पुणे(प्रतिनिधि)–महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झालं आहे. महाराष्ट्रातील या नेत्याने हा खेळ ४५ वर्षांपूर्वी सुरू केला. त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांची पदे अस्थिर झाली. हे भटके आत्मे केवळ विरोधकांनाच अस्थिर करत नाहीत, तर स्वतःच्या पक्षालाही अस्थिर करतात अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता सोमवारी हल्लाबोल केला. दरम्यान, मी जिवंत असेपर्यंत धर्माधारित आरक्षणाचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, बारामती लोकसभेच्या सुनेत्रा पवार, शिरुर लोकसभेचे शिवाजीराव आढळराव पाटील, मावळ लोकसभेचे श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजप महायुतीच्या घटक पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. पुणे तिथे काय उणे असे म्हणत, या भूमीवर महात्मा फुले, जोतिबा फुले यांच्यासारखे समाजसुधारक दिले. पुणे जेवढं प्राचीन आणि तेवढंच फ्युचरिस्टिट आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.
मोदी म्हणाले, काही भटके आत्मे असतात. त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही, की ते भटकत राहतात. स्वत:ही समाधानी राहत नाहीत व इतरांनाही अस्थिर करत राहतात. महाराष्ट्रातील एका नेत्याने ४५ वर्षांपूर्वी हा अस्थिरतेचा खेळ सुरू केला. त्यांच्यामुळेच कितीतरी मुख्यमंत्र्यांना आपला कार्यकाल पूर्ण करता आला नाही. ते विरोधकांनाच अस्थिर करत नाहीत, तर स्वत:च्या पक्षाला, पक्षातील लोकांनाही अस्थिर करतात. एवढेच नव्हे, तर स्वत:च्या कुटुंबातही अस्थिरता निर्माण करतात. १९९५ मध्ये राज्यात सेना भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले. मात्र, हा भटकता आत्मा तेव्हाही या सरकारला अस्थिर करण्याचा डाव खेळत होता. २०१९ मध्येही त्यांनी जनादेशाचा अपमान केला. महाराष्ट्रानंतर आता देश अस्थिर करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. महाराष्ट्राला अशा भटकत्या आत्म्यांपासून वाचविले पाहिजे. महाराष्ट्रात महायुती मजबूत आहे. या मजबुतीचनेच त्यांनी पुढे जावे. मागच्या २५ ते ३० वर्षांत ज्या उणिवा राहिल्या. त्या आपण दूर करुयात. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नक्कीच नवी झेप घेईल. त्याचबरोबर एनडीए आघाडी सरकार महाराष्ट्राला नवीन उंचीवर नेल्याशिवाय राहणार नाही.
काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले. मात्र, अर्ध्या लोकसंख्येला प्राथमिक सुविधाच नव्हत्या. आम्हाला १० वर्षे जनसेवेची संधी मिळाली. या काळात मूलभूत गरजा पूर्ण केल्याच. शिवाय प्रत्येक घटकांची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले. आज शहर अथवा गावातील आधुनिक पायाभूत सुविधा पाहून कुणाचेही मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. मेट्रो, पालखी मार्ग, एअरपोर्ट, समृद्धी महामार्ग, वंदे भारत ट्रेन हा आधुनिक भारताचा चेहरा आहे. जिता जागता पुरावा आहे. ही मोदीची गॅरंटी आहे. काँग्रेसने दहा वर्षांत पायाभूत सुविधांवर जितका खर्च केला, तितका आम्ही केवळ एक वर्षांत केला, असा दावाही त्यांनी केला.
आजचा भारत नवा आहे. युवक, त्यांचे टॅलेंट, इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी यावर भरोसा ठेऊन पुढे जात आहे. मागच्या 10 वर्षांत सव्वा लाखापेक्षा जास्त स्टार्ट अप बनविले. यातील अनेक पुण्यातील आहेत. पुणे जितके प्राचीन, तितकेच पारंपरिक आहे. बुद्धिमत्तेची ही खाण आहे. पुणे तिथे काय उणे, असे म्हणूनच म्हणतात, असे सांगत आम्ही महागाईवर नियंत्रण मिळविले. भ्रष्टाचाऱयांवर कारवाई केली. इन्कम टॅक्सची मर्यादा सात लाखांपर्यंत आणली. मध्यमवर्गीयांचे ओझे कमी केले, असे सांगत ७० वर्षांपुढील मातापित्यांचा खर्च आता मोदी करणार. मोफत उपचार देणार, ही मोदींची गॅरंटी आहे, असा शब्दही त्यांनी दिला.
मी जिवंत असेपर्यंत धर्मावर आधारित आरक्षण नाही
मुस्लिम समाजाचा धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा काँग्रेसचा डाव आहे. मात्र, मी जिवंत असेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत धर्मावर आधारित आरक्षण कुणालाही देऊ देणार नाही, असेही मोदींनी सुनावले. यासिन भटकळला पाठीशी घातले जाते. याकूब मेमनची फाशी रोखण्याचा प्रयत्न होतो, अशा शब्दांत काँग्रेसला त्यांनी फटकारले.
लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये प्रवास कराल
वर्षांपर्यंत राज्य केलं, पण देशातील अर्ध्या जनतेला मूलभूत सुविधाही देऊ शकले नाही. आम्हाला फक्त 10 वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. या दहा वर्षांत मूलभूत सुविधांसोबत जनतेच्या आकांक्षाही पूर्ण केल्या आहेत. गावागावात चांगले रस्ते मूलभूत सुविधा पाहून चांगलं वाटतं की नाही. पुणे मेट्रो पाहा, पुणे विमानतळ पाहा, समृद्धी महामार्ग पाहा, हे आधुनिक भारताचं चित्र आहे. महाराष्ट्राच्या जनतेला ही मोदीची गँरेंटी आहे की, तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये प्रवास कराल.
काँग्रेसने १० वर्षात विकासावर खर्च केला, तेवढा आम्ही एका वर्षात केला
मनमोहन सिंह यांच्या सरकारने १० वर्षात मुलभूत विकासावर जेवढा खर्च केला, तेवढा आम्ही एका वर्षात केला, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. स्टार्टअप इंडियाची कमाल पाहा, फक्त १० वर्षात सव्वा लाखाहून अधिक स्टार्टअप तयार झाले आहेत. गर्वाची गोष्ट म्हणजे यातील अनेक स्टार्टअप पुण्यात आहेत. आम्ही नीतीगत बदल केले आहेत. एक लाख कोटी रुपये इनोव्हेशन करण्यासाठी देण्याचा निर्णय अंतरिम अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे.
येत्या काळात पुणे ऑटोमोबाईल हब बनेल
२०१४ आधी भारत मोबाईल आयात करायचा. मोदी सरकार आल्यानंतर भारत आता मोबाईल निर्यात करतो. मेड इन इंडिया चिपही जगभरात निर्यात केली जाणार आहे. देशाला तरुणी पिढीवर विश्वास आहे. भारताच्या तंत्रज्ञानावर विश्वास आहे. पुण्यातील तरुण बुद्धीमान आहे, येत्या काळात पुणे ऑटोमोबाईल हब बनेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, धनुष्यबाण, घडय़ाळ मत म्हणजे मोदींना मत, विकासाला मत. लोकांचा विश्वास मोंदींवर आहे. देश मोदींवर प्रेम करत आहे. प्राण जाय पर वचन न जाये, ही मोदींची कामाची पद्धत आहे. राम मंदिर उभारले. ३७० कलम हटविले.
विरोधक आळीपाळीनं पंतप्रधान व्हायच्या तयारीत आहेत – देवेंद्र फडणवीस
विरोधकांच्या गाडी केवळ इंजिन आहे. ते सगळेच आळीपाळीनं पंतप्रधान व्हायच्या तयारी आहेत. विरोधकांच्या गाडीला डब्बे नाही. शरद पवारांच्या गाडीत फक्त सुप्रिया सुळेंना जागा आहे. राहुल गांधींच्या गाडीत फक्त सोनिया गांधी आणि प्रियांका गांधीसाठी जागा आहे तर उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये केवळ आदित्य ठाकरेंना जागा आहे. यांच्या कोणाच्याच गाडीत सर्वसामान्यांना जागा नाही आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोदींनी सर्जिकल स्ट्राईकसाठी शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली. शाहिस्तेखानाची बोटे शिवाजी महाराजांनी तोडली होती. तशीच सर्जिकल स्टाईक आणि एअर स्ट्राईक करत दुष्मनाला उत्तर दिलं. यावेळीदेखील विरोधकांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले कामं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्याशिवाय आपल्याला मोदींशिवाय पर्याय नाही आहे. एकीकडे नरेंद्र मोदी आहेत तर दुसरीकडे राहूल गांधींच्या नेतृत्वाखालील २६ पक्षांची खिचडी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.