पुणे- यंदा मुला मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेत पुण्यातील रशियन खेळाडू अलेक्सझेंडर शिरोबोकोव्ह हा ३५व्या पुणे फेस्टिव्हल क्रीडा स्पर्धांमधील आकर्षण ठरला. शनिवार, दि. २३ सप्टे. व रविवार दि. २४ सप्टेंबर या दोन दिवशी जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडीयम येथील वस्ताद लहुजी साळवे बॉक्सिंग सेंटर येथे ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण १४० स्पर्धक होते त्यात ९५ मुली होत्या. विविध वजन गटातील कप क्लास कॅडेट, सब ज्युनिअर, ज्युनिअर युथ आणि इलाईट प्रकारात स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेत रशियाचा 91 लाईट हेवी वजन गटामध्ये अलेक्सझेंडर शिरोबोकोव्ह हा सुवर्णपदक विजेता ठरला. अलेक्सझेंडर शिरोबोकोव्ह (वय २४ वर्ष) हा रशियन बॉक्सिंग पटू सुमारे दीड वर्षांपासून पुण्यात एका नामांकित कंपनीत नौकरी करीत असून क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे बॉक्सिंग क्लब येथे पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे पदाधिकारी श्री. गुजर त्यास ट्रेनिंग देत आहेत.
पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनतर्फे माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे व माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी याचे आयोजन केले होते. याचे बक्षीस वितरण पुणे फेस्टिवलचे मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, संयोजक रमेश बागवे, अविनाश बागवे, ग्रामीण बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष चाबुकस्वार आणि क्रिडा स्पर्धांचे समन्वयक प्रसन्न गोखले यांच्या हस्ते संपन्न झाले.
सोबत निकाल
मुले गटात
बेस्ट बॉक्सर – परशुराम पगारे (क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे बॉक्सिंग क्लब)
बेस्ट प्रॅमिसिंग बॉक्सर – गौरव पेंदूर (एम.आय.जी.एस.)
बेस्ट चॅलेंजर बॉक्सर – ओम कांबळे (एम.आय.आय.)
मुली गटात
बेस्ट बॉक्सर – शारदा चौधरी (साई बॉक्सिंग अकादमी, सांगवी – पुणे)
बेस्ट प्रॅमिसिंग बॉक्सर – समृद्धी शिंदे (बी.व्ही.जी.पी.) व ऋतुजा काळे (एक्स सर्विसेस)
बेस्ट चॅलेंजर बॉक्सर – आलिया शेख (पँथर स्पोर्ट्स अकादमी)