संगमनेर: आमदार सत्यजित तांबे यांच्या संभाव्य भारतीय जनता पक्ष (भाजप) प्रवेशाच्या चर्चांना सध्या उधाण आले असतानाच, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी यावर मोठे आणि स्पष्ट वक्तव्य केले आहे. तांबे भाजपमध्ये आले तरी संगमनेर तालुक्यातील स्थानिक पातळीवरील संघर्ष कायम राहील, असे विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले.
सुजय विखे म्हणाले, “संगमनेर तालुक्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरून आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही.” भविष्यात जरी एकाच पक्षात असलो तरी स्थानिक राजकारण हे वेगळे असते आणि ते तसेच राहणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘कुरघोडी’चं राजकारण’ सुरूच राहणार
विखे पाटील यांनी जनतेला अपेक्षित असलेले किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये असलेले संघर्ष कायम राहतील, असे नमूद केले. अनेक ठिकाणी पक्षांतर्गत लोकांनी विरोधात काम केल्याचे पुरावे प्रसारमाध्यमांमध्ये आणि जनतेसमोर असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे हे सर्व ‘कुरघोळीचं राजकारण’ सुरूच राहते, असे त्यांचे म्हणणे होते.
‘राजकारणात कोणताही बदल नाही’
पुढे बोलताना विखे पाटील यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. “कोणी आले किंवा नाही आले तरी, गेल्या ५० वर्षांपासून आम्ही जे राजकारण अधोरेखित केले आहे, तेच राजकारण आम्ही करत राहणार आहोत आणि त्यात कोणताही बदल होणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. या वक्तव्यामुळे सत्यजित तांबेंच्या संभाव्य भाजप प्रवेशानंतरही संगमनेरच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या गटबाजी आणि संघर्षाचे पडसाद कायम राहतील हे स्पष्ट झाले आहे.