पुणे(प्रतिनिधि)–पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा झाला असून, वैष्णवीचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी हुंड्यासाठी छळ आणि सासरच्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून तिचा मृत्यू झाल्याचे समोर येत असून, सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली असून आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी याबाबत पोलीस महासंचालक यांना तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच याप्रकरणाचा तातडीने निष्पक्ष चौकशी करुन आरोपींना अटक करावी असे सांगितले आहे.
शुक्रवार, दिनांक १६ मे रोजी संध्याकाळी भुकूम येथील राहत्या घरी वैष्णवीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. प्राथमिकदृष्ट्या हे प्रकरण आत्महत्येचे वाटत होते. परंतु, शवविच्छेदन अहवालाने हे चित्र पूर्णपणे बदलले. अहवालातून तिच्या मृत्यूचे कारण गळा दाबणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या तपासात असेही समोर आले आहे की, वैष्णवीला हुंड्यासाठी छळले जात होते, तिला मारहाण केली जात होती आणि तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण होते.
या घटनेनंतर वैष्णवीचे वडील आनंद उर्फ अनिल साहेबराव कसपटे यांनी तिचे पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे. पोलिसांनी या पाच जणांविरुद्ध वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडाबळी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दाखल केलेल्या एफआयआरमध्ये शारीरिक आणि मानसिक छळाचाही स्पष्ट उल्लेख आहे.
लग्नात ५१ तोळे सोन्याचे दागिने, एक आलिशान फॉर्च्युनर गाडी
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी आणि शशांक यांचा २०२३ मध्ये प्रेमविवाह झाला होता. वैष्णवीच्या माहेरच्यांनी लग्नासाठी सुसगाव येथील सनीज वर्ल्डमध्ये लाखो रुपये खर्च करून भव्य आणि शाही विवाहसोहळा आयोजित केला होता. लग्नात ५१ तोळे सोन्याचे दागिने, एक आलिशान फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी भेट म्हणून दिली होती. लग्नानंतरही चांदीची मूर्ती, नुकताच दीड लाखांचा मोबाईल आणि माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी पन्नास हजार ते एक लाख रुपये देण्यात आल्याचे सांगितले जाते. राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी हे सर्व घेतल्याची माहिती एफआयआरमध्ये आहे.
मात्र, लग्नाच्या काही दिवसांनंतरच सासरच्या लोकांनी वैष्णवीचा छळ सुरू केल्याचा आरोप आहे. लग्नात चांदीची भांडी पुरेशी मिळाली नाहीत या कारणावरून ते नाराज होते आणि तिला अपमानास्पद बोलत होते. त्यांनी तिच्या चारित्र्यावरही संशय घेऊन मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. या छळात आणखी वाढ झाली, जेव्हा जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी पूर्ण केली गेली नाही.
मोठ्या सुनेचाही छळ झाल्याचे समोर
हगवणे कुटुंबाच्या छळाचा प्रकार केवळ वैष्णवीपुरता मर्यादित नसल्याचेही समोर आले आहे. त्यांच्या मोठ्या सुनेचाही सासरच्यांकडून अतोनात छळ करण्यात आला होता. मोठ्या सुनेने याच छळाला कंटाळून नोव्हेंबर २०२४ मध्ये पौड पोलीस स्टेशनमध्ये सासरे राजेंद्र हगवणे, सासू, दीर आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी राजेंद्र हगवणे यांनी सुनेला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली होती आणि मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले होते. त्यावेळीही राजकीय दबावामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिप
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिची तिच्या मैत्रिणीसोबतची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये ती “सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ती चूकच झाली” असे बोलताना ऐकू येते. या ऑडिओ क्लिपमुळे वैष्णवी सासरच्या त्रासाला कंटाळली होती हे स्पष्ट होत आहे.