जीवनातील व्यक्तींना अनेकदा अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागते, यावर विखे पाटील यांनी प्रकाश टाकला. “कोणीही कोणाबरोबर फोटो काढतो. उद्या आमच्याबरोबर फोटो काढल्यावर जर कोणी सांगितले की हा तस्कर आहे किंवा आरोपी आहे, तर काय करणार?” असा सवाल त्यांनी केला. यापुढे कायदा करावा लागेल की जेवढे आरोपी असतील त्यांनी त्यांच्या कपड्यांवर बिल्ला लावावा, म्हणजे लोकप्रतिनिधींना ‘आयडेंटिफिकेशन’ मिळेल, असा उपहासात्मक सल्लाही त्यांनी दिला.
सामुदायिक विवाहांना प्रोत्साहन आणि खर्चाचा मुद्दा
लोकप्रतिनिधींनी स्वतः आदर्श ठेवला पाहिजे, विखे पाटील परिवारामध्ये मी एकुलता एक मुलगा असताना माझ्या वडिलांनी माझे लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात केलं. त्यांनी स्वतःच्या मुलाचा सामुदायिक विवाह करून दिला, जेणेकरून कार्यकर्त्यांनीही तसे करावे असा आदर्श समाजाला देता येईल. जसा आम्ही आदर्श घडवला तसा इतर लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मुलांची लग्ने सामुदायिक विवाह सोहळ्यात लावायला सुरुवात केली तर कुठेतरी कार्यकर्ते बदलतील ही अपेक्षा आपण ठेवली पाहिजे असे सांगत सुजय विखे पाटील महाणले, लोकांनी कसं लग्न लावावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
आजकाल लग्नामध्ये होणाऱ्या अवाढव्य खर्चाबद्दलही त्यांनी भाष्य केले. “काही लोक साधं लग्न लावत असल्याचं सांगतात, शाळेला किंवा मंदिराला चेक देतात, पण जेवणासाठी हजार रुपयांची प्लेट ठेवतात. यावर मला हसू येतं, मात्र, काय करणार मतही मागायची आहेत, त्यामुळे नाईलाज आहे अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.