सर्वांनी पूजा-प्रार्थनेसाठी काय मातोश्रीवर जायचे का?- चंद्रकांत पाटील

राजकारण
Spread the love

पुणे– धार्मिक स्थळे बंद असतील, तर सर्वांनी पूजा-प्रार्थनेसाठी काय मातोश्रीवर जायचे का?, असा सवाल करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष मतांसाठी देव, धर्म मानत नाहीत, त्यांना खूष करण्यासाठी उद्धव ठाकरे मंदिरे खुली करायला तयार नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान, लोक फार काळ आपल्या भावना दाबून ठेवू शकणार नाहीत. आणखी काही काळानंतर लोक कुलुप तोडून मंदिरात घुसतील, असेही ते म्हणाले.

राज्यातील मंदिरे कोरोनाच्या निर्बंधामुळे दीर्घकाळापासून बंद आहेत. येत्या आठ दिवसांत ही मंदिरे उघडावीत, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कसबा गणपती मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनावेळी बोलताना ते म्हणाले, मंदिरे पूर्णपणे बंद ठेवणे चुकीचे आहे. नियम करुन द्या, एकावेळी दहाच जण आत जातील, ते बाहेर आल्याशिवाय पुढचे दहा आत जाणार नाहीत, मास्क, सॅनिटायझर असे नियम करा. पण आता मंदिरे बंद ठेवू नका. मंदिरे फक्त श्रद्धेचा प्रश्न नव्हे तर रोजगाराचा स्रोतही आहेत. मंदिराबाहेर असलेल्या दुकानावर अनेक संसार चालतात. त्यांचे काय? मी इशारा देतो आज दिवसभरात मंदिर उघडा. नियम करून का होईना मंदिरं उघडली नाही तर आजपासून लोक त्यांच्या भावना काबूत ठेवणार नाहीत. ते मंदिरांचे कुलुपं तोडून मंदिरात घुसतील. उद्धवजी होश मे आओ, होश मे आकर बात करो, महाराष्ट्रातील पाच पंचवीस लाख लोकं असतील ते देव मान नाहीत. पण मंदिर सुरू न करता इतरांचे शाप तुम्ही घ्याल. आज संध्याकाळपर्यंत मंदिर सुरू करा, असं आवाहन पाटील यांनी केलं.

त्यांनी यावेळी ठाकरे सरकारवर टीका करण्याची संधीही सोडली नाही. यावेळी त्यांनी दोन वर्षे वारी बंद असल्याबद्दलही भावना व्यक्त केली आहे. चारचाकी गाडीतून थेट मंदिरात जाऊन पूजा करणाऱ्यांना वारकऱ्यांच्या भावना काय कळणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर लोक फार काळ आपल्या भावना दाबून ठेवू शकणार नाहीत. आणखी काही काळानंतर लोक कुलुप तोडून मंदिरात घुसतील, असेही ते म्हणाले.

जैनांचे पर्युषण पर्व आता लवकरच सुरु होईल, मुस्लिमांना नमाज पढायला मस्जिदीत जायचे असते, ख्रिश्चनांना चर्चमध्ये जायचे असते, शिखांना प्रार्थनेसाठी गुरुद्वारेत जायचे असते. या सर्वांसाठी आम्ही आंदोलन करत आहोत, असे ते म्हणाले.

मंदिरात जाण्यापासून हे सरकार थांबवू शकणार नाही. ते भूमिका घेत नाही असं नाही. प्रत्येकवेळी थपडा बसल्यानंतर हे सरकार भूमिका घेतं. माझं म्हणणं एवढंच आहे की, मंदिरे उघडल्याने तिसरी लाट येऊ शकते तर दारूच्या दुकानांना तिसऱ्या लाटेची भीती नाही का? दारू घरोघरी पोहोचवणाऱ्यांना कोरोनाची नाही का? तो जगभर फिरून तो दारू पोहोचवतो. त्याला कोरोना होत नाही. मग मंदिरांनाच कोरोना कसा होतो? कोरोना यांच्याशी बोलतो का? मंदिर सुरू केल्यानंतर तिसरी लाट येईल असं कोरोना सांगतो का? तिसऱ्या लाटेची काळजी घेतली पाहिजे, पण त्याची धाड मंदिरावर कसली?, असा संतप्त सवाल पाटील यांनी केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *