मुंबई: सोनी सब वरील वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से ही एक कौटुंबिक मालिका आहे. यामध्ये सामान्य माणसाचा त्याच्या दैनंदिन जीवनातील आव्हानांशी सुरू असलेला लढा दाखवला आहे. अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की, वंदनाला (परिवा प्रणती) स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे आणि त्यावरील उपचार सुरू करण्यात आले आहेत.
कर्करोगाशी आपले भय आणि कलंकाची भावना निगडीत आहे, त्यामुळे स्वतः रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय रोग झाल्याच्या परिस्थितीत कमालीची अगतीकता आणि निराशा अनुभवतात. याच समस्यांचा विचार या मालिकेत करण्यात आला आहे, आणि त्यातून प्रेक्षकांना या रोगाशी निगडीत भीतीमधून बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. ब्रेस्ट कॅन्सर हा एक अत्यंत संवेदनशील विषय आहे जो खूप काळजीपूर्वक हाताळला जाणे गरजेचे आहे. ‘वागले की दुनिया’ मालिकेत या रोगाशी संबंधित भावनांचा विचार करून अत्यंत जबाबदारीपूर्वक आणि निष्ठेने या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत.
आगामी भागांमध्ये प्रेक्षक वंदनावर होत असलेले केमो थेरपीचे दुष्परिणाम पाहतील. तिचे केस झपाट्याने गळू लागले आहेत. तिच्या रूपातील बदल प्रोस्थेटिक्सच्या मदतीने दाखवण्यात आला आहे, ज्यात बारीक सारिक तपशीलांवर लक्ष देण्यात आले आहे. या संपूर्ण चित्रीकरणादरम्यान आपण निभावत असलेल्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न परिवाने केला आहे. कारण ब्रेस्ट कॅन्सर एका स्त्रीसाठी फारच संवेदनशील विषय आहे. प्रेक्षकांमध्ये या विषयाबद्दल जागृती निर्माण व्हावी म्हणून तिने ही भावना फार यथार्थतेने साकारली आहे.
वंदना वागलेची भूमिका करणारी परिवा प्रणती म्हणते, “कॅन्सरने पीडित स्त्रीची भूमिका करणे हा माझ्यासाठी फारच भावुक आणि अनोखा प्रवास होता. पडद्यावर डोक्यावरचे केस संपूर्ण गळलेल्या अवस्थेत येण्याअगोदर मी केमोथेरपीची संपूर्ण प्रक्रिया आणि रुग्णावरील त्याचे परिणाम याची माहिती मिळवली. सेटवरील प्रत्येकासाठी हा एक भावना उचंबळून आणणारा प्रवास होता. कारण माझे रूप बघून सर्वांच्या मनात तीव्र भावना जाग्या झाल्या होत्या. स्त्रीच्या बाबतीत या रोगाकडे एक लांछन म्हणून बघण्याच्या वृत्तीला शह देणारी ही भूमिका मला साकारायला मिळाल्याचा मला अभिमान वाटतो.”
ती पुढे म्हणते, “एक अभिनेत्री म्हणून प्रोस्थेटिक्स व्यवस्थित बसवणे हा एक आव्हानात्मक अनुभव होता. ते सर्व करताना खूप वेळ लागत होता आणि ती एक किचकट प्रक्रिया होती. पण त्यापेक्षा मोठे आव्हान तर शूटिंग चालू केल्यानंतर होते. तापमान खूप कमी, थंड ठेवावे लागत होते, कारण नाही तर प्रोस्थेटिक्स वितळू लागते. त्यामुळे सेटवरील प्रत्येकासाठी कसोटीची वेळ होती. प्रोस्थेटिक्स बाळगत आम्हा सर्वांना 12 तासांपेक्षा जास्त काळ शूटिंग करावे लागले.”