पुणे(प्रतिनिधी)- अस्थिरोगावरील देशातील आघाडीच्या ‘संचेती रुग्णालया’ला आता ‘स्ट्रोक रेडी सेंटर’ म्हणून मान्यता मिळाली आहे. आपत्कालीन व न्यूरोलॉजी केअरमधील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, या मान्यतेमुळे स्ट्रोक उपचाराच्या देशातील काही निवडक रुग्णालयांमध्ये संचेती रुग्णालयाचा समावेश झाला असल्याची माहिती ‘संचेती रुग्णालया’चे चेअरमन डॉ. पराग संचेती यांनी येथे दिली.
या सुविधेमुळे आता मेंदूच्या झटक्यावर (ब्रेन स्ट्रोक) हृदयविकाराच्या झटक्याप्रमाणेच तातडीचे आणि अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणार आहेत. स्ट्रोकच्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळून संभाव्य शारीरिक हानी टाळता येणार आहे.
संचेती रुग्णालयाने एंजेल्स इनिशिएटिव्हच्या सहकार्याने याबाबत पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन मान्यताप्राप्त पॅरामीटर्सनुसार 40 हून अधिक क्लिनिकल स्टाफला प्रशिक्षण व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तज्ञ न्यूरोलॉजिस्टची सेवा, अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान व उच्चस्तरीय उपचार सुविधा यांच्या माध्यमातून संचेती रुग्णालय आता रुग्णांना जलद निदान, तत्काळ उपचार व उच्च दर्जाचे पुनर्वसन उपलब्ध करून देईल.
यावेळी बोलताना डॉ. पराग संचेती म्हणाले, ज्याप्रमाणे हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आलेल्या रुग्णाला वेळेवर उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो, त्याच धर्तीवर आता ब्रेन स्ट्रोककडे पाहिले जात आहे. हृदयविकाराच्या रुग्णाला अँजिओग्राफी आणि स्टेंटिंग करून हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत केला जातो, त्याचप्रमाणे मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे (इस्केमिक स्ट्रोक) किंवा मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे (हेमरेजिक स्ट्रोक) येणाऱ्या झटक्यावर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या स्ट्रोकच्या रुग्णावर थ्रॉम्बोलायसिस, स्टेंटिंग किंवा कॉइलिंग यांसारखे उपचार त्वरित सुरू केले जातील, ज्यामुळे रुग्णाच्या हाता-पायांवर होणारे गंभीर परिणाम टाळता येतील.
अत्याधुनिक कॅथलॅब आणि तज्ञ टीम सज्ज
या विशेष उपचारांसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक कॅथलॅब (Cath Lab) संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असून, सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर आठवड्याभरात ती कार्यान्वित होईल. या कॅथलॅबमुळे मेंदूचा रक्तपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी स्टेंटिंग आणि कॉइलिंगसारख्या प्रक्रिया करणे शक्य होणार आहे असे डॉ. संचेती यांनी सांगितले.
या सेंटरमध्ये एक अनुभवी टीम कार्यरत असेल. रुग्णालयाच्या अपघात विभागात (Casualty) येणाऱ्या स्ट्रोकच्या रुग्णाला सर्वप्रथम ही टीम हाताळेल. यानंतर न्यूरो टीम रुग्णाची तपासणी करून पुढील उपचार पद्धती ठरवतील. त्याचबरोबर, स्ट्रोकच्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभागाची (ICU) गरज ओळखून त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात येईल. त्यासाठी एक सुसज्ज आयसीयू विभाग देखील तयार ठेवण्यात आला आहे.
क्रॉनिक स्ट्रोक आणि फिजिओथेरपीमधील अनुभव
संचेती रुग्णालय केवळ तातडीच्या (अक्यूट) स्ट्रोकवरच नव्हे, तर जुन्या (क्रॉनिक) स्ट्रोकच्या रुग्णांवर उपचार करण्यातही माहेरघर मानले जाते. पक्षाघात (Paralysis) झालेल्या अनेक रुग्णांना येथील फिजिओथेरपी विभागाने यशस्वी उपचार दिले आहेत. १९९२ पासून कार्यरत असलेल्या फिजिओथेरपी कॉलेजच्या अनुभवामुळे आणि नव्याने दाखल झालेल्या आधुनिक उपकरणांमुळे रुग्णांना अधिक चांगल्या प्रकारे फिजिओथेरपी दिली जाईल, असे डॉ. सोनल यांनी सांगितले .