पुणे—पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे (पीडीसीसी) तब्बल 22 कोटी 25 लाखांच्या जुन्या नोटा पडून आहेत. त्यामुळे बँकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान, रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने या जुन्या नोटा बदलून देण्यास नकार दिल्याने पीडीसीसी बँकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
बॅंकेकडे जमा झालेल्या तब्बल 576 कोटी रुपये किमतीच्या जुन्या नोटा सुरुवातीची सात महिने बॅंकेतच पडून होत्या. अखेर 554 कोटी रुपयांच्या नोटा बदलून मिळाल्या. तोपर्यंत बॅंकेचे 50 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. याच नोटांपैकी शिल्लक असलेल्या 500 आणि एक हजाराच्या 22 कोटी 25 लाख रुपयांच्या जुन्या नोटा अद्यापही बॅंकेला बदलून मिळू शकल्या नाहीत.
जुन्या नोटा बदलून मिळाव्यात म्हणून पीडीसीसी बॅंकेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु कोरोनामुळे न्यायालयाचा अंतिम निकाल बाकी आहे. यामुळे बॅंकेने या जुन्या नोटा चक्क लॉकरमध्ये ठेवल्या आहेत. वाळवी आणि अन्य किडीपासून नोटांचा बचाव केला जात आहे. या जुन्या नोटांमुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला सुमारे 70 ते 80 कोटी रुपयांची आर्थिक झळ सोसावी लागत असल्याची माहिती आहे.