पुणे -झपाटलेला आणि झपाटलेला 2 या चित्रपटातून ‘बाबा चमत्कार’ ही व्यक्तिरेखा साकारणारे जेष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे गुरुवारी सायंकाळी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
कडकोळ यांना नौदलात भरती व्हायचे होते. ते परीक्षाही पास झाले. सगळे सुरळित सुरु असताना मेडिकल टेस्ट केली असता त्यांच्या कानात दोष असल्याचे कारण देत त्यांना घरी पाठवण्यात आले. दरम्यान त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान त्यांनी नाटकांमध्ये छोटय़ा भूमिका करायला सुरवात केली. ‘करायला गेलो एक’ या नाटकाद्वारे त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ते नाकट सांभाळून नोकरी करत होते. त्यानंतर त्यांची ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील ‘धर्माप्पा’ ही भूमिका गाजली. ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकातही त्यांनी काम केले होते.
कडकोळ यांनी ‘ब्लॅॅक ऍन्ड व्हाईट’, ‘कुठे कुठे शोधू मी तिला’, ‘गौरी’, ‘सखी’ या मराठी चित्रपटांमध्ये, तर ‘छोडो कल की बाते’ या हिंदी चित्रपटामधून त्यांनी काम केले आहे. कडकोळ यांनी ‘गोल्ड मेडल’ नावाचे पुस्तकही लिहीले आहे.
बाबा चमत्कार व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात
झपाटलेला हा महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील लक्ष्या, महेश, तात्या विंचू या पात्रांसोबतच बाबा चमत्कार हे पात्र देखील चांगलेच प्रसिद्ध झाले होते. कडकोळ यांनी साकारलेले बाबा चमत्कार हे पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
त्यांनी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना नाटय़ परिषदेचा ‘जीवनगौरव’ पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय त्यांना विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.