पुणे(प्रतिनिधि)-मुख्यमंत्री हा भाजपचा झाला तर होईल फक्त देवेंद्र फडणवीस होतील, की महाराष्ट्रातील एक भाजपचा नेता ज्याला २०१९ ला त्याला तिकीट नाकारले तो होईल हे मात्र सांगता येणार नाही असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी भाजपचे नेते विनोद तावडे यांचे नाव न घेता तावडे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्रीपदाबाबत घोळ आहे. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. आकडे जर बघितले तर भाजपाचा आकडा अशा पद्धतीने आलेला आहे, जर एकनाथ शिंदे यांनी खूप वेळ घालवला तर अजित पवार आणि भाजप मिळून सत्ता स्थापन करू शकतात. जर अजित पवार यांनी वेळ घालवला तर भाजप आणि एकनाथ शिंदे सरकार स्थापन करू शकतात. त्यामुळे आता बऱ्याच दिवस या गोष्टी चालतील, असं नाही. पहिल्याच दिवशी या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. उगाच रटाळ पद्धतीने खेचाखेची सुरू आहे. सगळ्यांना माहिती आहे. काय होणार आहे. भाजपला मुख्यमंत्रीपद तिथं येऊ शकते. फक्त दाखवण्यासाठी कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना एक वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. नाहीतर पाच वर्ष मुख्यमंत्री हे भाजपकडेच राहील. भाजपने सांगितलं अडीच अडीच वर्ष तर अडीच वर्ष होईल आणि पुढच्या अडीच वर्षात देखील भाजपचाच राहील, असंही रोहित पवार म्हणाले.
अजित दादांना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल का? या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले, अजितदादांना मुख्यमंत्री पद दिले तर चांगली गोष्ट आहे. आम्ही सुद्धा त्या गोष्टीचे स्वागत करू, अभिनंदन करू. पण भाजपाला तुम्ही चांगल्या पद्धतीने जर ओळखत असाल तर भाजप सहजपणे अजित दादांना मुख्यमंत्री बनवतील असं नाही. एकनाथ शिंदे यांना गेल्या अडीच ते तीन वर्षापासून मुख्यमंत्री पद दिलं असल्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद मागण्याचा अधिकार आहे. म्हणून फक्त ते थोडंसं पुढे मागे करत आहेत. जर त्यांना गेल्या अडीच तीन वर्षात मुख्यमंत्री पद मिळाला नसतं तर मग एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रीपद मागितले नसते. त्यामुळे शेवटी भाजपाला ताकद खूप मोठी मिळालेली आहे. मुख्यमंत्री हा भाजपचा झाला तर होईल फक्त देवेंद्र फडणवीस होतील, की महाराष्ट्रातील एक भाजपचा नेता ज्याला २०१९ ला तिकीट नाकरण्यात आले होते आणि त्या नेत्याने केंद्रात जाऊन चांगली कामगिरी केली, अशा व्यक्तीला दिले जाईल, हे मात्र सांगता येणार नाही.