पुणे- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्ध केलेले संकल्प पत्र विकसित भारताचा रोड मॅप असल्याचे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
भांडारी म्हणाले, ‘जनतेच्या सहभागातून जनतेच्या आशा आकांक्षांना आकार देणारे हे संकल्प पत्र आहे. या संकल्पपत्रात दहा वर्षांतील पूर्वीच्या जाहीरनाम्यातील पूर्तता झालेल्या विकासकामे आणि योजनांचा आढावा घेतला आहे. अशी भूमिका या आधी कोणत्याही राजकीय पक्षाने मांडली नाही. दरवेळी फक्त नवीन जाहीरनामा प्रसिद्ध केला.’
भांडारी पुढे म्हणाले, ‘२०४७ पर्यंत एक संपन्न, समर्थ राष्ट्र म्हणून उभे राहण्याचा संकल्प करण्यात आला आहे. युवक, महिला, शेतकरी अशा सर्व समाज घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी संकल्प पत्रात समावेश करण्यात आला आहे. रोजगार निर्मितीसाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.’
समान नागरी कायदा लवकरात लवकर लागू व्हावा ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे जोपर्यंत हा कायदा येत नाही तोपर्यंत महिलांना समान हक्क मिळणार नाहीत असेही भांडारी म्हणाले.