नवी दिल्ली – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Election strategist Prashant Kishor)यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वाधिकार हाती घेऊन ‘कॉँग्रेस गुरु’ होण्याचे स्वप्न भंगले आहे. इतर नेत्यांप्रमाणेच त्यांनाही पक्षाच्या अटी- शर्तीवर काम करावे लागेल अशी भूमिका कॉँग्रेसच्या इतर नेत्यांनी घेतली. दरम्यान, किशोर यांना कॉँग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन केलेल्याअधिकारप्राप्त कृती गटात (ईएजी) सामील होण्याची ऑफर दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारली आहे.
प्रशांत किशोर यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी ईएजीचा भाग म्हणून पक्षात सामील होण्याची आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्याची काँग्रेसची ऑफर नाकारली आहे. माझ्या मते, संघटनात्मक समस्या सुधारणांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी पक्षाला माझ्यापेक्षा अधिक नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये लिहिले होते की, प्रशांत किशोर यांनी केलेल्या सादरीकरणानंतर आणि त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी एक सक्षम कृती गट (ईएजी) 2024 स्थापन केला आहे. सुरजेवाला म्हणाले की प्रशांत किशोर यांना परिभाषित जबाबदारीसह गटात सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते, जे त्यांनी नाकारले आहे. त्यांनी पक्षासाठी केलेल्या प्रयत्नांचे आणि सूचनांचे आम्ही कौतुक करतो.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एक सक्षम कृती गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला या गटात प्रशांत किशोर यांना सामील होण्यासाठी कॉँग्रेसणे ऑफर दिली होती.
प्रशांत किशोर यांनी राजकीयदृष्ट्या अगदीच मोडीत निघालेल्या काँग्रेसच्या पुनरुत्थानासाठी दिलेल्या कल्पना चांगल्या आहेत. मात्र, त्या अफलातून नाहीत. त्यांनी सर्व राजकीय पक्षांपासून दूर होऊन आपल्या सेवा काँग्रेसला समर्पित कराव्यात, काँग्रेस पक्षात त्यांना एखाद्या सामान्य नेत्याप्रमाणे सामील व्हावे लागेल. पक्ष चालविण्याचे सर्वाधिकार मिळणार नाहीत अशा भूमिकेपर्यंत काँग्रेसचे नेते आले होते.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वाधिकार हाती घेऊन कॉँग्रेस पक्षाचे ‘गुरु’ आणि रणनीतीकार होण्याचे प्रशांत किशोर यांचे स्वप्न होते. किशोर यांच्या सोनिया गांधी यांच्या बरोबर तीन बैठका झाल्या होत्या. राहुल गांधी यांचे सर्व सहकारी किशोर यांच्या हाती सूत्र देण्याच्या विरोधात होते. दुसरीकडे काँग्रेसचे जुनेजाणते नेतेही किशोर यांना स्वीकारण्यास तयार नाहीत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत किंवा दिग्विजय सिंग यांच्यासारखे अनुभवी नेत्यांनी किशोर यांच्यावर उपरोधिक टिपणीही केली आहे, या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यासर्व तडजोडी करणार नाही अशी अपेक्षा होतीच आणि त्यानुसार त्यांनी आज काँग्रेसची या अधिकारप्राप्त कृती गटात सामील होण्याची ऑफर नाकारली आहे.
काँग्रेसचे उदयपूर येथे चिंतन शिबीर
दरम्यान काँग्रेस पक्ष संघटना मजबूत आणि प्रभावी बनविण्यासाठी तसेच देश आणि पक्षापुढे असलेल्या राजकीय सामाजिक आणि आव्हानांवर विचार करण्यासाठी येत्या 13, 14, आणि 15 मे रोजी राजस्थानच्या उदयपूर येथे काँग्रेसच्या नवा संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात काँग्रेसचे देशभरातील चारशेहून अधिक नेते आणि कार्यकर्ते भाग येतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची रणनीती ही या शिबिरात निश्चित करण्यात येईल