श्री योगेश्वरी देवीच्या साक्षीने रंगले रिसबूड कुलसंमेलन 

Risbood Kula Sammelan witnessed by Sri Yogeswari Devi
Risbood Kula Sammelan witnessed by Sri Yogeswari Devi

अंबाजोगाई- अंबाजोगाई येथे श्री योगेश्वरी देवीच्या साक्षीने दोन दिवसीय निवासी रिसबूड कुलसंमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनाला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील कानाकोपऱ्यात असलेले रिसबूड बांधव, माहेरवाशिणी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते. दि. २७ आणि २८ जानेवारी रोजी झालेल्या या संमेलनाचे आयोजन रिसबूड ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. राम रिसबूड, सचिव श्री. प्रतीक रिसबूड उपाध्यक्ष श्री. यशवंत रिसबूड, खजिनदार श्री. संदीप रिसबूड, सदस्य श्री. दत्तात्रय रिसबूड, सौ. रेश्मा रिसबूड, सौ. दीप्ती रिसबूड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि भगवान परशुराम, देवी योगेश्वरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. राम रिसबूड यांनी रिसबूड ट्रस्टचा लेखाजोखा मांडला. तसेच ट्रस्टची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे सांगून आजीव सभासदांची संख्या वाढत असल्याचे नमूद केले. उद्योजक श्री. राजीव रिसबूड यांनी ट्रस्टला पाच लाखांची देणगी दिल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे अनेक रिसबूड कुलबांधवानी केलेल्या आर्थिक मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

अधिक वाचा  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण यांची एकमताने निवड

यावेळी उद्योजक श्री. राजीव रिसबूड यांचा पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री. राजीव रिसबूड म्हणाले की, रिसबूड कुलसंमेलनाला रिसबूड कुटुंबियांमधील युवकांची संख्या कमी असते. त्यामुळे पुढील वर्षी संमेलनाला उपस्थित राहणाऱ्या युवक युवतींचा संमेलनाचा खर्च आपल्यातर्फे केला जाईल अशी घोषणा केली. यावेळी विवाहाला ५० वर्षे पूर्ण झालेल्या जोडप्यांचा तसेच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.

संमेलनाचा पहिला दिवस मनोरंजनात्मक खेळ, विविध गुणदर्शन, नृत्य, गाणी यांनी गाजला. कु. प्रणाली रिसबूड, कु. स्वरांगी रिसबूड आणि कु. निक्षिता रिसबूड श्री. केदार रिसबूड, श्री. दत्तात्रय रिसबूड, श्री. संदीप रिसबूड यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. विशेष म्हणजे श्री. संदीप रिसबूड, सौ. दीप्ती रिसबूड, सौ. मीना रिसबूड यांनी सादर केलेल्या ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’ या महाकवी कालिदास यांच्या रचनांवर आधारित माहिती, गाण्याचा कार्यक्रम सादर केला. उपस्थित रसिकांनी आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे लेखन सौ. मुग्धा रिसबूड यांनी केले. संध्याकाळी स्थानिक कलाकारांनी  शास्त्रीय, उपशास्त्रीय, भक्तीगीत भावगीतांचा कार्यक्रम सादर केला.

अधिक वाचा  पुणे येथील रसायु कॅन्सर क्लिनिकचा उत्तराखंड राज्य सरकार बरोबर आयुर्वेद आणि कॅन्सर उपचाराबाबत सामंजस्य करार

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी संमेलनस्थळ ते श्री. योगेश्वरी देवी मंदिरापर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली. श्री.योगेश्वरी देवी मंदिरात ट्रस्टच्या वतीने महाअभिषेक, पूजा, ओटीभरण असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी मंदिराच्या प्रांगणात सौ. जयश्री रिसबूड यांनी सुश्राव्य कीर्तन सादर केले. त्यानंतर सौ. जयश्री रिसबूड आणि सौ. रजनी रिसबूड यांनी भारूड सादर केले.

संमेलनाच्या दरम्यान घेण्यात आलेल्या मनोरंजनात्मक खेळांमधील विजेत्यांना, संमेलनाच्या संयोजनात महत्वाची भूमिका बजावलेल्या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मीना रिसबूड यांनी केले. आभार श्री. संदीप रिसबूड यांनी मानले. पुढील वर्षी संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची ग्वाही देऊन संमेलनाची सांगता झाली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love