पुणे : कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने अवघ्या २२ सेकंदात ६६व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला २२ सेकंदात झोळी डावावर चितपट केले.
प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये स्पर्धा झाली.
अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरचे पारडे निश्चित जड होते. पण, शिवराज त्याला आव्हान देईल अशी अपेक्षा होती. मात्र, वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे शिवराजचा निभाव लागला नाही. लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदात सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्याच स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळविला.
पारितोषिक वितरणप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे, योगेश दोडके यावेळी उपस्थित होते. विजेत्या सिकंदरला थार गाडी, गदा असे पारितोषिक देण्यात आले. उपविजेता शिवराज ट्रॅक्टरचा मानकरी ठरला.
त्यापूर्वी, माती विभागात झालेल्या अंतिम लढतीत पहिल्या फेरीतच सिकंदरने संदीपवर सातत्याने ताबा मिळवत सलग दोन गुणांचा सपाटा लावला आणि दहा गुणांची वसुली करत तांत्रिक वर्चतस्वावर विजय मिळवून किताबी लढतीत प्रवेश केला होता. गादी विभागात शिवराज राक्षेने कमालीचा चपळपणा दाखवत हर्षद कोकाटेचा तांत्रिक वर्चस्वावर पराभव करून अंतिम फेरी गाठली.
अन्य निकाल
माती विभाग – ६५ किलो रोहन पाटील (कोल्हापूर) वि.वि. यश मगदूम (गडचिरोली), ७४ किलो -अनिल कचरे (पुणे) वि.वि. संदेश शिषमुळे (गडचिरोली) , ७० किलो – निखिल कदम (पुणे) वि.वि. अभिजित भोसले (सोलापूर), ६१ किलो – अमोल वालगुडे (पुणे जिल्हा) वि.वि. भालचंद्र कुंभ (पुणे), ५७ किलो – सौरभ इंगवे (सोलापूर) वि.वि. कृष्णा हरणावळ (पुणे), ८६ किलो – विजय डोईफोडे (सातारा) वि.वि. ओंकार जाधवराव (पुणे)
गादी विभाग ६१ किलो – पवन डोन्हर (नाशिक) वि.वि योगेश्वर तापकिर (पिंपरी चिंचवड), ७० किलो – विनायक गुरव (कोल्हापूर) वि. वि. संकेत पाटील (कोल्हापूर), ५७ किलो – आतिश तोडकर (बीड) वि.,वि. आकाश सलगर (सोलापूर). ७४ किलो – शुभम थोरात (पुणे ) वि.वि. राकेश तांबुलकर (कोल्हापूर)