सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशाला दिशा देणारे विद्यापीठ-डॉ. भूषण पटवर्धन

पुणे-मुंबई शिक्षण
Spread the love

पुणे- आपली मूळ संस्कृती न सोडता नवीन तंत्रज्ञानाची कास धरणारे आणि सर्वच क्षेत्रात पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये असणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशाला दिशा देणारे विद्यापीठ आहे असे मत राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे (नॅक) चे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मागील बाजूस असणाऱ्या हिरवळीवर  १२० वा पदवीप्रदान समारंभ पार पडला. त्यावेळी  डॉ. पटवर्धन बोलत होते. या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत,  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. संजीव सोनवणे, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, डॉ. अंजली कुरणे, सर्व व्यवस्थापन परिषद, अधिसभा सदस्य व विद्या परिषदेचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी व २०२०-२१  व  ‘द प्रेसिडेंट ऑफ इंडिया डॉ. शंकर दयाळ शर्मा’ सुवर्ण पदकाची मानकरी रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची रेणुका सिंग ही विद्यार्थिनी ठरली. या समारंभदारम्यान ७५ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते १२१ सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

डॉ. पटवर्धन पुढे म्हणाले, राजसत्ता आणि ज्ञानसत्ता ही सोबत चालल्याशिवाय देशाचा विकास होत नाही. म्हणूनच शिक्षणात राजकारणाचा समतोल साधणं खूप आवश्यक आहे. आपल्याकडे नालंदा तक्षशीला यांसारख्या विद्यापीठांचा खूप जुना इतिहास आहे. आजचे शिक्षण पद्धती ही  कुलगुरू आणि गुरुकुल पध्दतीची असावी. नवीन तंत्रज्ञानाला सोबत घेत ही पद्धती ठरवावी.  यावेळी विद्यापीठाला चांगले प्राध्यापक मिळावे यावर प्रकाश टाकत प्राध्यापक भरतीबाबतही डॉ. पटवर्धन यांनी भाष्य केले.

सर्व विद्यापीठांमध्ये एकाच कोणत्यातरी ठराविक दिवशी पदवीप्रदान समारंभ व्हावा, जेणेकरून एकाचवेळी लाखो विद्यार्थ्यांना पदवी देणारं हे महाराष्ट्र राज्य ठरेल असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले डॉ. नितीन करमळकर यांच्या कार्यकाळात विद्यापीठाने उत्तम कामगिरी केली असून अन्य विद्यापीठांनी या विद्यापीठाकडून धडे घेण्याची गरज आहे. कोरोना काळ, परदेशात विद्यापीठाचे दालन, मराठी भाषेसाठीचे प्रयत्न हे विद्यापीठाचे उल्लेखनीय काम आहे. यावेळी डॉ. करमळकर यांना उद्देशून सावंत म्हणाले की, तुम्ही कुलगुरू म्हणून सेवानिवृत्त होत असाल तरी आम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग राज्याच्या प्रगतीसाठी करून घेणार.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ज्या विद्यापीठातील सांशीधनाचा पाया भक्कम ती विद्यापीठे पुढे जातील. रोज नवीन ज्ञानाची निर्मिती हे पिढीला काळात आपले शिक्षणातील ध्येय असायला पाहिजे. यासोबतच आपली सांस्कृतिक मुळंही तितकीच महत्वाची आहेत. विद्यापीठाने शिक्षण उद्योग यांचा समन्वय घडवून आणला, विद्यार्थ्यांना काळासोबत चालणारे नवे अभ्यासक्रम डिग्री प्लस च्या माध्यमातून दिले, स्टार्टअपसाठी रिसर्च पार्क फाउंडेशन उभे केले, १३० सामंजस्य कराराच्या माध्यमातून अनेक संस्थाशी जोडले गेले आणि परदेशातही आपले कॅम्पस सुरू केले. सार्वजनिक विद्यापीठामध्ये अनेक बाबतीत विद्यापीठाला आघाडीवर  ठेवले.

शैक्षणिक वर्ष एप्रिल /मे २०२१ या वर्षातील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका,  पीएचडी, एमफील,  स्तरावरील एकूण १ लाख १८ हजार २२२ विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात आली आहेत. यामध्ये ३०९ पीएचडीधारक आहेत. कला शाखा २२००, वाणिज्य २९ हजार ६५५, शिक्षणशास्त्र १ हजार ४३०, अभियांत्रिकी ३९ हजार ८८५, विधी ३ हजार ३०५, व्यवस्थापन ७ हजार ७५९, मेंटल मॉरल ५ हजार ५७७, फार्मसी ४ हजार ३११, शारीरिक शिक्षण १३, विज्ञान २४ हजार ८० आणि तंत्रज्ञान ७ अशा एकूण १ लाख १८ हजार २२२ पदवी प्रमाणपत्राचे वाटप करत असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *